
>> विवेक दिगंबर वैद्य
हनुमंत अर्थात हनुमान हे हिंदू जनांचे आराध्यदैवत आहे. रामायणात त्याचे आगमन सीताहरणाच्या प्रसंगानंतर होते. किष्कींधाकांडामध्ये, राजा सुग्रीवाचे अमात्यपद भूषविणारा हा कपिराज प्रत्यक्षात सुमेरूराज केसरी आणि गौतमकन्या अंजनी यांचा पुत्र असला तरी ब्रह्मपुराणात तो पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या वायुतत्त्चाचा क्षेत्रज पुत्र आहे आणि म्हणूनच त्याचा उल्लेख ‘पवनपुत्र’ असाही केला जातो. शिवपुराणात मात्र त्यास शिवाचा कृपाशीर्वाद लाभलेला पुत्र म्हणून ओळखले जाते. हनुमानाचा जन्म, बालपण आणि पुढील कार्यकाळाविषयी हिंदुस्थानच्या विविध प्रांतांत, विविध कथा प्रचलित आहेत.
शक्ती, भक्ती, सिद्धी, बुद्धी, युक्ती व दास्य या षड्गुणांचा सामर्थ्यशाली प्रत्यय म्हणजे हनुमंत. श्रीशिवशंकराचे तेज धारण करून माता अंजनीच्या पोटी जन्मलेला आणि युगानुयुगे अभिमानाने चिरंजीवित्त्वाचे वरदान मिरविणारा हा हनुमंत, कधी हनुमान तर कधी मारुती, कधी बजरंगबली तर कधी महारुद्र म्हणून आपल्यापुढे उभा ठाकतो. तो कधी ‘दास’ होऊन विनम्रपणाचा प्रत्यय देतो तर कधी ‘वीर’रूप धारण करून आक्रमकतेचे दर्शनही घडवितो. आबालवृद्धांपासून ते अगदी चराचरांस ज्याचा आधार वाटतो तोच हा हनुमंत, त्रेता-द्वापार आणि कलियुगाला व्यापून आपल्या अतुलनीय, अवर्णनीय सामर्थ्याचे दर्शन घडवीत होता, आहे आणि यापुढेही घडवीत राहील.
हनुमंत अर्थात हनुमान हे हिंदू जनांचे आराध्यदैवत आहे. रामायणात त्याचे आगमन सीताहरणाच्या प्रसंगानंतर होते. किष्कींधाकांडामध्ये, राजा सुग्रीवाचे अमात्यपद भूषविणारा हा कपिराज प्रत्यक्षात सुमेरूराज केसरी आणि गौतमकन्या अंजनी यांचा पुत्र असला तरी ब्रह्मपुराणात तो पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या वायुतत्त्चाचा क्षेत्रज पुत्र आहे आणि म्हणूनच त्याचा उल्लेख ‘पवनपुत्र’ असाही केला जातो. शिवपुराणात मात्र त्यास शिवाचा कृपाशिर्वाद लाभलेला पुत्र म्हणून ओळखले जाते. हनुमानाचा जन्म, बालपण आणि पुढील कार्यकाळाविषयी हिंदुस्थानच्या विविध प्रांतात, विविध कथा प्रचलित आहेत. बालपणी खेळण्याचा चेंडू समजून सूर्यबिंब धरण्याकरिता उड्डाण करणारा हनुमान हिंदुस्थानींमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यावेळी बाल हनुमानाचे सूर्यबिंबापाशी जाण्याचे अकारण साहस पाहून इंद्रदेवाने त्याच्यावर वज्रास्त्र फेकून मारले तेव्हा हनुवटीला झालेल्या दुखापतीमुळे हे चपळ बालक हनुमान या नावाने ओळखले गेले असेही सांगितले जाते.
मरूत अर्थात वाऱयाचा पुत्र म्हणून मारुती या नावानेही परिचित असलेला हनुमान पुढे बलभीम, बजरंग, केसरीनंदन, वज्रांग, महारुद्र, आंजनेय, रामदूत अशा अनेक नावांनी ओळखण्यात आला. काहींच्या मते त्याचा जन्म कर्नाटकात झाला तर काहींच्या मते नाशिकपाशी ब्रह्मगिरी पर्वतरांगांतील अंजनेरी पर्वतावर झाला. मात्र हे बालक दैवी स्वरूपाचे होते याविषयी सर्वांचे एकमत आहे. इंद्रदेवाच्या वज्रास्त्रामुळे घायाळ झालेल्या या कपिबाळाच्या साहसी वृत्तीवर प्रसन्न होऊन साक्षात सूर्यदेवाने त्यास ‘सर्व शास्त्रांचे सखोल अध्ययन करण्याइतकी अपार बुद्धिमत्ता’ बहाल केली. त्यासोबतच इंद्र, वरुण, ब्रह्मदेव यांनीही त्यास विविध प्रसंगांस अनुसरून वर प्रदान केले. विष्णू भगवंताने तर रामायणकाळात हनुमंताला आपला सहचर बनवून ‘दास्य’भक्तीचे मनोहर रूप दाखविले आणि श्रीकृष्णावतार धारण करताना महाभारतकाळात कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धात त्याने हनुमंताला आपल्या रथावर आरूढ होण्याचा मान दिला.
त्याग, समर्पण आणि बलिदानाचा एकत्रित आविष्कार असलेल्या हनुमंतामधील ‘दास्य’वृत्तीला ‘आदर्श’ ठरवून पुढे त्यास चिरंजिवित्त्व बहाल करण्यात आले. म्हणून केवळ हिंदुस्थानी उपखंडातच नव्हे तर जगातील अनेक देशामध्ये हनुमानाचे पूजन केले जाते. रामायण-महाभारत यांसारख्या आर्ष महाकाव्यांमधील हनुमान एकाचवेळी ‘दास्यत्व’ आणि ‘वीर’तत्त्वाचा प्रत्यय करवून देणारा आहे म्हणून त्याची उपासना, ‘दास-मारुती’ आणि ‘वीर-मारुती’ या दोन्ही रूपांमध्ये केली जाते. श्रीरामरायाच्या रक्षणार्थ प्राणांची बाजी लावणारा, द्रोणागिरी पर्वत लीलया उचलून आणणारा व श्रीरामलक्ष्मण या बंधुद्वयांच्या पाठीशी सावलीगत उभा ठाकलेला हनुमान ‘दास्य’वृत्तीचा परमोच्च बिंदू गाठतो आणि त्यासोबत हातातील गदेचे सामर्थ्य दाखवून रावणाची लंकानगरी जाळत, अशोकवनाचा विध्वंस करीत, राम-रावण युद्धात अतुलनीय पराक्रम करून असुरांना जेरीस आणणारा ‘वीर’वृत्तीचा हनुमान स्वतःची ‘योद्धा’ अशी ओळखदेखील दृढ करतो.
‘दास्यत्त्व’ आणि ‘शूर-वीरत्त्व’ यांच्यासोबतच असामान्य बुद्धिचातुर्याचा एक महत्त्वपूर्ण छुपा पैलूदेखील हनुमानाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दडला आहे असे दिसून येते. त्याच्या बुद्धिकौशल्याचा अचूक वापर करीत प्रभू रामचंद्र त्यास आपला ‘दूत’ म्हणून लंकेस रावणाकडे पाठवितात. तिथे गेल्यावर श्रीरामाचा पक्ष जोरकसपणे मांडण्याचे त्याचे नैपुण्य दिसून येते तसेच पुढे बिभिषणास आश्रय देतेवेळी हनुमानाने दाखविलेल्या चातुर्यामधून त्याचे वाक्पटुत्व आणि वैचारिक चुणूकही ठळकपणे जाणवते. म्हणूनच समर्थ रामदास त्याचा गौरव ‘धूर्त’ या संबोधनाने करतात. रामायणातील हनुमान शूर-वीर, बुद्धिवंत, राजनीतिज्ञ, शास्त्र-प्रवीण, साहसी, वक्तृत्वपटू असे अनेक उत्तम आणि अलौकिक गुण प्रकट करणारा आहे म्हणूनच सनकादी ऋषी, हनुमंताकडून ‘राम-तत्त्व’ समजून घेताना दिसून येतात.
हनुमान हा ‘रुद्रावतार’ म्हणूनही परिचित आहे. श्रीशंकराच्या कृपाशिर्वादाचे कवच लाभलेला हा हनुमंत, ‘रुद्रावतारी पंचमुखी हनुमान’ या रुपात अनेकविध ठिकाणी पूजनीय आहे. ‘पंचमहाभूतांचे एकत्रीकरण पंचमुखी हनुमंतामध्ये झाले आहे’ या धारणेमुळे अनेक उपासक आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाची स्थापना करतात. यामुळे दुष्ट प्रवृत्ती आणि विनाशकारी तत्त्व वास्तूच्या अवतीभोवतीदेखील फिरकत नाही अशी त्यांची भूमिका असते. या रुद्रावतारी हनुमंताची मूर्ती दक्ष, सावध, सज्ज व आक्रमक स्वरूपात पाहावयास मिळते. त्याच्या पायाखाली दैत्य असतो. अशा या वीर हनुमानाची मूर्ती गावच्या वेशीवर किंवा वस्तीच्या मधोमध मंदिरात पाहावयास मिळते.
हिंदुस्थानात, विशेषतः महाराष्ट्रात हनुमानाचे ‘स्थान’माहात्म्य ठळकपणे दिसून येते. श्रीराममंदिरात पंचायतन स्वरूपात तो श्रीरामाचरणी नतमस्तक झालेला पाहावयास मिळतो किंवा श्रीराममंदिराच्या गाभाऱयासमोर ‘दास’रूपात हात जोडून स्वतंत्रपणे उभा राहिलेला आढळतो. प्रत्येक गावात आणि खेडय़ापाडय़ात हनुमानाचे मंदिर हटकून आढळते. शक्तीची उपास्य देवता म्हणून समर्थ रामदासांनी अनेक ठिकाणी श्रीहनुमंताची देवालये स्थापन केली. त्यातील अतिशय प्रसिद्ध अशा 11 मारुती मंदिरांचे ‘स्थान’माहात्म्य पुढील लेखात जाणून घेऊ.
[email protected]





























































