>> गुरुनाथ तेंडुलकर
15 ऑगस्ट 1947 साली आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणी कोणी कोणकोणत्या प्रकारचं योगदान दिलं याबद्दल खूप काही माहिती उपलब्ध आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या प्राक्रियेमध्ये अहिंसेचा वाटा किती आणि सशस्त्र क्रांतीचा वाटा किती? याबद्दल अनेक जणांनी अनेक वेळा ऊहापोह केला आहे, पण आज आपण इथे या लेखातून स्वतंत्र म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
परवा येऊ घातलेल्या 15 ऑगस्टच्या म्हणजेच हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने केलेला हा लेखनप्रपंच… 15 ऑगस्ट 1947 साली आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, देश स्वतंत्र झाला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणी कोणी कोणकोणत्या प्रकारचं योगदान दिलं याबद्दल खूप काही माहिती उपलब्ध आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या प्रािढयेमध्ये अहिंसेचा वाटा किती आणि सशस्त्र क्रांतीचा वाटा किती? याबद्दल अनेक जणांनी अनेक वेळा ऊहापोह केला आहे, पण स्वतंत्र म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात जाणून घेऊया…
स्वतंत्र या एका शब्दात दोन शब्द समाविष्ट आहेत. स्व आणि तंत्र. स्वत:च्या तंत्रानुसार किंवा स्वतच्या इच्छेनुसार वागण्याची मुभा असणं म्हणजे स्वातंत्र्य. म्हणजेच कोणत्याही बाह्य प्रतिबंधाशिवाय मनाजोगतं, हवं ते करता येणं म्हणजे स्वातंत्र्य. पण हे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने अस्तित्वात असतं का? असू शकतं का? असावं का? याचा बारकाईने विचार केला तर प्रत्येकाला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य जर मिळालं तर फक्त अराजकताच माजेल. ‘बळी तो कानपिळी’ या न्यायाने दांडगे लोक दुर्बलांवर अत्याचार करतील. जंगलाचा न्याय येईल आणि माणसं अधिकच जनावरासारखी वागतील. एखाद्या हरणाला वाटलं की, या जमिनीवरचं गवत खावं तर ते हरीण त्या कोणाच्याही परवानगीशिवाय त्या कुरणात शिरून मनमुराद चरतं. त्याच वेळी वाघाला वाटलं की, हरणावर झडप घालून त्याला मारावं तर तो हरणावर झडप घालून मारतो. एखादा साप कोणत्याही पक्ष्याच्या घरट्यात शिरून त्यातली पिल्लं बेधडकपणे मटकावतो. एखादा मुंगूस त्याच सापावर हल्ला करून त्याला मारून खातो. पाणी प्यायला तळ्यावर आलेल्या रानगाईंवर पाण्यातली मगर हल्ला करून ओढून नेते. हा झाला जंगलाचा न्याय. तिथे सर्व प्राण्यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात. योग्य काय आणि अयोग्य काय याचे कोणतेही नियम नसतात. तिथे सर्व प्राणिमात्र खऱ्या अर्थाने स्व-तंत्र असतात. तिथे चालतो फक्त ताकदीचा कायदा!
आपण माणसं आहोत. आपल्याला अशा प्रकारचं स्वातंत्र्य नसतं. असताही कामा नये. स्व-तंत्राबरोबरच योग्य-अयोग्य, न्याय-नीतीची बंधनं असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या इथे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात विश्वात्मक देवाजवळ एक मागणं मागितलं आहे त्याची आठवण होते.
ते म्हणतात…
जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ।।
ज्याला जे जे हवं त्याला ते ते सर्व मिळावं. ही स्वातंत्र्याची खरी संकल्पना. ‘सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे,’ अशी ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना करतात. म्हणजे चोराला चोरी करायला मिळू दे, दारुडय़ाला भरपूर दारू मिळू दे. व्यभिचार, भ्रष्टाचार करण्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध न होवो. खोटे-नाटे धंदे करणाऱ्याला तशा प्रकारच्या संधी उपलब्ध होवो, असा त्याचा अर्थ आहे का? अशा प्रकारची अनैतिकता आणि पापाचरणाला प्रोत्साहन देणारं स्वातंत्र्य ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहे का? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पसायदानाच्या आधीच्या ओळी जाणून घ्याव्या लागतील.
खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।।
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।।
माऊली म्हणतात, खळांची म्हणजेच दुर्जनांची व्यंकटी, म्हणजे दुष्ट बुद्धी नष्ट होऊ दे. दुर्जन नष्ट होवो असं माऊली म्हणत नाहीत. ते म्हणतात, ‘दुर्जनांची दुर्बुद्धी लोप पावो. त्यांना सत्कर्माची गोडी लागो. चांगली कामं करण्यासाठी त्यांची बुद्धी कार्यरत होवो. प्रत्येक प्राणिमात्राला परस्पराबद्दल मैत्र निर्माण हावे.
मैत्र निर्माण होण्यासाठी माणसाच्या मनातील षडरिपू म्हणजेच सामाजिक उन्नतीच्या मार्गातील सहा प्रमुख शत्रू अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे नाहीसे होणे आवश्यक आहे. जिथे मैत्र निर्माण होते तिथे परस्परांबद्दल कोणत्याही प्रकारची असूया नसते, द्वेष नसतो. असतं फक्त सहकार्य, ममत्व, आपुलकी, जिव्हाळा, मैत्री, प्रेम!
त्यानंतर माऊली मागतात, ‘दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्मसूर्ये पाहो.’ तिमिर म्हणजे अंधार. हा अंधार अज्ञानाचा असेल, दारिद्रय़ाचा असेल, अनारोग्याचा असेल, मानसिक दुर्बलतेचा असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा असेल. हा अंधार दूर व्हावा. संपूर्ण विश्व स्वधर्मसूर्याने उजळून जावं. प्रत्येकाला आपला नेमका धर्म कोणता याचं ज्ञान प्राप्त व्हावं. आपल्या कर्तव्याची नेमकी जाणीव होऊन त्यानुसार कर्म करण्याची बुद्धी लाभावी आणि त्यानंतरच… ‘जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ।।’ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून जे मागितलं आहे ते खरं स्वातंत्र्य….
आज आपला हिंदुस्थान देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला असला तरी इतर अनेक प्रकारच्या गुलामगिरीत अडकलेला आहे. अद्यापही सर्वसामान्य जनतेला मूलभूत हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी झगडावं लागतंय. अनेकांना तर आपले अधिकार आणि आपली कर्तव्य यांची जाणीवदेखील झालेली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात निरक्षर अडाणी होते. आज सुशिक्षित अडाण्यांची संख्या त्याहून कितीतरी पटीने अधिक वाढलेली आढळते. पूर्वी जात-पात भेद होता. आता तर जाती-जातीबरोबरच, धर्म, प्रांत, भाषा आणि इतर अनेक प्रकारच्या भिंती उभ्या राहिलेल्या दिसतात.
स्वतला धार्मिक म्हणवून घेणारे तथाकथित संत-महंत, बुवा-बाबा भोळ्या भाबडय़ांचा बुद्धिभेद करून त्यांना भडकवत आहेत. स्वतचं महत्त्व आणि स्थान अबाधित राखण्यासाठी अडाणी लोकांचा गैरफायदा घेत आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मीडिया आणि सोशल मीडियातून जे काही प्रसारित, प्रचारित केलं जातं त्यात सामाजिक उन्नतीसाठी केलेलं योगदान किती आणि सवंग करमणुकीच्या नावाखाली चालवेला थिल्लरपणा किती याबद्दल बोलायचं म्हणजे कोळसा उगाळण्यासारखंच आहे. कितीही उगाळा…तो काळाच राहणार.
राजकारण्यांबद्दल तर काही बोलायची सोयच नाही. असंगाशी संग करून झालेल्या युती म्हणजे देशाच्या प्रगतीच्या मार्गातील एक पनौतीच असते. कालपर्यंत एकमेकांचे गळे आवळणारे आज सत्तेसाठी गळ्यात गळे घालताना आपण पाहत आहोत. आज एकमेकांच्या हातात हात घालून हिंडणारे राजकारणी संधी मिळताच एकमेकांच्या पायात पाय घालून पाडायला टपलेले दिसत आहेत. गटबाजीबद्दल तर बोलण्याची सोयच राहिलेली नाही.
स्वतला मागास म्हणवून घेणारा आणि आरक्षणाच्या कुबडय़ांच्या आधारे चालणारा समाज हा कायम अपंगच राहण्याचा धोका असतो याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून आरक्षणांसाठी आंदोलनं होताना दिसत आहेत आणि हे सगळं देश स्वतंत्र होऊन 77 वर्षांनंतरही घडतंय हे देशवासीयांचं दुर्दैवच नव्हे का?
देश इंग्रजांच्या सत्तेपासून स्वतंत्र झाला, पण देशातील सर्वसामान्य जनता खऱ्या अर्थाने स्व-तंत्र झालीच नाही. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरून तिरंगा डौलाने फडकू लागला. पण म्हणूनच इथे आपण प्रत्येकाने स्वतपुरता विचार करून भगवद्गीतेतील वचनानुसार ‘उद्धरेत आत्म आत्मानम्’ आपणच आपला उद्धार करून घ्यायला हवा. त्यासाठी माऊलींच्या प्रार्थनेनुसार ‘तिमिर… म्हणजेच अंधार’ नष्ट करण्याचा प्रयत्न करायला हवा. हा अंधार दूर करण्यासाठी कुणालाही दूषणं न देता किंवा हा अंधार कुणामुळे झाला याबद्दल वाद न घालता, स्वतचा दिवा स्वतच लावायला हवा. आपल्या आयुष्यातील अंधार आपणच दूर करायला हवा.
योग्य शिक्षण घेऊन, उत्तम शारीरिक, मानसिक आरोग्य राखून, धंदा व्यवसायातून पुरेसं अर्थार्जन करून, कोणत्याही प्रकारच्या बाह्य व्यसनांना किंवा प्रलोभनांना-मोहांना बळी न पडता आपलं नित्यकर्म प्रामाणिकपणे पार पाडणं ही अंधार दूर करण्याच्या प्रािढयेतील पहिली पायरी. त्यानंतरची पायरी म्हणजे आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं त्याची व्याप्ती वाढवून आजूबाजूच्यांना त्यात समाविष्ट करून घेणं, इतरांच्या आयुष्यात दिवा लावणं, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करणं, मिळवलेलं ज्ञान आणि धन समाजाच्या उन्नतीसाठी वापरणं. ‘सर्वेपि सुखिन सन्तु।’ हे आयुष्याचं ब्रीदवाक्य ठरवून त्यानुसार आचरण करणं, हे खरं स्वातंत्र्य.
स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाला वाटतं ते करण्याचा अधिकार नव्हे, तर विचार आणि विवेक यांची सांगड घालून जबाबदारीनं वागणं म्हणजे स्वातंत्र्य. मला सुखी होण्याचा अधिकार तर नक्कीच आहे. पण ‘मी सुखी होताना दुसरा कुणी दुःखी होणार नाही ना?’ याची जाणीव सतत जागृत ठेवणं म्हणजे स्वातंत्र्य.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसतो…नसावा… स्वातंत्र्यासोबतच फार मोठी नैतिक आणि सामाजिक जबाबदारी निभावावी लागते. आपल्यापैकी प्रत्येक जण जर अशा प्रकारे जाणीवपूर्व स्वतंत्र झाला तर आणि तरच संपूर्ण समाज व पर्यायाने देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?