आनंदाची गोष्ट

1077

>> डॉ. विजया वाड

बागेतल्या सख्यांच्या आठवणींनी राधा बेचैन होत होती. सूनवासाच्या कथा हो! नुकतीच प्रमिला आपल्या सुनेबद्दल म्हणाली होती, ‘‘म्हटलं, जरा नवं लग्नय तोवर साडी नेस ऑफिसात जाताना तर एक तास लावते टवळी. ‘इधर पिन, उधर पिन’ करत! मग सगळय़ांना नमस्कार वाकवाकून! बॅबॅ नॅमष्कार कॅरते! की हे चढले  डोंगरावर. पूर्वी दहा पोळय़ा करायचे आता बारा करते. डबा तिच्या हातात देते. ‘थँक्यू निमिषची आई’ वा! काय सर्टिफिकेट नं!’’

राधाला वाटलं एकतीसला विनिता आणि करण मधुचंद्राहून येणार. कसं उगवतं आपलं नववर्ष कुणास ठाऊक? शक्यतो आपण जमवून घेऊया. आपला करण घेऊन पळायची नाहीतर दूर! एकुलता माझा लाडका! तिला रिझर्व्ह बँकेच्या क्वार्टर्स मिळतात असं तिचा मामा नाक फुगवून सांगत होता लग्न ठरलं तेव्हा! काय आहे देवी अंबाबाईच्या मनात न कळे! आपण वादाचा विषयच काढायचा नाही. मारुतीराव स्वस्थ चित्त होते. ते तसेच! ‘तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे’ या वृत्तीचे ना!

तर एकदाचे राधाचे ‘सून-मुलगा’ प्रकर्ण ‘हनि’ गोळा करून अवतीर्ण झाले. मुलगी अघळपघळ पंजाबी ड्रेसात होती. व्यवस्थित ओढणी घेतलेली होती. विनिता ‘रामचंदानी’ होती आणि करण ‘देवस्थळी’ होता. काळजी वाटतेच ना! सख्या तर म्हणाल्या, ‘आता पापड के सीवा नो खाना! बरं का राधा!’ मारुतीराव मात्र म्हणाले होते, ‘‘अहो राधाबाई लोक इंटरनॅशनल सुना आणतात घरी. नि एल्डर्स जमवून घेतात. तुमची सून तर फक्त उल्हासनगरहून दादरला येतेय. काय काळजी करता? बरं तिला उत्तम मराठी येतं. कल्याणच्या ओक हायस्कुलात शिकली ना.’’

किती ते कौतुक सासरे सुनेच्या बाबतीत जरा पार्शलच असतात नाही तरी. असो! राधाला आता चुप्प बसायची सवय करायलाच हवी होती. ‘‘आई, चहा करता फक्कडसा? घसा गरम करते. शिमल्याला जाम थंडी होती!’’ अगं शिमल्याहून दादरला येईपर्यंत बर्फाची सुद्धा हॉट वॉटर बॅग होईल. मनात काय काय येतं ना. पण सासूनं चूप. चहा दिला.

‘‘थोडं बोलायचं होतं चहानंतर.’’ इति. रामचंदानी मॅडम.

काय बोलणार आता या नव्या सुनबाई? तिने हिंमत बांधली. चहापान झाले.

‘‘श्रीराधाकृष्ण जयजय! जयजय राधाकृष्ण हरी! आई, बाबा मला रिझर्व्ह बँकेच्या क्वार्टर्स मिळतात. पण आपणाला मी नको असेन तरच मी अप्लाय करीन. नाहीतर तुमच्या सोबतच राहणेच पसंत करीन. मला असं वाटतं की, पोळीभाजीसाठी आपण एक कूक ठेवू. न तुम्हास कामाचा ताण, न मला. राधाकृष्णाच्या कृपेनं मला सत्तर हजार पेमेंट महावार मिळते. मला पिताश्री नाहीत. मी आईस वीस हजार नि आपणास तीस हजार घरखर्चास देईन. उरलेले मजपाशी! चालेल ना?’’ तिने सासू-सासऱ्याकडे बघून विचारले.

‘‘अगं चालेल काय? पळेल.’’ मारुतीराव उत्तरले.

‘‘माझी माय उल्हासनगरात एकटी आहे. दोन रविवार मी तिला आपल्यात आणेन, दोन रविवार मी उल्हासनगरात जाईन. मी नि माझी माय, तुम्ही नि तुमचा मुलगा आपण अशी मौज करूया. चालेल का आपणा दोघांना?’’

‘‘मला फार आवडेल’’ राधा मनापासून म्हणाली. महिन्यातून दोन रविवार सून आऊट! नि फक्त आपली नि मुलाची डेट? कोणाला नाही आवडणार?

 ‘‘लिव्ह ऍण्ड लेट लिव्ह शुड बी द पॉलिसी असं वाटतं मला आई-बाबा. राग आला तर तोंडावर व्यक्त करू. पण नवा दिवस नव्या उत्साहाने सुरू करू असं वाटतं. रात गेली की मतभेद संपावेत.’’

‘‘सुने, मनावरचं सारं ओझंच गेलं बघ. आपण एकत्र राहू. एकत्र सारं सुख अनुभवू. फक्त एकच सांगते विनिता तुला, बाहेर आपल्या या सुखाची वाच्यता नको. दृष्ट लागेल गं!’’ राधा हळवी झाली.

‘‘आई, सर्वांना सांगा! अहो लपवाछपवीच नको. कुणाला हा विचार आवडेल सांगता येतं का? छान, आनंदी फॅमिलीत वाढ झाली तर मजाच ना!’’ सून म्हणाली. घराला आनंदाचं तोरण नववर्षासाठी लागलं! प्रसन्ना, सुखवदना सून आली होती ना! घरोघरी असे सुख वाढो प्रिय वाचकांनो!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या