
>> अरुण जोशी
‘बाबूजी धीरे चलना, प्यार मे जरा संभलना..’ हे गाणं बहुतेकांना आठवत असेल. सध्या चाळिशीत असलेल्यांना तर नक्कीच किंवा लहान मुलांच्या गान स्पर्धांमुळे कदाचित नव्या पिढीलासुद्धा. या गाण्याचा एका विशिष्ट लयीतला मिश्कील भाव असलेला स्वर गीता दत्त यांचा. तशी तर अल्पायुषी गीता दत्त यांच्या नावे हिंदीत सुमारे दीड हजार गाणी असतील. शिवाय त्यांची मातृभाषा असलेल्या बंगालीत कितीतरी. आपल्या देशातले अनेक गायक पूर्वीपासूनच अनेक भाषांमधली गाणी गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे जेव्हा केवळ नाटकांचाच जमाना होता तेव्हाही बालगंधर्व, मास्टर दीनानाथ असे दिग्गज गायक कानडी, हिंदी या भाषांमधली नाटय़पदंही गात असत. चित्रपटाचा जमाना आणि त्यातही पार्श्वगायनाचा (प्लेबॅकचा) काळ आल्यावर तर केवळ गायक – गायिका असलेल्यांना भरपूर वाव मिळाला. आजही मिळतोच.
गीता घोष रॉय चौधरी यांचा जन्म आताच्या बांगला देशात 23 नोव्हेंबर 1930 रोजी झाला. श्रीमंत जमीनदार घराण्यातल्या दहा भावंडांमधली गीता एक. बालपणापासूनच तिला असलेली गाण्याची आवड लक्षात घेऊन वडिलांनी के.हनुमानप्रसाद यांच्याकडे तिला संगीत शिकायला पाठवलं. तोपर्यंत आसाम, कोलकाता असं करत रॉय कुटुंब 1942 मध्येच मुंबईत स्थायिक झालं होतं. बारा वर्षांच्या गीताचं शिक्षण सुरू झालं आणि गुरुजींनी संगीत दिलेल्या ‘भक्त प्रल्हाद’ चित्रपटात तिला सोळाव्या वर्षी दोन गाण्यांमध्ये दोन-दोन ओळी गाण्याची संधी मिळाली.
त्यानंतर मात्र गीताची सांगीतिक कारकीर्द बहरू लागली ती अखेरपर्यंत. ‘मेरा सुंदर सपना बीता गया’ हे गाणं त्यांनी 1947 मध्ये ‘दो भाई’ चित्रपटासाठी गायलं. संगीत होतं सचिनदेव बर्मन यांचं. या गाण्याने त्या रातोरात हिंदी चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर तदबीर से बिगडी हुई तकदीर बनाले (बाजी), ठंडी हवा काली घटा (मिस्टर ऍन्ड मिसेस-55), ‘जाता कहां है दीवाने’ आणि ‘ऐ दिल है मुश्कील’ (सीआयडी), ‘आज सजन मोहे अंग लगा ले’ आणि ‘जाने क्या तूने कही’ (प्यासा) पिया ऐसो जिया मे समाय गयो रे (साहिब बीबी और गुलाम), वक्त ने किया क्या हंसी सितम (कागज के फूल), मेरा नाम चिन चिन चू (हावडा ब्रिज) अशी त्यांची अनेक गाणी रसिकांच्या मनात घर करून आहेत. एस.डी. बर्मन आणि ओपी-नय्यर यांच्याकडे गायलेली त्यांची गाणी खूपच गाजली. तशातच केव्हातरी (1954) ‘न ये चांद होगा, न तारे रहेंगे’ असंही भावपूर्ण गीत त्यांच्या वाटय़ाला आलं… आणि अखेरीस ‘अनुभव’ चित्रपटात कनू रॉय यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी ‘कोई चूपके से आके, सपने चुरा के…’ हे गाणं 1971 मध्ये गायलं आणि 20 जुलै 1972 रोजी या जगाचा अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी निरोप घेतला.
चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि प्रभावी अभिनेता गुरु दत्त यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि गीता रॉय गीता दत्त बनल्या. मात्र गुरू दत्त यांच्या अकाली निधनाने खचलेल्या गीता दत्त यांना पुन्हा उभारी घेण्याची उमेद उरली नाही. तरी ‘स्टेज शो’ वगैरे करून त्यांनी नव्याने कारकीर्द सुरू करायचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्याच अकाली जाण्याने संपला.
गीता दत्त यांनी गायलेली पाचेक मराठी गाणी सध्या नेटवर ऐकता येतात. त्यातलं ‘जा सांग लक्ष्मणा सांग रामरायाला, समजला म्हणावे न्याय तुझा सीतेला’ हे वसंत बापट यांनी लिहिलेलं आणि जी.एन.जोशी यानी संगीत दिलेलं गीत अप्रतिम आहे. त्यातले सीतेच्या मनातले आर्त भाव गीता दत्त यांच्या स्वरात उमटलेत. याच त्रयीचं दुसरं गाणं आहे ‘मुक्या मनाचे भाव सजणा…’ ही दोन्ही भावगीतं एकेकाळी खूप गाजली, पण ‘जा सांग लक्ष्मणा…’ आजही नवी पिढी गाते.
त्यांचं आणखी एक चटकन आठवणारं लोकप्रिय गाणं म्हणजे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.’ दरवर्षी गणपती उत्सवात ते सर्वत्र वाजत असतं. मात्र ते गीता दत्त यांनी गायलंय हे क्वचितच कुणाला आठवतं. हे गाणं लिहिलंय शांता शेळके यांनी आणि त्याचं संगीत आहे अदिल अहमद यांचं. ‘स्वप्न तेच लोचनी’ या चित्रपटासाठी गीता दत्त यांनी ते गायलंय. तसेच एक भक्तिपर गीत म्हणजे ‘उदो उदो उदो मागते अंबाबाईचा’ हे नवरात्रीच्या काळात कानी पडणारं गाणंसुद्धा गीता दत्त यांचं. त्याचे गीतकार आहेत अनिल गोगटे आणि संगीत निशिकांत भारती यांचं.
अशा जुन्या अनवट गाण्यांचा शोध घेताना बरीच माहिती मिळते. विस्मृतीत गेलेली काही गाणी पुन्हा ऐकली की तो काळ आठवतो, त्याबरोबर त्या काळाच्या एकूणच स्मृतीही जाग्या होतात. एकेक गाणं एकेक ‘मूड’मध्ये घेऊन जातं.
गीता दत्त यांचं छोटंसं आयुष्य त्यांना बरंच काही देऊन गेलं. गायिका म्हणून खूप कीर्ती मिळाली काही चित्रपटांत (विशेषतः बंगाली) त्यांनी अभिनयही केला, पण ‘वक्त ने किया क्या हंसी सितम…’ असंही कधी घडलं आणि अखेरीस हिंदुस्थानी संगीत विश्वातलं हे सुंदर स्वप्न… ‘एक सुंदर सपना बीत गया… असं झालं. हा काळाचा महिमा, पण कालातीत राहील तो त्यांचा विशिष्ट बंगाली धाटणीचा विब्राटो असलेला स्वर!


























































