मनापासून… मनापर्यंत!

>> अरुणा सरनाईक

आईच्या पोटातून बाहेर पडल्यावर मन असणाऱया देहाला अनेक नाती चिकटतात. जसजशी नाती चिकटत ती घट्ट होत जातात. मनात हा माझा, हा जवळचा, हा हातचा राखलेला असा दुजाभाव वाढीला लागतो. तेव्हा मनाचं निरागसत्व कमी होत जातं. पुढे जाऊन मनाची अवस्था दशा रूपात बदलत मनोदशेकडे वाटचाल करू लागते आणि इथेच आपण पूर्ण वाढलो आहोत याची जाणीव प्रकर्षाने होते. मग मनापासून… मनापर्यंत यातील मधला प्रवास खडतर होऊ लागतो.

कितीही केलं तरीही… कितीदा वाटतंय… केव्हापासून माझ्या मनात आहे… अशी वाक्यं आपण कायम ऐकत, बोलत, सुनवत असतो. मनापासून मनापर्यंतचा प्रवास आपल्यासोबत कायम असतो. पंचप्राण, पंचेंद्रिये, पंचमहाभूत असा पाचाचा पाढा कुठेतरी थांबतो. सुखांत आणि शेवट यामधल्या प्रवासात मन नावाचं सहावं भूत माणसाच्या मानगुटीवर, आईच्या गर्भात असल्यापासून बसलेलं असतं. जाणिवेच्या पलीकडे मनाचा प्रांतप्रदेश असतो. त्यात त्याचा वावर मनमुरादपणे होत असतो. मनाची झोप आकाशाच्या पुढे आणि समुद्राच्या खोलीपर्यंत असं पूर्वी म्हणत. आता मात्र नाही. कारण मानवानं आकाशाची उंची आणि समुद्राची खोली मोजून काढली आहे. त्यामुळे आता मनाच्या तुलनेकरिता समुद्र, आकाश यांचा उपमा म्हणून उपयोग करता येणार नाही. मला वाटतं त्यापलीकडं मन असावं. आपण जन्माला येणार असल्याची चाहूल लागल्यापासून मन या सहाव्या भूताची अधिसत्ता आपल्या आईवर सुरू झालेली असते.

डोहाळतुळीला काय खावंसं वाटतंय, काय तिच्या मनात आहे, सारं काही तिच्या मनाप्रमाणे करण्यात सासर-माहेरची मंडळी झटत असतात. एरवी नेहमीसारखी वागणारी भावी मातासुद्धा आपल्या न पाहिलेल्या बाळाच्या मनाप्रमाणे वागते. खरंतर ते बाळच तिला आपल्या मनाप्रमाणे वागण्यास भाग पाडते आणि मग बायका बोलून जातात ‘बाळाच्या वेळी दिवस असताना मला सारखं असंच करावंसं वाटायचं.’ सोपे शब्द आणि सोपी समीकरणं! यातून आपलं आयुष्य फुलत जातं! वय वाढतं तसं मनाचं साजरं गोजरं रूपडं मोठ्ठं खतरनाक बनतं. ‘मनात काय आहे, कुणास ठाऊक? आपल्याच नादात असते’ असं जेव्हा कानावर पडायला लागतं तेव्हा समजावं की, मनानं आपला पसारा वाढवायला सुरवात केली आहे. मन ऑक्टोपस आहे. आठ हाताचा नाही तर हजारो हातांचा. कसं सावरणार..! मन एकसंध आहे का? प्रकार तरी किती मनाचे! वयानुसार मनाचे वर्गीकरण आपण बोलताना करतोच. त्याचं मन लहान मुलासारखं आहे. मन लहान मुलासारखं आहे, पण लाहान मुलाच्या मनासारखं नाही हीच वाक्यातील खरी गोम.

मन कधीच निरागस नसतं. ते पक्क बिलंदर असतं. आपल्याच मतानं वागणारं असतं. शुद्ध मन, सुंदर मन, कोमल मन, भावनाशील मन, पापी मन, दयाळू मन, इर्षालू मन… मनाच्या भावनाविष्कारावर एखादा प्रबंध तयार होईल, नव्हे आहेच. श्री रामदास्वामींनी मनाला वळण लावण्याचे, शहाणंसुरतं करण्यासाठी मनाचे श्लोक लिहिले. मनाला ताळ्यावर ठेवण्यासाठी प्रत्यक्ष रामरायाला साकडे घातले. पण तरीही शुगर वाढली गोड खाणं सोडा, मनावर संयम ठेवा… कसं शक्यंय? मनावर ताबा ठेवणं, संयम ठेवणं ही वाक्यं फक्त इतिहासातील पुस्तकात किंवा वाक्यात उपयोग करण्यापुरती उपयोगाची असतात. प्रत्यक्षात नाही. कारण आपले इतर पार्ट ऑफ बॉडीजच मुळी मनाच्या ताब्यात असतात.

मी अगदी मनापासून करते… मला कोणतीही गोष्ट अशी तशी चालत नाही… हे एक अभिमानी मनाचं उदाहरण किंवा मला समोरच्याच्या मनात काय चाललंय हे एकदा त्याच्याकडे पाहिलं की क्षणात कळतं हे आत्मविश्वासी मनाचं उदाहरण. अभिमानी, अंधविश्वासी अािण अहंकारी या तीन मनाच्या अमन अवस्था सुरवातीला खूप चांगल्या वाटतात. पण जसजसा वेळ जातो तसतसा पहिल्या दोन मनाचा लोप होत अहंकारी मन बलशाली होत जातं. पूर्ण ताबा घेतं. या बलशाली अहंकारी मनापुढे इतर सशक्त मनाचे प्रकार निष्प्रभ होत रोगी मनाचे व्हायरस, जसे इर्षा, द्वेश, कपटीपणा आपल्यावर हावी होतात. मग मनाची अवस्था दशा रूपात बदलत मनोदशेकडे वाटचाल करू लागते. इथेच आपण पूर्ण वाढलो आहोत याची जाणीव प्रकर्षाने होते. जीवनातला आनंद मनापासून… मनापर्यंत यातील मधला प्रवास खडतर होऊ लागतो.

गतवर्षी श्री महालक्ष्मी, गणपतीला निरोप दिला, मागची आवराआवर करताना माझी नणंद म्हणाली, ‘‘वहिनी, आता नं आपण घरातले सर्व डबे ट्रान्स्परंट ठेवूया. सगळं दिसतं त्यातून. किती संपलं किती उरलं ते लागलीच कळतं! बंद डब्यांना चिठ्ठय़ा लावल्या तरी आता वाचताना चष्मा लागतो, तो कुठे ठेवला ते आठवत नाही. अशा वेळी पारदर्शक डबे बरे. पटकन दिसतं.’’ माझी जाऊ म्हणाली, ‘‘खरंय. कारण त्यामुळे वेळ वाचतो. डोक्याला ताप नाही आणि प्रत्येक गोष्ट लक्षात किंवा मनात ठेवायची गरज नाही. सहज संवाद होतो.’’

कामं करताना आमच्या गप्पा सुरू होत्या. मनात विचार सुरू झालेला. माणसांनी वयानुसार मनसुद्धा पारदर्शक ठेवलं तर डब्यातल्या वस्तूंप्रमाणे मनातले विचार दिसतील. लागलीच संवाद साधता येईल. विचार समजले की समोरच्याशी सहमत असणारं बोलून विसंवाद टाळत सुसंवांदाचे पूल बांधले जातील. सगळ्याच वातावरणात एक सुसंवाद, एक हार्मनी असेल आणि आयुष्य गाण्यासारखं सुंदर, सहजसंवादी होऊन एका मनापासून दुसऱया मनापर्यंत सहज पोचता येईल. आपल्याविषयी समोरचा कसा विचार करतो? तो आपल्याशी सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे कळेल! निर्भय निरागस मन! जे आपल्याजवळ लहानपणी असतं! मनाला आकार-उकार नाही. ते कालातीत आहे. डायरेक्ट आत्म्याशी संबंध ठेवून आहे. ते एकाकार आहे. हो! हे सारं खरंय! पण केव्हा? आईच्या पोटातून बाहेर पडल्यावर मन असणाऱया देहाला अनेक नाती चिकटतात.

जसजशी नाती चिकटत ती घट्ट होत जातात. मनात हा माझा, हा जवळचा, हा हातचा राखलेला असा दुजाभाव वाढीला लागतो. तेव्हा मनाचं निरागसत्व कमी होत जातं. निर्भयता जाऊन भय वाढीला लागतं. हे भय इतकं वाढतं की शेवटी ‘भय इथले संपत नाही’ असं म्हणायची वेळ प्रत्येक भावनाशील मनावर येतेच येते. वाढत्या वयासोबत हे भय वाढून वयाच्या शेवटच्या टप्प्यावर जिवलगांच्या मनापर्यंत न पोचल्याची खंत मनाला वेढून राहते.

जिला आपल्या येण्याची सुखद चाहूल लागली असताच आपण तिला आपल्या मनासारखं वागायला लावत अख्खं आयुष्य आपल्याभोवती फिरायला लावतो त्याच माऊलीशी तिच्या उतरत्या वयात कितीही मनापासून प्रयत्न केला तरी तिच्या मनापर्यंत पोचणं अवघड होऊन जातं.

आपली प्रतिक्रिया द्या