कस्तूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

नारिंगी, निळा, पिवळा, हिरवा… असंख्य रंगांची उधळण… आणि सोबतीला मंजूळ गाणं.

मी उन्हाळ्यात चोपटा-उत्तराखंड येथे सुंदर लोभस पक्ष्यांची फोटोग्राफी करावयास गेले होते, त्या दिवसातही मी थंडीने चांगलीच गारठून गेले होते. उजाडताच बाहेर येऊन अंगणात बसले. समोरच एक पक्षी मंजूळ आवाज करत बागडत होता. बरेच कष्ट घेतल्यानंतर या चंचल कस्तूर पक्ष्याचे फोटो मिळाले. निळ्याशार शाईसारखा चमकदार रंग व चोच पिवळी असा हा ‘शीळ घालणारा निळा कस्तूर’.

नावाप्रमाणेच गोड गळ्याच्या या पक्ष्याची शीळ ऐकताना आपण जणू माणसाचीच शिट्टी ऐकत आहोत असा भास होतो. उन्हाळ्यात हा पक्षी उंच खडकावर बसून मादीला आकर्षित करण्यासाठी गोड शीळ घालतो. गर्द निळ्या रंगाचा असून त्याच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. याचे पोट, शेपटी व पंखांची टोके अधिक चमकदार दिसतात. चोच पिवळी असल्यामुळे ती एकदम उठून दिसते. शेपटीची पिसे काळ्या रंगाची असतात. नर व मादी जवळजवळ सारखेच दिसतात.

शीळ घालणारा निळा कस्तूर एकेकटा किंवा जोडीमध्ये आढळतो. तो खडकांवर उडय़ा मारतो व मध्येच वेगाने उडतो. पानांमध्ये आणि छोटय़ा दगडामध्ये नेहमीच कीटक शोधत असतो. धोक्याची जाणीव होताच, मात्र शेपटी जमिनीवर पसरवून बसतो. संध्याकाळानंतर आणि प्रजनन ऋतू (एप्रिल ते ऑगस्ट) दरम्यान हे पक्षी चांगलेच सक्रिय असतात. ते पहाटे व संध्याकाळच्या अंधारात गाणी गातात. धोका वाटल्यास हे कर्कश ओरडून बाकी पक्ष्यांना सावध करतात. यांचे घरटे ओढय़ाकाठी पोकळीत, शेवाळे व वनस्पतींची मऊसर मुळे भरलेल्या कपासारखे दिसते. एकावेळी मादी 3 ते 4 अंडी घालते. ते फळे, गांडुळे, कीटक, खेकडे आणि गोगलगाई खातात. खाण्याआधी खेकडे आणि गोगलगाई दगडावर चेचतात व मग खातात. उंदीर व छोटे पक्षी खाल्ल्याचा पण उल्लेख सापडतो.

नारिंगी डोक्याचा कस्तूर हे पक्षी हिंदुस्थानी उपमहाद्वीप आणि दक्षिण-पूर्व आशियाच्या जंगलात स्थानिक असून राहण्यासाठी सावलीत असलेल्या पाणथळीच्या जागा पसंत करतात. हे नेहमीच सावधगिरीने वावरतात. या पक्ष्याचे डोके व खालचा भाग नारिंगी असून वरचे अंग आणि पंख निळसर राखाडी रंगाचे असतात. पंखांमध्ये थोडा पांढरा रंग असतो. चोच निळसर करडय़ा रंगांची असून पाय पुढच्या बाजूला तपकिरी आणि मागील बाजूस गुलाबी किंवा पिवळे असतात. मादी व नर सारखेच दिसतात, पण मादीचा वरचा भाग जास्त तपकिरी किंवा शेवाळी असतो. डोळ्याभोवती पांढऱया व तपकिरी रंगांचे पट्टे असतात. पंख गडद तपकिरी रंगाचे असतात. या पक्ष्यांचा नारिंगी व निळसर राखाडी रंग इतका गडद आहे की, आपण त्यांना सहज ओळखू शकतो.

नारिंगी डोक्याच्या कस्तूर पक्ष्याची साद कोमल आणि कर्कश अशा दोन्ही स्वरातील असते. हा पक्षी अतिशय लाजाळू असून एकेकटा किंवा जोडीने असतो. कधी तो अचानक शांतपणे उडताना दिसतो, परंतु धोका वाटल्यास गुपचूप एका जागेवर न हलता बसून राहतो.

या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बदलतो. नर व मादी मिळून छोटय़ा झाडावर अथवा झुडपावर, जमिनीपासून साधारण 4.5 मीटर्स उंच असलेल्या फांदीवर उथळ कपाच्या आकाराचे घरटे बांधतात. घरटे पाने, शेवाळं, लाकडाच्या ढलप्या वापरून बांधतात. मादी एकावेळी 3-4 अंडी घालते. क्वचित 5 अंडीसुद्धा घालते. अंडय़ांचा रंग फिकट निळा, राखाडी किंवा हिरवा असून त्यावर फिक्कट किरमिजी रंगाचे आणि लालसर तपकिरी रंगांचे ठिपके असतात. अंडी 13-14 दिवस उबवल्यावर पिले बाहेर येतात. नंतर 12 दिवसांत पिले घरटय़ाबाहेर पडतात.

हे पक्षी त्यांचे खाद्य जमिनीवर पालापाचोळ्यात किंवा जमीन पोखरून पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला शोधतात. कीटक, अळ्या, कोळी व फळे हे यांचे खाद्य आहे.
या दोन्ही पक्ष्यांना बघून असे जाणवते-निसर्गातील नारिंगी, निळसर राखाडी, पिवळा, हिरवा असे सर्वच रंग तजेलदार दिसतात. अशा छटा मानवनिर्मित मात्र होऊ शकत नाहीत. निसर्गाची किमयाच अगाध आहे, सौंदर्याची व रंगांची ही उधळण बघून मन हरखून जाते.