‘कुटुंब रंगलंय’चा दीपोत्सव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विसूभाऊ बापट

श्री गणपतीचा उत्सव झाल्यानंतर हडपक किंवा मस्कऱया गणपती उत्सव विदर्भात सुरू होतो. अशा गणपती उत्सवात माझा एक कार्यक्रम नागपूरच्या ‘भोसले महाराजांच्या’ वाडय़ावर महालमध्ये सादर करून पुढील प्रयोगासाठी मी चंद्रपूरला पोहोचलो. चंद्रपूरला माझं हक्काचं घर म्हणजे नागपूर पत्रिका व नागपूर टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी मित्र सुरेश देशपांडे यांचं घर! चंद्रपूरला दुसऱया कुठेही मुक्काम करणे सुरेशच्या कुटुंबाला कधीच आवडले नव्हते. 1982 पासून मी त्यांच्याच कुटुंबातील एक घटक होतो आणि चंद्रपूर-गडचिरोली जिह्यातील माझ्या सर्व कार्यक्रमांचं आयोजन व व्यवस्था सुरेशच करीत होता. त्यानेच ठरवलेला ऊर्जानगरच्या (थर्मल पॉवर स्टेशन) हडपक गणेशोत्सवातील कार्यक्रम त्या दिवशी करून दुसऱया दिवशी सकाळी चंद्रपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त (एस.पी.) हेमंत करकरे यांची अपॉइंटमेंट सुरेशने घेतली होती, त्यांना भेटायला आम्ही गेलो.

करकरे साहेब आमची वाटचाल पाहात होते. त्यांच्या कार्यालयाच्या स्नेहसंमेलनात माझा कार्यक्रम यापूर्वीच झाला असल्याने वेगळे काही सांगण्याची आवश्यकताच नव्हती. चहापाणी, विचारपूस झाल्यावर साहेब मला म्हणाले, ‘विसूभाऊ, चंद्रपूरच्या नक्षलवादी परिसरातील पोलीस ठाण्यावर काम करणारे आमचे पोलीस बांधव चोवीस तास हातात रायफल्स घेऊन सज्ज असतात, त्यांना तसे राहावे लागते. त्यामुळे त्यांना दिवाळी काय किंवा होळी काय, सारखीच वाटते. म्हणूनच या वर्षी दिवाळीला आमच्या एस. पी. ऑफिसमार्फत फराळाचा डब्बा आणि तुमचा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ कार्यक्रम घेऊन जायचं, असा माझा विचार आहे. तुम्ही होकार देणार याची खात्री असल्यानेच मी असे ठरवतो आहे, चालेल ना?’

एका क्षणात मी व सुरेशने त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला. राजुरा तालुक्यातील पहाडावरच्या पाटणपासून मंगीपर्यंतच्या सर्व नक्षलवादी क्षेत्रातील पोलीस ठाण्यावर, येणाऱया दीपोत्सवात आम्ही कार्यक्रम करायला जाणार होतो. ’ओंकार काव्य दर्शन’  हा माझा शालेय कार्यक्रम या परिसरातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये मी यापूर्वी सादर करून आलो होतो. त्यामुळे जिथे जिथे माझे कार्यक्रम होणार होते तेथील शाळांना निमंत्रित करा, असे मी करकरे साहेबांना सांगितले.

येत्या दिवाळीत नक्षलवादी क्षेत्रातील पोलीस ठाण्यात कार्यक्रम करायचे आहेत, तुम्ही तबलासाथ करायला येणार का? असे मी माझ्या चंद्रपूरच्या प्रत्येक तबलजीला विचारले तेव्हा,  प्रत्येकाकडून नकारच आला. शेवटी सगळे कार्यक्रम मी केवळ हार्मोनियमवरच करायचे ठरवले. पाटण पोलीस ठाण्यात पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. रात्री 8 वा. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी साहेबांनी बरोबर आणलेले फराळाचे डबे तेथील प्रत्येक पोलीस बंधूला दिले तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. दिलेल्या निमंत्रणाप्रमाणे तिथल्या आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकसुद्धा कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनासुद्धा फराळाचे डबे दिले. नंतर मी सादर केलेला ’कुटुंब रंगलंय काव्यात’ कार्यक्रम म्हणजे त्या सर्वांसाठी मेजवानी होती.

 ‘हात पहा हात कसा गोरे गोरे पान

काळे काळे केस माझे पहा किती छान।

ही कोल्हापूरच्या विजया कुलकर्णींची बाल कविता मी आदरणीय बाबा आमटे यांच्याकडील वास्तव्यात गोंडीत भाषांतर करून घेतली होती, ती गोंडी बालकविता सादर करून मी त्या कार्यक्रमाची सुरुवात केली.

‘कई हुड कई हुड नावा पांढरी पांढरी आकी। कारेकारे केलकू नावा हूड बेचून बेस।।’ आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. या प्रयोगात मी वऱहाडी कविता खूप ऐकवल्या कारणाने तो प्रयोग तुफान रंगला. या वेगळ्या कविता ऐकून करकरे साहेब बेहद्द खूश झाले.

नंतर नरकचतुर्दशीपासून भाऊबीजेपर्यंत दुपारी एक आणि रात्री एक, रोज दोन असे आठ (एकूण नऊ) पोलीस ठाण्यात आम्ही कुटुंब… चे कार्यक्रम सादर केले. माझ्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणच्या आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक कार्यक्रमाला हजर होते. ‘विसूभाऊ, तुम्ही माझ्याआधीच या नक्षलवादी क्षेत्रात कार्यक्रम सादर करून गेलेत, त्यामुळे याही भागातील तुमची प्रसिद्धी कौतुकास्पद आहे. तुमच्या… कवितेच्या प्रेमाखातर प्रत्येक ठिकाणचे शिक्षक कार्यक्रमाला आवर्जून हजर होते… प्रत्येक कवितेला दाद देत होते, याचे मलाही आश्चर्य वाटले.!’ ही  करकरे साहेबांनी दिलेली दाद सुखद वाटली, याचा मला आनंदही झाला. ही ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ची आगळीवेगळी दिवाळी ठरली.

’कुटुंब रंगलंय काव्यात’चा 31 मे 2003 रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात सलग 11 तासांचा कार्यक्रम मी सादर केला. या कार्यक्रमात सादर केलेल्या सर्व  कविता मला मुखोद्गत तर होत्याच, शिवाय त्यातील एकाही कवितेची  मी पुनक्ती केली नव्हती. त्यामुळेच माझ्या या 1500 व्या प्रयोगाची नोंद ’लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये झाली आहे. त्यानंतरच्या प्रत्येक दिवाळी भाऊबीजेला अनाथ महिलाश्रम, अंध मुलींचे वसतिगृहे, मंद मुलींची वसतिगृहे, महिला रिमांड होम्स, महिला वृद्धाश्रम येथे जाऊन दीड तासाच्या कार्यक्रमाचा आनंद देऊन रक्षाबंधन व भाऊबीज मी साजरी केली आहे व पुढे करीत राहणार आहे.

प्रत्येक कलावंताने सामाजिक बांधिलकी मानून आपल्या समाजासाठी काही भरीव व आनंददायी काम केलं पाहिजे ही, माझे अभिनयातील गुरू तात्यासाहेब अंबपकरांची शिकवण होती. त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्यासारख्या मायबाप रसिकांच्या शुभेच्छा पाठीशी असल्यामुळे मी हे कार्य करू शकलो आहे सरस्वती मातेच्या कृपेने.

केवळ महाराष्ट्र, हिंदुस्थानच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे मराठी कविता मी पोहोचविली आहे. कोल्हापूरच्या देवल क्लबमध्ये घेतलेला ’कविता पोहोचविण्याचा वसा’ गेली 40 वर्षे मी जोपासत आहे आणि आजवर ’कुटुंब रंगलंय काव्यात’चे 3047 प्रयोग मी सादर केले आहेत. इथून पुढेही करणारच आहे.

(लेखक कुटुंब रंगलंय काव्यातचे सादरकर्ते आहेत)