
- अश्विनी पारकर
मधमाश्यांविषयी वेगळ्या भावनेनं जोडले जात मधुमक्षिका पालन आणि संवर्धनाचा वेगळा मार्ग निवडला आहे. अमित गोडसे या तरुणाने. जाणून घेऊया या बी मॅनविषयी.
वर्षाला नऊ लाखाचे पॅकेज असताना एका सॉफ्टवेअर कंपनीमधील मकेनिकल इंजिनीयरिंग करणाऱया तरुणाने त्या नोकरीवर पाणी सोडलं. घरच्यांचा पाठिंबा मिळण्याची कुठलीही शाश्वती नसताना त्याने मधमाशी संवर्धनासाठी हा निर्णय घेतला. अमित गोडसे याला केवळ मधुमक्षी पालनाचे ध्येय डोळय़ांसमोर दिसत होते. एक प्रतिष्ठत जीवन सोडून हे असले कसले भलते उद्योग करतोयस अशी बोलणीही त्याला ऐकावी लागली. पण त्याने त्याचे ध्येय साध्य करण्याची इच्छा कायम उराशी बाळगली. यातूनच तो ‘बी मॅन’ म्हणून नावारूपास आला…
मधमाश्या अत्यंत शिस्तप्रिय असतात. त्यांना सर्व कामे वाटून दिलेली असतात. मध वेचण्यापासून त्याची साठवणूक करण्यापर्यंत. साठवलेल्या मधाचे संरक्षण करण्यापर्यंत मधमाशा सर्व कामे सुरळीत पार पाडतात. राणी मधमाशीच्या देखरेखीखाली हे सर्व नियोजनपूर्वक सुरू असते. माणसाने मधमाश्यांकडून हा गुण घ्यावा असं अमित सुचवतो. त्याच्या निरीक्षणातून मधमाश्यांविषयी त्याने मांडलेले गुणधर्म नक्कीच बोध घेण्यासारखे आहेत. मधमाशी इतर मधमाश्यांच्या कामात दखल देत नाही. आपण आणि आपले काम बरे या उक्तीप्रमाणे तिचे काम सुरू असते. माणसाने हा गुण जर अंगिकारला तर त्याचा फायदाच होईल असेही अमित सांगतो.
अमितने एका मोठय़ा सॉफ्टवेअर कपंनीमधील उत्तम पगाराची नोकरी सोडणे हा निर्णय सोपा नव्हता. त्याने या गोष्टीची कल्पना त्यावेळी कुटुंबीयांनाही दिली नव्हती. खरंतर हा निर्णय घेण्यामागचं कारणही त्याने अनुभवलेल्या एका घटनेत सामावलेलं आहे. त्याने त्याच्या इमारतीत मधमाश्यांच पोळं पेस्ट कंट्रोलने नष्ट करताना पाहिलं. ते पाहून अमितच्या मनाला फार यातना झाल्या. मधमाश्यांचं मध हवं आहे, पण त्या नकोत असा माणसातील स्वार्थी भाव त्याला जाणवला. अल्बर्ट आइनस्टाइन या जगद्विख्यात शास्त्रज्ञाने जगातून मधमाश्या नष्ट झाल्या तर माणसाचं पृथ्वीवरील आयुष्य अवघ चार वर्षांचं असेल अस म्हटलंय. अमितने हे कुठेतरी वाचलं होतं. इमारतीतील घटनेमुळे अमितची मधमाश्यांविषयीची जिज्ञासा अधिकच वाढली.
मालेगावमध्ये सेंद्रिय शेती पाहण्यासाठी अमित गेला होता. तिथे मधमाश्यांच्या पेटय़ा ठेवल्या होत्या. त्यावेळी अमितने सेंद्रिय शेतीच्या मालकांना शेतीऐवजी मधमाश्यांबाबत अनेक प्रश्न विचारले. त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्या गृहस्थांकडे नव्हती. अमित त्यावेळी नोकरी करत होता. त्याने या विषयाबाबत आणखी संशोधन केले. संशोधनात त्याला मधमाश्यांविषयी अनेक गोष्टी समजल्या. त्यातील मुख्य बाब म्हणजे मधमाश्यांचा उपयोग परागीभवनासाठी होतो. ज्यामुळे निसर्गातील अन्नचक्र सुरळीत राहते असे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पुण्यातील केंद्रीय मधुमक्षिका पालन केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केले. त्यादरम्यान मधमाशी पालन क्षेत्रात पूर्णवेळ कार्य करण्याचे विचार त्याच्या मनात सुरू होते. पुण्यात अनेक ठिकाणी मधमाश्या पेस्ट कंट्रोलने मारल्या जातात अशी माहितीही त्याला मिळाली. त्यातूनच त्याने नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी त्याच्या जमापुंजीतून तो घरखर्च चालवत असे. सोबतच मधमाशीचं पोळ कुठे लागलेलं असून ते काढायची माहिती मिळाल्यावर तेथे जात असे. मात्र त्याच्या जमापूंजीतून जास्त खर्च व्हायाला लागल्यावर त्याने मधमाशी संवर्धनातून मिळकतीस सुरुवात केली.
मधमाशी संवर्धनातून समाजोपयोगी काम करतानाच यातून अर्थार्जन केले तर त्यातून या कार्याला अधिक हातभार लागेल तसेच मिळकतही होईल असा विचार त्याने केला. यातूनच पुढे त्याने सहा जणांना प्रशिक्षण दिले. त्यांच्यासोबत तो मधमाशांची पोळी काढण्याचे काम करतो. अमित सांगतो मधमाशांना हाताळण्याची योग्य पद्धत म्हणजे त्यांना न हाताळणे. म्हणजेच मधमाशांना व त्यांच्या पोळय़ाला अजिबात धक्का न लावता ते आहे त्या स्थितीत ठेवणे. मधमाशी आपण तिला त्रास दिल्याशिवाय अजिबात दंश करत नाही. त्यामुळे मधमाशीचं पोळ तसंच ठेवणं योग्य आहे. असं अमित म्हणतो. मात्र याला इमारतीतील रहिवाशांचा विरोध असतो असा अनुभव या कामाच्या निमित्ताने आल्याचं अमित नमूद करतो. त्यामुळे पोळ काढण्यावाचून पर्याय राहत नाही. अशा वेळी त्याचे सहकारी आणि तो पोळय़ाला खालून औषधी धूर देतात. मधमाश्या पोळय़ातून निघाल्या की ते पोळय़ातील मधाचा भाग कापला जातो. उरलेल्या भागात अंडी असतात. तो भाग एखाद्या फुलझाडांच्या ठिकाणी चिकटवला जातो. यातून मधमाशांचे संवर्धनही होते आणि पोळय़ातील मध व मेणाचा वापरही केला जातो. बरेचदा शेतकरी तसेच टेरेस गार्डन अथवा घरच्या घरी शेती करणाऱ्या मंडळींकडून या अंडी असलेल्या पोळय़ांची मागणी होते. अमित व त्याचे सहकारी मधुमक्षिका पेटीतून ही पोळी त्या ठिकाणी पोहचती करतात व त्यांचे रोपण करतात.
मधमाशी संवर्धनासाठी धडपडणाऱया या मधमाश्यांच्या मित्राला त्यासारखे आणखी मधुमक्षिका मित्र तयार करायचे आहेत. यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमित आदिवासींनाही मधमाशी संवर्धन कार्याचे प्रशिक्षण देतो. या कामातून त्याला भरभक्कम मिळकत नसली तरी कामाचे मिळणारे समाधान अमूल्य आहे, असे तो म्हणतो. एका मोठय़ा कॉर्पोरेट नोकरीत लॅपटोपसमोर एसीमध्ये बसून काम करण्यापेक्षा एक वेगळं काम अमित करतो आहे. तो म्हणतो नोकरीतून मी स्वतःच पोट भरू शकतो, पण या कार्यातून मी निसर्गसेवा तर करतो आहेच पण माझ्या आणि माझ्या कुटुंबासह आणखी काही जणांना रोजगार उपलब्ध करून देतो आहे, या शब्दांत तो स्वतःच्या कार्याबाबत अभिमान व्यक्त करतो. माझ्या या कार्यातून मधमाश्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय घट थांबावी व त्यांना शहरांच्या या काँक्रीटच्या भिंतीत मोकळेपणाने श्वास घेता यावा अशी इच्छा तो व्यक्त करतो.































































