लेख : अण्वस्त्र धोरणाचा पुनर्विचार आवश्यक

893

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

पाकिस्तान आणि चीनचे संयुक्त आव्हान हिंदुस्थानसमोर उभे राहिले आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्री आणि दोघांचेही हिंदुस्थानच्या विरोधातील वागणे पाहता हिंदुस्थानने सुरक्षेच्या आणि प्ररोधनाच्या दृष्टीने आपल्या अणुधोरणावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे असे वाटते. पहिल्यांदा अणुहल्ला करणार नाही, मात्र हिंदुस्थानवर अणुहल्ला झाल्यास प्रतिहल्ला करून शत्रूचे अधिकाधिक नुकसान करण्याचे हिंदुस्थानचे सध्याचे धोरण आहे. या धोरणानुसार पहिला हल्ला शत्रुराष्ट्राकडून अपेक्षित आहे. प्रतिहल्ल्याच्या भीतीतून शत्रुदेश आपल्यावर हल्ला करणार नाही असे या धोरणातून अनुस्यूत आहे. मात्र अस्थिर पाकिस्तान हा हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा आहे.

कश्मीरवरून हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तणावाचं वातावरण असताना हिंदुस्थानचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अण्वस्त्र वापराबाबत अत्यंत मोठे विधान केले. अण्वस्त्रांबाबत ‘नो फर्स्ट यूज’ हेच हिंदुस्थानचं धोरणं राहिलं आहे, मात्र पुढे काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून आहे असं राजनाथ सिंह 16 ऑगस्टला म्हणाले.

स्वतःला जागतिक शांततेची काळजी आहे हे दाखवण्यासाठी पाकच्या पंतप्रधानांनी 19 ऑगस्टला हिंदुस्थानच्या अण्वस्त्रांकडे बोट दाखवले. खान यांच्या मते हिंदुस्थानात ‘फॅसिस्ट’ सरकार सत्तेत असल्यामुळे ही अस्त्रे असुरक्षित आहेत. काही दिवसांपूर्वी ‘‘हिंदुस्थान प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही या धोरणात पालट करेल’’ असे विधान हिंदुस्थानचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले होते. त्यामुळे पाकचे धाबे दणाणले. पाक आणि पाकपुरस्कृत आतंकवादी यांच्या विरोधात हिंदुस्थान घेत असलेले कठोर धोरण त्याला झोंबले आहे. पाकच्या विरोधात हिंदुस्थान आणखी कठोर भूमिका घेईल, त्याआधी हिंदुस्थानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणण्यासाठी पाकने खटपट चालू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकने ‘‘फॅसिस्ट हिंदू सरकारच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित नाहीत’’ असे म्हटले आहे. पाकने असे वक्तव्य करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय.

2003 साली जाहीर झालेले हिंदुस्थानचे अण्वस्त्रविषयक धोरण समजून घेतले पाहिजे. यातील महत्त्वाचा मुद्दा जरी ‘नो फर्स्ट यूज’ हा असला तरी याच्या जोडीला इतरही मुद्दे आहेत. ते इतर मुद्दे असे आहेत. जो देश अण्वस्त्रधारी नसेल त्याच्याविरुद्ध हिंदुस्थान कधीही अण्वस्त्रे वापरणार नाही. हिंदुस्थानवर जर अण्वस्त्रांचा हल्ला झाला तर हिंदुस्थान इतके कडक प्रत्युत्तर देईल की, शत्रुराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले पाहिजे. हिंदुस्थान स्वरक्षणार्थ योग्य, पण कमीतकमी अण्वस्त्रांचा साठा ठेवेल. अण्वस्त्रांचा वापर करण्याबद्दलचा अंतिम निर्णय देशातील राजकीय नेतृत्वाचा असेल. हिंदुस्थानवर जर मोठा रासायनिक किंवा जैविक हल्ला झाला तर हिंदुस्थान अण्वस्त्रे वापरून प्रत्युत्तर देईल. हिंदुस्थान  जरी अण्वस्त्रधारी देश असला तरी सर्व जग अण्वस्त्रमुक्त व्हावे या दिशेने हिंदुस्थान प्रयत्न करत राहील. ही हिंदुस्थानच्या अण्वस्त्रविषयक धोरणाची ठळक वैशिष्टय़े होत.

भाजपने लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास देशाच्या अण्वस्त्र धोरणाचा फेरविचार करू असे जाहीरनाम्यात म्हटले होते. 2016 मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले होते की, ‘‘आम्ही अण्वस्त्र प्रथम वापरणार नाही हे आपण का म्हणतो, कारण आम्ही जबाबदार देश आहोत व आम्ही अण्वस्त्रांचा जबाबदारीने वापर करू. असे विधान करून आपण एक प्रकारे आपल्यालाच मर्यादा घालून का घ्यायच्या? आम्ही कोणाच्याही विरोधात प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही (नो फर्स्ट यूज डॉक्ट्रिन) हे हिंदुस्थानचे अण्वस्त्र वापरासंबंधीचे गेल्या अनेक दशकांचे धोरण आहे. जगातील पहिला अणुबॉम्ब हा जपानवर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टाकला गेला होता. त्यानंतर जगात एकदाही अणुबॉम्ब वा अण्वस्त्रांचा वापर झालेला नाही. पर्रीकर म्हणाले, जर तुम्ही आधीपासूनच्या अण्वस्त्र धोरणाचे पालन कराल किंवा पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम असाल तर तुम्ही अण्वस्त्र शक्ती कमी करत आहात असे मला वाटते. आम्हाला कोणीही ग्राह्य धरू नये हीच आमची रणनीती आहे. देशावर जेव्हा कधी संकट येईल त्यावेळी मी आपल्या धोरणात बदल करण्यास मागेपुढे पाहणार नाही. आपण कणखरपणे वागलो तर पाक नमतो.’’

हिंदुस्थानच्या ‘नो फर्स्ट यूज’ या अण्वस्त्र धोरणाचा हिंदुस्थानला अजिबात फायदा झाला नाही. फायदा हा फक्त पाकिस्तानलाच झाला. पाकिस्तानकडे अणुशस्त्रे असल्यामुळे पाकिस्तान कश्मीरमध्ये आणि इतरत्र दहशतवादी हल्ले करत राहिला. मात्र हिंदुस्थानची असलेली सैन्याची ताकद युद्धामध्ये हिंदुस्थान कधीही वापरू शकला नाही. म्हणजेच आम्ही दहशतवादी हल्ले करत राहू, परंतु तुम्ही आमच्याविरुद्ध युद्ध सुरू करायचे नाही असे पाकिस्तान म्हणायचा आणि आपण मुकाट्याने ऐकायचो. पाकिस्तानने छोटे अणुबॉम्ब तयार केले आहेत. जर हिंदुस्थानी सैन्य लाहोरपर्यंत पोहोचले किंवा इछोगिल कॅनॉल पार केला किंवा सियालकोटमध्ये प्रवेश केला तर पाकिस्तान त्यांच्याकडे असलेले अणुबॉम्ब वापरेल. म्हणून युद्ध नको असे आपले याआधीचे धोरण होते.

पाकिस्तान आणि चीनचे संयुक्त आव्हान हिंदुस्थानसमोर उभे राहिले आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्री आणि दोघांचेही हिंदुस्थानच्या विरोधातील वागणे पाहता हिंदुस्थानने सुरक्षेच्या आणि प्ररोधनाच्या दृष्टीने आपल्या अणुधोरणावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे असे वाटते. पहिल्यांदा अणुहल्ला करणार नाही, मात्र हिंदुस्थानवर अणुहल्ला झाल्यास प्रतिहल्ला करून शत्रूचे अधिकाधिक नुकसान करण्याचे हिंदुस्थानचे सध्याचे धोरण आहे. या धोरणानुसार पहिला हल्ला शत्रुराष्ट्राकडून अपेक्षित आहे. प्रतिहल्ल्याच्या भीतीतून शत्रुदेश आपल्यावर हल्ला करणार नाही असे या धोरणातून अनुस्यूत आहे. मात्र अस्थिर पाकिस्तान हा हिंदुस्थानसाठी धोक्याची घंटा आहे. दहशतवाद्यांच्या हातामध्ये अशी संहारक शस्त्रे पडली तर काय होईल यावर तज्ञांमध्ये चर्चा सुरू असते.

कश्मीरच्या पार्श्वभूमीवर अणुधोरणाचा फेरआढावा घेण्याच्या मुद्दय़ावर पुन्हा चर्चा होण्याची गरज आहे. चीनचे अणुधोरण पाहता चीनकडून हिंदुस्थानवर महासंहारक हल्ले होण्याची शक्यता कमी वाटते. मात्र, चीनची राजकीय व्यवस्था पाहता चीन कधीही आपली भूमिका बदलू शकतो. अण्वस्त्रप्रसाराबाबतही चीनची ख्याती चांगली नाही. पाकिस्तानने अण्वस्त्रे कशी मिळवली याचीही माहिती जगाला आहे. अस्थिर आणि दहशतवादाने पोखरलेला पाकिस्तान, चीनसारख्या देशाची पाकिस्तानला असलेली साथ, कश्मीरमधील हिंसाचार, काही स्थानिकांची त्याला असलेली फूस पाहता अणुधोरणात्मक पातळीवरील बदल गरजेचा वाटतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या