लेख – उद्योगविश्व पूर्वपदावर येण्याचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. अनंत सरदेशमुख

कोव्हीड-19 या पुनःपुन्हा उद्भवणाऱया, अनिश्चितता फैलावणाऱया महामारीला समर्थपणे तोंड देऊन हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेने, उद्योगाने आपला पवित्रा बदललेला दिसतो  आणि हा पवित्रा आश्वासक, हळूहळू पावले टाकणारा पण अतिशय आत्मविश्वासाचा वाटत आहे. आर्थिक वर्ष 2019-2020च्या अगदी शेवटाला जागीच खिळलेली अर्थव्यवस्था आणि उद्योगजग कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर 2020-21च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीनंतर थोडी हालचाल करू लागले. परंतु दुसऱया लाटेत परत अडखळले. आता चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीनंतर पुन्हा महामारीच्या आधीच्या पूर्वपदावर येऊन उद्योगविश्व झेप घेण्यास तयार झाले आहे.

कोरोना महामारीचा काळ सरकार, व्यापार, उद्योग,  व्यक्ती, संस्था या सर्वांनाच बरेच काही शिकवून गेला. हा काळ जरी नक्कीच खराब गेला असला तरी काही बाबतीत तो फायद्याचासुद्धा ठरला आहे. या विधानाची सत्यता कोरोना पश्चात घडत असलेल्या सर्वच घटनांचे विश्लेषण केल्यावर ध्यानात येईल. सरकार, उद्योग, व्यापार आणि आपण सर्वच या महामारीतून खूप काही शिकलो. यातून मला वाटते पुढील काळासाठी आपण सक्षम झालो आहोत.

या सणासुदीच्या हंगामात भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे मुख्य दर्शक ज्याला इंग्रजीत ‘मॅक्रो इकोनॉमिक इंडिकेटर्स’ म्हणतात ते शेअर बाजार, ग्राहकमूल्य निर्देशांक, महागाई, व्याज दर हे जरी चांगले व स्थिर दिसत असले, बेरोजगारी जरी चिंताजनक वाटत असली तरी वाढीव सकल राष्ट्रीय उत्पादनासह ते प्रगतीचे दर्शक वाटत आहेत. याबरोबरच साचलेली का असेना वाढलेली ग्राहक मागणी आश्वासक वाटत आहे. म्हणूनच वाईट दिवस संपत आले आहेत असे वाटते. कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या जवळजवळ पाच महिन्यांनंतर अर्थव्यवस्था, उद्योग निर्देशांक बरेच सुधारलेले दिसत आहेत.

या सणासुदीच्या दिवसातच आंतरराष्ट्रीय नाणे निधी या संस्थेने आपला हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भातील अंदाज जाहीर केला. त्यानुसार हिंदुस्थानी अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात सुमारे 9.5 टक्के दराने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पुढील वर्षी ती सुमारे 8.5 टक्के दराने वाढेल असेही हा अंदाज म्हणतो. याचा अर्थ येणाऱया काळात हिंदुस्थानी अर्थव्यवस्था जगातील सर्वात झपाटय़ाने प्रगती करणारी मोठी अर्थव्यवस्था बनणार असाच होतो. रिझर्व्ह बँकेनेही चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा अंदाज 10.5 टक्के इतका वर्तवला आहे. गेल्या वर्षातील लॉकडाऊनमुळे 2020-21चे सकल राष्ट्रीय उत्पादन सुमारे 7.3 टक्क्यांनी घसरले होते आणि आता ते वाढत आहे.

बहुतेक हिंदुस्थानी ग्राहकांची विशेष आवडीची खरेदी म्हणजे सोने. एप्रिल ते सप्टेंबर या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोन्याची आयात सुमारे 1.80 लाख कोटीच्या घरात पोहोचली. गेल्या वर्षीच्या याच काळात ती फक्त 51 हजार कोटींच्या आसपास होती. हे आकडे नुसते सोन्याची वाढलेली मागणीच दाखवत नाहीत तर ग्राहकांची खरेदी मनःस्थिती सुधारली आहे, मह्मारीची अनिश्चितता, काळजी दूर होत आहे, हेही यातून दिसून येत आहे.

लॉकडाऊनची बंधने आता मोठय़ा प्रमाणात शिथिल झाली आहेत. आता लवकरच स्थगित झालेले अनेक लग्न समारंभ, इतर समारंभ पूर्वीच्याच शानशोकित, थाटामाटात साजरे होऊ लागतील आणि त्यामुळेच विविध वस्तूंच्या मागणीला जोर चढेल असेपण दिसत आहे.

तेलाच्या व इतर कच्च्या मालाच्या मोठय़ा किंमत वाढीचा फटका अनेक औद्योगिक घटकांना बसला आहे. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा ग्राहक किंमत निर्देशांक ऑगस्ट महिन्याच्या 5.30 टक्क्यांपेक्षा सप्टेंबर महिन्यात 4.35 टक्के या खालच्या पातळीला होता आणि याचे मुख्य कारण म्हणजे पावसाची चांगली कृपा, भाजीपाल्याचे चांगले उत्पादन आणि इतर शेतमालाचा चांगला हंगाम. हे सर्वच अर्थव्यवस्था व उद्योग यासाठी पोषक आहे.

जगातील किंवा हिंदुस्थानातील वाहन उद्योग हा सर्वच उद्योगांची माता समजाला जातो. यामागचे कारण म्हणजे या उद्योगाचे इतर उद्योगातील महत्त्व. वाहन उद्योगातील प्रवाशी वाहनांच्या विक्रीत या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत गेल्या वर्षीच्या सहामाहीपेक्षा सुमारे 51 टक्के वाढ झाली. वाहतूक, मालवाहतूक करणारी व्यापारी वाहने हे अर्थव्यवस्थेतील हालचाल दाखवणारे दर्शक असतात. त्यांची विक्री या सहामाहीत गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 65 टक्क्यांनी वाढली. म्हणजेच अर्थव्यवस्था, उद्योग उत्पादनांची गती वाढलेली आहे. परंतु याचबरोबर वाहन क्षेत्रातील सर्वात मोठा व जास्त मागणीचा भाग म्हणजे दुचाकी वाहने, यांची विक्री जरी वाढली तरी मागच्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत विक्री ही फक्त 8.9 टक्के वाढली. याचा अर्थ ग्रामीण आणि निमशहरी भागातील मागणीने हवा तसा जोर पकडलेला नाही. या उद्योगातील प्रगती अशीच चालू राहून पुढील पाच वर्षांत हिंदुस्थानचा वाहन उद्योग हा जगात तिसऱया क्रमांकावर असेल असे अंदाज वर्तविले जात आहेत.

 कोरोना महामारीच्या काळात हिंदुस्थानी वाहन उद्योगाने प्रंचड लवचिकता दाखवून दिली. सरकारच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन योजना, तसेच जुन्या वाहनांची मोडीत काढण्याची योजना, विद्युत वाहन प्रोत्साहन योजना इत्यादी योजना या उद्योगाला पुढील प्रगती व वाढीसाठी मदत करत आहेत. या उद्योगात नवे तंत्रज्ञान झपाटय़ाने येत आहे. वाहन उद्योग आता विद्युत वाहने, स्वयंचलित वाहने या दिशेने जोराने प्रगती करत आहे. हिंदुस्थानी विद्युत (इलेक्ट्रिक) वाहन बाजार हा 2025पर्यंत 50 हजार कोटींचा असेल असा एक अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंदुस्थानी वाहन उद्योगाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात या विद्युत वाहनांच्या उत्पादनाने झाली आहे असेच म्हणावे लागेल.

आयटी क्षेत्र हे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे आहे. हे क्षेत्र निर्यात, चालू खात्यावरील तूट, परकीय चलन साठा, व्यापार समतोल (बॅलन्स ऑफ ट्रेड) या सर्वच दृष्टीने महत्त्वाचे आहे. 1999 ते 2021 या काळात या क्षेत्राचा आकार हा 30 हजार कोटी रुपये ते 14.5 लाख कोटी एवढा वाढलेला आहे आणि हा हिंदुस्थानी उद्योग जगातील एक मोठा उद्योग बनला आहे. हा उद्योग आपल्या राष्ट्रीय सकल उत्पादनाला सुमारे 8 टक्क्यांचा हातभार लावतो. या क्षेत्राची निर्यात सुमारे 11 लाख कोटींच्या आसपास आहे. गार्टनर या व्यवस्थापन सल्लागार, संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार या शतकाच्या दुसऱया दशकात उद्योगाचा आयटी सुविधांवर खर्च सुमारे 2.5 टक्के होता, तो चालू दशकातील पहिल्या तीन वर्षांत 9 टक्के होण्याचा अंदाज आहे. या अंदाजात नक्कीच काहीतरी तथ्य आहे आणि याचा फायदा जगातील मोठय़ा हिंदुस्थानी आयटी क्षेत्राला होणारच आहे. हे क्षेत्र पुढच्या प्रगतीच्या दिशेने प्रवास करत आहे आणि या प्रगतीबद्दल गुंतवणूकदारांनासुद्धा विश्वास आहे. म्हणूनच गेल्या वर्षी शेअर बाजारातील या क्षेत्राच्या निर्देशांकाने सुमारे 55 टक्के वाढ दाखवली.

गेल्या सुमारे सात वर्षांत उत्पादन क्षेत्राची वाढ खुंटलेलीच आहे. ही वाढ अपेक्षित वाढीपेक्षा कमी म्हणजेच वार्षिक 3-4 टक्के इतकीच होत आहे. उत्पादन क्षेत्र सकल राष्ट्रीय उत्पादनांत तेवढाच म्हणजे 15 टक्क्यांचा हिस्सा देत आहे. रोजगार निर्मितीच्या बाबतीतसुद्धा हीच कहाणी दिसून येते. कोव्हीडची परिस्थिती लक्षात घेऊनसुद्धा आधीच्या आणि आत्ताच्या काळातसुद्धा रोजगार निर्मिती ही वार्षिक एक कोटीहून कमी आहे. गेली काही वर्षे 20-24 वर्षे या गटातील बेकारी वाढतच आहे. ही बेकारी 2017मध्ये सुमारे 42 टक्के होती. ती 2019पर्यंत 63 टक्के झाली. थोडक्यात मेक इन इंडिया हा कार्यक्रम  जमिनीवर उतरलाच नाही. पुन्हा एकदा ‘योजना चांगल्या पण अंमलबजावणी ढिली’ असेच म्हणावे लागेल. या नव्या परिस्थितीत पुन्हा एकदा झेप घ्यायला तयार आहोत तेव्हा या झेपेला, प्रगतीला शक्ती ही आपण फक्त चांगल्या योजनांच्या त्वरित अंमलबजावणीनेच देऊ शकतो.

अशा या काहीशा मिश्र संकेतांमध्ये लवकरच आपण कोरोना महामारीला मागे सोडून, तिच्या आधीच्या परिस्थितीला ओलांडून पुढे जाऊ असे नक्कीच वाटत आहे. कोरोनाने आपल्याला अनेक दुःखद प्रसंगांना तोंड द्यायला लावले. अनेकांचे अनेक प्रकारचे नुकसान केले; परंतु आता ते सर्व पाठीमागे आहे आणि पुढे नक्कीच एक नवा, प्रगतीचा, बदललेला मार्ग स्वच्छ दिसत आहे.

(लेखक व्यवस्थापन आणि उद्योग सल्लागार आहेत.)