ठसा – मामासाहेब घुमरे

>> महेश उपदेव

पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटविणारे ज्येष्ठ संपादक, कथालेखक दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे यांचे नुकतेच निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण ऋजुता होती. रा. स्व. संघ आणि विनोबा (आचार्य विनोबा भावे) हे दुर्मिळ आराध्य त्यांनी कसोशीने जपले. नवविचारांचे पुरस्कर्ते असणाऱया घुमरे यांनी कधीही विचारांची धरसोड केली नाही. समन्वयवादी पत्रकाराला मराठी पत्रसृष्टी हरपून बसली आहे.

मामासाहेब मूळचे वर्धा येथील रहिवासी होते, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. रा. स्व. संघाचे ते ज्येष्ठ स्वयंसेवक होते, कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही दिवस वकिली केली. त्यानंतर ‘हिंदुस्थान समाचार’ व ‘तरुण भारत’मध्ये पत्रकारिता सुरू केली. कै. भाऊसाहेब माडखोलकर यांच्या शैलीचा त्यांच्यावर पगडा होता. शेवटपर्यंत मामासाहेबांनी आपले लेखन सुरू ठेवले होते.

देशात आणीबाणी लागल्यानंतर वृत्तपत्रावर बंधने आली तेव्हा त्यांनी ‘तरुण भारत’ जिवंत ठेवला. कारण की, त्यावेळी ‘तरुण भारत’चे अधिकारी कारागृहात होते. मोठय़ा हिमतीने वृत्तपत्राची जबाबदारी पार पाडली. कार्यकारी संपादक म्हणून काम केले होते. नवीन पत्रकारांना त्यांनी घडविले. निवृत्तीनंतर त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे काम सुरू केले. रामजन्मभूमीवर त्यांनी लिहिलेले पुस्तक हे एक ठेवा आहे.

अनेकांना अमान्य असणारा हिंदुत्ववाद स्वीकारणारे आणि त्याचबरोबर महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्यावर निष्ठा ठेवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

सामाजिक क्षेत्रात मामासाहेबांची संपादक म्हणून एक निराळी ओळख होती. शांत, निरलस आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. कला आणि विधी शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी प्रारंभी ‘हिंदुस्थान समाचार’ येथे पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. 1956 साली वार्ताहर म्हणून त्यांनी ‘तरुण भारत’च्या सेवेत पदार्पण केले. विविध पदांच्या जबाबदाऱया सांभाळत 1983 मध्ये ते मुख्य संपादक झाले. संपादकपदाच्या चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. 1987 मध्ये निवृत्तीनंतर त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कामात स्वतःला झोकून दिले श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनादरम्यान मामासाहेबांकडे विहिंपचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती. त्यांनी ‘श्रीरामजन्मभूमीचे अभूतपूर्व मुक्ती आंदोलन’ या पुस्तकाचे लेखन केले. विनोबाजींवर त्यांनी ‘चिरंतनाचे यात्री’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या अग्रलेखांवर आधारित ‘प्रासंगिक’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. बकुळीची फुले, शंख-शिंपले, विरंगुळा, आन्हिक आदी ग्रंथांचे लेखन केले.

आद्य संपादक ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यपद्धतीत त्यांची पत्रकारितेतील जडणघडण झाली. ‘तरुण भारत’मधील विविध पदांच्या जबाबदाऱया सांभाळत 20 मे 1983 रोजी ते मुख्य संपादक पदापर्यंत पोहोचले. संपादकपदाच्या चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. मुख्य संपादक पदाच्या कार्यकाळात त्यांच्या गाजलेल्या अग्रलेखांवर आधारित ‘प्रासंगिक’ हे पुस्तक प्रकाशित केले. यासोबतच नरकेसरी बॅ. मोरेश्वर अभ्यंकर यांचे चरित्र, जनसंघाचे नेते पं. बच्छराज व्यास यांच्या आठवणींवर आधारित पुस्तक प्रकाशित केले.

आपली प्रतिक्रिया द्या