लेख : सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि माणुसकीचा झरा!

2264

>> अमोल शरद दीक्षित

सांगली कोल्हापूर जिह्यातील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ चालूच आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरूनही मराठी माणसांनीदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धान्य, बिस्किटे, कपडे, ब्लँकेट, साफसफाईसाठी फिनेल आदी ट्रकभरून साहित्य सांगली कोल्हापूर जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचविले. या पूरग्रस्त परिस्थितीत हिंदुस्थानी लष्कराच्या सैनिकांनी एनडीआरएफच्या सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या महापुराच्या निमित्तानेएकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथया संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचीती मात्र नक्कीच आली.

2005 व 2006 या वर्षातील जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील कृष्णा नदीला आलेला पूर म्हणजे सांगलीकरांसाठी धडकी भरवणारा होता, पण तब्बल 13 वर्षांनंतर या 2005 च्या पुराचेही विक्रम मोडीत काढत 2019 च्या महापुराने सांगलीकरांच्या काळजाचा पुन्हा एकदा थरकाप उडविला. 12 दिवसांपूर्वी निम्मे सांगली शहर, कोल्हापूर शहर आता या दोन्ही जिह्यांतील ग्रामीण भाग या प्रलयकारी महापुराने वेढला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हिंदुस्थानी लष्कर आणि एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. हिंदुस्थानी लष्कराबरोबरच कोल्हापूर आणि सांगली जिल्हा प्रशासन, सांगली पोलीस यंत्रणा, विविध पक्षांचे कार्यकर्ते, विविध संघटना व स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या सहकार्याने ‘सांगलीकरांनी’ या भयंकर महापुराला धैर्याने तोंड दिले. गेले 12 ते 14 दिवस प्रत्येक जण प्रत्येकाला पुराच्या पाण्यातून वाचविण्यासाठी धडपडत होता, एकमेकास सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. यानिमित्ताने सांगलीच्या या प्रलयकारी महापुरातदेखील ‘माणुसकीचा झरा’ मात्र ओसंडून वाहताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील अतिदुष्काळी भाग वगळता राज्यात सर्वत्र आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर, कोयना धरण परिसर तसेच सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्हय़ांना 26 जुलैपासूनच मुसळधार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. कोयना धरण अतिक्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग करणे भाग होते. हे विसर्ग केलेले पाणी सांगली व कोल्हापूर जिह्यांतील नद्यांना मिळते. सततच्या पावसाने सांगली जिह्यातील कृष्णा नदी व कोल्हापूर जिह्यातील पंचगंगा नदी आधीच दुथडी भरून वाहू लागली होती. यातच पुढे कर्नाटकात अलमट्टी धरणातून कमी वेगाने होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे अखेर सांगली व कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला. सांगली शहर व परिसर तसेच जिह्याच्या अनेक ग्रामीण भागांत मातीची व साधी घरे वाहून गेली. दुकानदार, व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले. सांगली जिह्यातील ब्रह्मनाळ येथे पुराच्या पाण्यातून सुटका करून घेताना बोट उलटल्यामुळे सुमारे 15 जणांना स्वतःचा जीव गमवावा लागला तर सांगली शहरातील पुराच्या पाण्यात जवळपास 4 जण मृतावस्थेत आढळले.

सांगलीच्या या महापुराची भीषणता म्हणजे निसर्गाने जणू थट्टाच केली होती. तरीही या महापुरात माणुसकीचे दर्शन घडले. जात-पात, धर्म, भाषा व प्रांत विसरून प्रत्येक जण प्रत्येकाला वाचवायला व मदत करण्यास पुढे सरसावत होता. या महापुराची भीषणता पाहूनच हिंदुस्थानी लष्कर आणि एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. महापुरात जिथे जाणेही शक्य नाही तिथेसुद्धा जाऊन हिंदुस्थानी लष्कर व रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी नागरिकांना पुरातून सुरक्षितरीत्या बाहेर काढले. इतकेच नव्हे तर शक्य असेल त्या ठिकाणच्या गाय, म्हैस व कुत्री अशा मुक्या प्राण्यांनाही वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुराच्या पाण्यात ज्यांचे घर बुडाले असे नागरिक व पुराच्या पाण्यापासून वाचणाऱ्या पूरग्रस्तांना विविध महाविद्यालये, शाळा, आश्रम या ठिकाणी राहण्याची व जेवण्याची सोय स्थानिक पातळीवरील प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी करून दिली. जे घराबाहेर पडले नव्हते व पुराच्या पाण्यामुळे घराच्या टेरेसवर (गच्चीवर) अडकून होते त्यांना हिंदुस्थानी वायुदलाच्या हेलिकॉफ्टरमधून तयार अन्नाचे वाटप करण्यात आले.

कोल्हापूर-सांगली शहरातील वर्तमानपत्रे व विविध वृत्तवाहिनींच्या काही स्थानिक प्रतिनिधींना पुराच्या पाण्यामुळे राहते घर सोडणे भाग होते. अशाही परिस्थितीत या प्रतिनिधींनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले आणि या महापुराच्या प्रत्येक घटनेचे विवरण करून आपले कर्तव्य ठामपणे बजाविले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी सिने व नाटय़सृष्टीतील कलाकार पुढे सरसावले. सर्वसामान्य नागरिक, मुंबई व महाराष्ट्राच्या जीवावर अब्जोपती झालेले हिंदी सिनेसृष्टीतील काही कलाकार (‘नाव मोठे पण लक्षण खोटे’ असे कलाकार) वगळता काही मोजक्या कलाकारांनी पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी दानशूरता दाखविली. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, शिर्डी साईबाबा संस्थान यांसह अनेक मंदिर ट्रस्टनीही पूरग्रस्तांसाठी भरघोस मदत केली. मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यातील दुष्काळी भागातील गावांनीही पूरग्रस्तांना मदत करण्याची तयारी दर्शविली. या भागातील अनेक तरुणांनी पूरग्रस्त भागात येऊन त्यांना वाचविले व मदत करण्याच्या कामात मोठा वाटा उचलला. सांगली व कोल्हापूर जिह्यातील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ चालूच आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून दादरा व नगरहवेली या केंद्रशासित राज्याची राजधानी असलेल्या ‘सिल्व्हासा’ या शहरातील मराठी माणसांनीदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धान्य, बिस्किटे, कपडे, ब्लँकेट, साफसफाईसाठी फिनेल आदी ट्रकभरून साहित्य सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचविले.

या पूरग्रस्त परिस्थितीत हिंदुस्थानी लष्कराच्या सैनिकांनी व एनडीआरएफच्या सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली. म्हणूनच सांगलीतील अनेक महिलांनी सांगलीमध्ये आलेल्या लष्कराच्या सैनिकांच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनापूर्वीच राखीपौर्णिमा साजरी केली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुस्लिम समाजदेखील मागे नव्हता. ‘बकरी ईद’चा खर्च टाळून ते पैसे व वस्तूस्वरूपात मदत मुस्लिम समाजाने जाहीर केली. मिरजेतील गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव कालावधीत स्वागत कमान न उभारता तो निधी पूरग्रस्तांसाठी जाहीर केला. वैयक्तिक पातळीवरदेखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही हात पुढे आले. काहींनी आपली पूर्ण महिन्याची पेन्शन पूरग्रस्तांसाठी देऊ केली, तर काही गॅरेज व्यावसायिकांनी इतके दिवस पुरात बुडालेल्या दुचाकी गाडय़ा मोफत दुरुस्त करून देण्यास सुरवात केली. पुराच्या पाण्यातून आलेला कचरा, चिखल साफ करण्यासाठी मुंबईसह राज्यातील विविध महापालिका व नगरपालिकांच्या स्वच्छता टीमदेखील सांगली-कोल्हापुरात आल्या आहेत. पूरग्रस्तांच्या आरोग्य तपासणीसाठी शहर व जिह्याबरोबरच राज्यातील इतर ठिकाणाहूनही डॉक्टर व परिचारिकांची पथके दाखल झाली आहेत. अक्षरशः तांडव मांडलेल्या या महाप्रलयकारी पूरपरिस्थितीतून नागरिकांना सावरायला आणखी काही वेळ लागेल, पण या महापुराच्या निमित्ताने ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचीती मात्र नक्कीच आली.

आपली प्रतिक्रिया द्या