
>> योगेंद्र ठाकूर
धर्म, राजकारण, समाजरचना, अर्थकारण, विज्ञान, कला, साहित्य व शिक्षण अशी संस्कृतीची आठ प्रधान अंगे आहेत. महाराष्ट्राच्या साहित्य व संस्कृतीचे सम्यक दर्शन घडवण्याचा अथक प्रयत्न राज्य साहित्य व संस्कृती मंडळ गेली 61 वर्षे करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपक्रम, मराठी भाषेचे संवर्धन आणि ज्ञाननिर्मिती करणारे आहेत. हे राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या गेल्या 61 वर्षांच्या वाटचालीवर नजर टाकल्यास जाणवते.
गेल्या 61 वर्षांत राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने अनेक मौल्यवान ग्रंथनिर्मिती केली असून ती वाचकांना परवडण्याबाबत किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे जडणघडण करणाऱया, योगदान देणाऱया समाजसुधाकरक, राजकारणी, शात्रज्ञ इतिहास संशोधक, साहित्यिक आदींवर पुस्तके प्रकाशित केली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले, सेनापती बापट, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आदींवर पुस्तके प्रकाशित केली आहेत. इतिहास, ज्ञान-विज्ञान, संगीत, शब्दकोष, नाटय़शात्र या विषयांवर पुस्तके प्रकाशित करून मराठी भाषेतील पुस्तकांचे दालन समृद्ध केले आहे. ही सर्व पुस्तके महाराष्ट्रात कुठल्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध आहेत त्याची माहिती संकेतस्थळावर दिली आहे. मंडळाने परंपरा आणि नवताची सांगड घातल्यामुळे गंथ महाराष्ट्रातील कानाकोपऱयात पोहोचवण्यासाठी मदत झाली आहे.
संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील एक अग्रणी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचारांनी आणि तळपत्या लेखणींनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाला बळ मिळाले. पुरोगामी विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी प्रबोधनकारांनी 16 ऑक्टोबर 1921 रोजी ‘प्रबोधन’या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्याला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. ‘प्रबोधन’ मासिकाचे हे शताब्दी वर्ष सुरू आहे, त्याप्रित्यर्थ राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ग्रंथ प्रकल्प हाती घेतला आहे. प्रबोधनकारांच्या भरीव योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी विशेष ग्रंथ प्रकाशित करीत आहोत, अशी माहिती राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रा. सदानंद मोरे यांनी नुकतीच दिली.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री कला, साहित्य आणि संस्कृतीचे उपासक यशवंतराव चव्हाण यांनी ‘महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करताना मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्याची प्रगती होईल’ असे आश्वासन दिले होते. त्याच आश्वासनानुसार महाराष्ट्राचे साहित्य, कला, संस्कृती आणि इतिहास यांच्या विकासासाठी, संवर्धनासाठी राज्य शासनाने 19 नोव्हेंबर 1960 रोजी ‘साहित्य संस्कृती मंडळाची’ स्थापना पहिल्यांदा पाच वर्षांसाठी केली. त्या वेळी थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मण शात्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्ष पद भूषवले होते. 1960 ते 1980 अशी 20 वर्षे या पदावर ते असताना त्यांनी विविध उपक्रम राबवून साहित्य संस्कृती मंडळाची दिशा आखून दिली. यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. 1980 साली स्वतंत्र ‘विश्वकोष निर्मिती मंडळ’ अस्तित्वात आले तर साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अनेक उद्दिष्टय़े आणि योजनाद्वारे कार्य पुढे सुरू राहिले.
महाराष्ट्राचे साहित्य आणि इतिहास या विषयांवर मराठी भाषेमध्ये ग्रंथरचना करण्यासाठी वाङ्मयीन योजनांना चालना देणे, मदत व मार्गदर्शन करणे तसेच अशा योग्य योजना मंडळाने स्वतः हाती घेणे हे या मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन स्थापनेपासूनच हे मंडळ मौलिक, विविध विषयांवर वाङ्मय निर्मिती करून साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी करीत आहे. मराठी साहित्य संस्कृतीच्या विकासासाठी साहित्यिकांनी निर्मिलेले असे ग्रंथ स्वस्त किमतीत मराठी वाचकांना उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकातील वाचकांपर्यंत त्या ग्रंथांच्या वाचनाचा लाभ मिळू शकला. नवनवीन साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. परंपरा आणि नवताचे सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मराठी साहित्य संस्कृतीच्या विकासासाठी साहित्य संवर्धनाच्या उद्दिष्टय़पूर्तीसाठी मंडळातर्फे विविध प्रकारच्या एकूण बारा योजना/उपक्रम राबविले जातात. 1) मंडळाची पुस्तक प्रकाश योजना – महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती आणि महाराष्ट्राचा इतिहास या विषयीच्या वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक आदी ग्रंथांचे संपादन, संशोधन व प्रकाशन महाराष्ट्राचे शिल्पकार योजना 2) ललित व ललितेतर वाययाच्या प्रकाशनार्थ अनुदान योजना 3) नवलेखक उत्तेजनार्थ अनुदान योजना 4) नवलेखकांची चर्चासत्रे/कार्यशाळांना अनुदान योजना 5) साहित्य संस्थांना अनुदान 6) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अनुदान योजना 7) नियतकालिकांना अनुदान 8) स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना 9) विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 10) श्री. पु. भागवत पुरस्कार 11) अन्य मराठी साहित्य संमेलन अनुदान योजना 12) बृहद्ग्रंथ योजना खासगी प्रकाशकांमार्फत साधारणतः जी पुस्तके प्रकाशित करण्यास नकार दिला जातो अशी पुस्तके जिज्ञासू, चोखंदळ तसेच सामान्य वाचकास कमी किमतीत उपलब्ध करून देण्याच्या योजनेअंतर्गत वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक आदी विषयांवरील ग्रंथ प्रकाशित केले जातात. तसेच मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या मागणीनुसार पुनर्मुद्रणही केले जाते. अशी मंडळाने आतापर्यंत 584 पुस्तके प्रकाशित केली आहेत. नवलेखक उत्तेजनार्थ अनुदान योजनेअंतर्गत ज्यांचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही अशा नवलेखकांना कथा, कादंबरी, ललितगद्य, काव्य, नाटक (एकांकिका), बालवाङ्मय या लेखनाच्या प्रकाशनासाठी मंडळाकडून अनुदान दिले जाते. आतापर्यंत सदर योजनेअंतर्गत 2311 नवलेखकांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्य, संस्कृती, कला, इतिहास यासारख्या विषयांवर वैचारिक, सामाजिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक, वाङ्मयीन संशोधन या विषयांवरील वैवध्यपूर्ण, नावीन्यपूर्ण दुर्मिळ स्वरूपाचे बृहद्ग्रंथ प्रकल्प हाती घेऊन मंडळातर्फे प्रकाशित केले जातात. महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्था, मराठी साहित्य संमेलने आणि नियतकालिके यांना वार्षिक अनुदान दिले जाते. मंडळाने अनुवादित पुस्तकांना आणि नवोदित लेखकांना प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार व कला क्षेत्रात भरीव योगदान करणाऱया महनिय व्यक्तींची चरित्रमाला प्रकाशित केली.
तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी यांनी मंडळाच्या उद्देशांना आधुनिक दृष्टी दिली. आधुनिक जगात ज्ञाननिर्मितीत जे जे आहे त्याची ओळख मराठी जनांना मराठीतून व्हावी असे त्यांना वाटत होते. मंडळाच्या कार्यास त्यांनी एवढे वाहून घेतले होते की, मंडळ आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी असे समीकरण झाले होते. नंतर डॉ. य. दि. फडके, रा. र. बोराडे, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, विद्याधर गोखले, मधु मंगेश कर्णिक यांनीही उत्तम प्रकल्प राबवले. 2018 सालापासून संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. कोरोना काळात व राज्यातील सत्तांतरामुळे त्यांना काम करण्यासाठी कमी वेळ मिळाला असला तरी त्यांच्या अध्यक्षतेखाली काही महत्त्वाचे संशोधन प्रकल्प साहित्य-संस्कृती मंडळाने हाती घेतले आहेत.





























































