
>>दादासाहेब येंधे<<
खरे तर जीवन संपवण्याचा आततायी मार्ग कोणालाच आवडत नाही, पण भावनेच्या आहारी जाऊन एका बेसावध क्षणी असे निर्णय घेतले जातात. कितीही वाईट असो, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केल्याने, त्याला सामोरे गेल्याने मन चिंतामुक्त होतं. ’जे आहे ते असं आहे, ‘आता यावर मार्ग काढूया’ एवढंच बोलल्यानेही जीवघेणा प्रॉब्लेम हलकाफुलका वाटू लागेल. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा फार विचार न करता वर्तमान क्षणांमध्ये पुरेपूर आनंद घेत जगणे ही कला साध्य झाल्यास आयुष्य सुखकर होते. टेन्शन, स्ट्रेस आणि चिंता पळून जातात. मानसिक आरोग्य सुधारते. पुढे काय होणार याची निरर्थक चिंता सतावत नाही.
वेगवेगळ्या कारणांनी येत असलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी मानसोपचारतज्ञांची मदत घेतली जाते, मात्र कॅन्सरसारख्या आजाराशी संघर्ष करताना येणाया नैराश्याशी लढा देण्यास रुग्णाला मदत करण्यासाठी या शाखेत प्रावीण्य मिळविलेल्या मानसोपचारतज्ञांची गरज आहे. सातत्याने व्यग्र दिनक्रमात राहण्याची सवय झालेल्या एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाल्यास त्याचा स्वीकार करणे मानसिकदृष्टय़ा धक्कादायक असते. त्यामुळे वैद्यकीय उपचार सुरू करण्यापूर्वी मानसिक बळ वाढविण्याची गरज असते. या आजारामध्ये त्या रुग्णासह संपूर्ण कुटुंबाची मानसिक तयारी करावी लागते. शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणारे वेदना सहन न झाल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकणाऱ्यांचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. नैराश्यामुळे माणूस खचत जाऊन नको ते पाऊल उचलतो.
ताणतणाव कसा हाताळायचा यापेक्षा तो कशामुळे निर्माण होतोय हेच अनेकांना कळत नाही. याचे मूळ कारण म्हणजे मोकळ्या संवादाचा अभाव. एकमेकांशी आपण बोलतच नाही. आपल्या भावना मोकळेपणानं व्यक्तच केल्या नाहीत तर त्यातून मनावरचं दडपण वाढत जातं. याबाबत आपण कोणतेही उपाय केले नाहीत तर त्यातून नैराश्य किंवा डिप्रेशनची स्थिती येते. त्यामुळे मोकळेपणाने संवादाची प्रक्रिया वाढीस लागणं अत्यंत आवश्यक आहे. आपण घरात पत्नीशी, मुलांशी बोलतो त्याला संवाद म्हणत नाहीत. संवाद हा परस्परांच्या विचारांची देवाणघेवाण करणारा, परस्परांचे विचार समजून घेणारा असला पाहिजे. आज तोच हरपत चालल्यामुळे ताणतणावात वाढ होत चालली आहे.
एखादे प्रेरणा देणारे पुस्तक, चरित्र, आत्मचरित्र आपल्याला याकामी पूरक ठरू शकते. दीपा मलिक हे नाव क्रीडारसिकांना नवीन नाही. सायकल चालविणे, बास्केटबॉल खेळणे, राज्यस्तरीय क्रिकेट चमूत स्थान पटकाविणे त्यानंतर कॉलोनल विक्रम सिंह यांच्याशी विवाह झाला. त्यानंतरही तिच्या खेळण्यात खंड पडला नाही. हा प्रवास समाधानकारकरीत्या चाललेला असताना अचानक तिला अर्धांगवायूच्या झटक्याने गर्भगळीत केले. मृत्यू किंवा ऑपरेशनचा मार्ग तिच्यासमोर होता. तिने दुसरा मार्ग निवडला तोही तिच्या पतीच्या गैरहजेरीत. ते तेव्हा कारगील युद्धात मग्न होते. तिच्यावरची शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे डॉक्टरनी केली. काही दिवसांनी तिला बरे वाटू लागताच तिने पुन्हा खेळाला जवळ केले आणि देशासाठी पदकही मिळविले. अशा जिद्दीच्या कहाणीतून आपणाला प्रेरणा मिळते. जगण्याची, प्रतिकूलतेशी दोन हात करण्याची. ध्येय निश्चित करायला ह्या गोष्टी पूरक ठरतात.
पोलीस हा सतत समाजाशी बांधील असणारा घटक आहे. त्यामुळे सतत कामावर असावं लागतं . कोणत्याही आत्महत्येमागे मानसिक, शारीरिक, भौतिक अशी कारणे असतात. प्रत्येकाची आत्महत्या करण्याची कारणे वेगळी असतात. त्या कारणांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपयोजना करणे गरजेचे आहे.




























































