मुद्दा : मुंबईवरील ताण आणि तणाव

>> राजन वसंत देसाई ([email protected])

मुंबईत पाऊस अक्षरशः कोसळतो. त्याचे रौद्र स्वरूप पाहायला मिळते. दरवर्षी कुठे पुलावरची चेंगराचेंगरी तर कुठे इमारत जमीनदोस्त, कुठे धरण फुटते तर कुठे ढगफुटी, कुठे पूर येतो. या साऱ्या बातम्यांची इतकी सवय झाली आहे की, यासंदर्भात एक वाक्य ऐकले की, हल्लीचे जीवन इतके चिंतामय झाले आहे की, रात्री झोपताना मृत्यू उशाशी घेऊन झोपावे लागते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातही मुंबईची भौगोलिक परिस्थिती, चोहोबाजूने रेक्लेमेशनच्या नावाखाली होणारे अतिक्रमण, नैसर्गिक स्रोतांना अटकाव, मिठी नदीसारख्या जलस्रोतांवर होणारे अतिक्रमण, अरबी समुद्र, खाडय़ा व नद्या यामध्ये टाकला जाणारा कचरा, अशास्त्राrय पद्धतीने होणारी उंच उंच इमारतींची बांधकामे आणि त्याचा निकृष्ट दर्जा, पर्यावरणाकडे दुर्लक्ष, सार्वजनिक आरोग्य, डंपिंग ग्राऊंडचा यक्षप्रश्न असे सर्वच प्रश्न उभे राहतात. हल्ली दरवर्षी पावसाळय़ातच नव्हे तर इतर वेळीही सतत दुर्घटना घडत असतात. उदा. सीएसटीसमोरील पूल दुर्घटना. इतकेच काय, रस्त्यावरील अपघात, रेल्वे प्रवासातील दुर्घटना, आगीच्या घटना तर वर्षभर कुठेना कुठे चालूच असतात. ही अस्मानी-सुल्तानी संकटे आतंकवादापेक्षाही कितीतरी मोठी आहेत. अशी स्फोटक परिस्थिती का निर्माण झाली? याचा सखोल अभ्यास किंवा त्यावर त्वरित उपाययोजना अमलात आणण्याची मानसिकता कोणाकडेच नाही. पुन्हा आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेकडे तशी क्षमतादेखील नाही. या योजना एकतर कागदावरच राहतात किंवा त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्याकडे सर्वांचाच प्रयत्न असतो. पण आता खरी गरज ‘मुंबई वाचली’ या शब्दप्रयोगाकडे लक्ष देण्याची आहे. यासाठी मुंबईची भौगोलिक परिस्थिती, तिच्या एकंदरीत पृष्ठभागावर केले गेलेले मानवनिर्मित बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, त्यावर उपाययोजना यांचा अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे. साधे उदाहरण घ्यायचे झाले तर मेट्रो रेल्वेचे घेता येईल. मुंबईच्या लोकल प्रवासासाठी मेट्रो रेल्वे हा एक सप्लिमेंटरी सोल्युशन (Supplementary Solution) किंवा तात्पुरता पर्याय आहे. त्याने तांत्रिकदृष्टय़ा ताण कमी होईल, पण तणावाचे काय? ताण आणि तणाव यामध्ये हाच फरक आहे. कारण ताण आणि तणाव हे दोन अतिशय वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत, पण परस्परपूरक आहेत. म्हणूनच या प्रश्नावर एकच रामबाण उपाय म्हणजे मुंबईच्या भौगोलिक प्रदेशावर पडत असलेला वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करणे. आज मुंबईत दररोज जवळ जवळ रोज साठ ते सत्तर लाख लोक रेल्वेने किंवा अन्य साधनांनी प्रवास करीत असतात आणि तेवढेच संध्याकाळी परतीच्या प्रवासासाठी जा-ये करीत असतात. मुंबईत कोणीही उपाशी राहू शकत नाही हे अगदी मुंबईसाठी ब्रीदवाक्य असेलही, मुंबई कधीच झोपत नाही हेदेखील खरे आहे. पण मुंबई ही प्रचंड तणावाखाली जगते आहे त्याचे काय? हाच ताण आणि तणाव यासाठी मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीच्या मर्यादा ओळखूनच पुढील उपाययोजना कराव्या लागतील. मुंबईत चार मजली झोपडपट्टय़ा बांधल्या जातातच कशा? याच्या मुळाशी शासन. प्रशासन सर्वांनीच जायला हवे. रस्त्याची साफसफाई म्हणजे काय, फुटपाथच्या कडेलगत असणारा कचरा हे मुंबईत पाणी साचण्याचे मुख्य कारण आहे. अनधिकृत फेरीवाले, उघडय़ावरचे पदार्थ आणि नागरिकांची उदासीनता हेदेखील आहेच. याची सर्वांनी दखल घेतली तरी मुंबईतला ताण आणि तणाव दूर होण्यास मदत होईल. दुसरा एक उपाय म्हणजे मुंबईतील कार्यालयांचे विकेंद्रीकरण आणि परप्रांतीयांचे लोंढे थोपवणे. हे उपाय कष्टदायक असले तरी  मुंबईच्या भविष्याची गरज आहे हे नक्की. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. त्याचबरोबर आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसावे हे सुजाण नागरिकांना मनापासून वाटले पाहिजे तरच मिठी नदी ही भविष्यात खरोखरच मिठी (गोड) होईल. अर्थात त्यासाठी महापालिका प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुंबईतील प्रत्येक नागरिक या सर्वांनी निर्धार करण्याची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या