लेख : पर्यावरण समतोल ही समूहाची जबाबदारी

279

>> वैजनाथ महाजन

पर्यावरण समतोल राखण्याचे काम एकटय़ादुकटय़ाचे नाही, तर समूहाचे आहे आणि अधिकात अधिक मानवी सहभागाचे आहे. या देशाच्या उद्याच्या सुखरूप पर्यावरणाकरिता कोटय़वधी मने आणि तेवढेच हात पुढे येणे अगत्याचे आहे. सृष्टीचा समतोल सांभाळणे हे आजचे प्रत्येक देशाचे फार मोठे असे आव्हान आहे. भविष्यात आपण याला कसे सामोरे जातो त्यावर आपल्या उद्याच्या पर्यावरणाच्या पाऊलखुणा निश्चित होणार आहेत आणि त्यासाठी कटिबद्ध होणे ही आपली गरज आहे.

विश्वविख्यात जर्मन तत्त्ववेत्ता कार्लाईल याने असे म्हणून ठेवले आहे की, मध्य महासागरात जरी एक मासा कमी पडला तरी त्याचा परिणाम संपूर्ण मानवी सृष्टीवर होत असतो. कार्लाईल याचे हे अर्थपूर्ण विधान आपणास सृष्टीचा समतोल किती नेमका आहे हेच सांगत आहे. पण ज्यावेळी मानवी हस्तक्षेपामुळे सृष्टीत चलबिचल सुरू होते, अनेक प्रतिकूल घटना घडू लागतात तेव्हा त्याला निसर्ग जबाबदार असत नाही, तर फक्त माणूस आणि माणसाचा स्वार्थ हेच जबाबदार असते. पर्यावरणाचा जो गुंता तयार झालेला आहे तो मनुष्याच्या स्वकेंद्रित जगण्याची कमालीची ओढ आणि त्याकरिता वाट्टेल ते करण्याची तयारी यातून निर्माण झाला आहे. म्हणजे एखादा महामार्ग होत असताना जर आपण काही किलोमीटरच्या परिसरातील अत्यंत घनदाट अशी झाडी उद्ध्वस्त करून टाकत असू आणि त्याच्या जागी पर्यायी कोणतीही झाडे लावत नसू तर भविष्यातील अनर्थ अटळ असतो आणि आपण आपल्या वस्त्या वाढविण्याच्या नादात बाकीचे प्राणीमात्रही जगण्यासाठी धडपडत आहेत हे जर लक्षातच घेणार नसू तर त्या जिवांनी काय करावे? ‘बिबटे भरवस्तीत येतात’ या आता बातम्या राहिलेल्या नाहीत. हत्ती कळपाने आपल्या वस्तीत येतात आणि पिकांची नासाडी करतात म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काय साध्य होणार? कारण आपण आपल्या वस्त्यांच्या स्वार्थाकरिता जर त्यांच्या वस्त्या उद्ध्वस्त करू लागलो तर त्या निष्पाप जिवांनी काय करावे? आणि कुठे जावे? याचे संतुलन साधणे हेच काम पर्यावरणाचे आहे. अलीकडे या दिशेने काही पावले पडू लागलेली आहेत हे मात्र निश्चितच स्वागतार्ह वाटते.

        वाहनांच्या उदंड संख्येमुळे जे रस्ते डांबरी नाहीत अथवा काँक्रीटचे नाहीत त्या रस्त्यावरून प्रचंड धूळ उडते आणि पक्ष्यांचा जीव गुदमरतो. मग चिमण्या वेगळा निवारा शोधू लागतात आणि मग आपणाला चिमणीसाठी दिवस साजरा करण्याची वेळ येते. जे चिमणीच्या बाबतीत आहे तेच सर्व पक्ष्यांच्या बाबतीत आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या वर्तनशैलीचा आयुष्यभर अभ्यास करून असे दाखवून दिले आहे की, पक्षी हे मनुष्यावर अनंत उपकार करण्याकरिताच आकाशी झेपावत असतात. त्यांची एक निसर्ग साखळी सिद्ध आहे. ते माणसाला कधीही हानी पोहोचवत नाहीत असेच सलीम अली यांनी दाखवून दिले आहे. तरी पण आपण त्यांची जमात वाढावी, आभाळ पक्ष्यांनी भरून जावे याकरिता काय करत असतो? खरे तर जसे जसे प्राणीजगत आणि पक्षीविश्व वृद्धिंगत होत राहील तसतसा माणूस अधिक सुरक्षित होत राहील हे स्पष्ट आहे. या दिशेने काम करण्याकरिता आता तरुणाई सरसावत आहे ही निश्चितच आशादायक आणि उत्साह वाढविणारी अशी बाब ठरावी. अलीकडे सांगली जिह्यातील एका पक्षीतज्ञाने शाळाशाळांतील मुले गोळा करून त्यांना पक्ष्यांच्या सवयी, पक्ष्यांचे जीवन प्रत्यक्ष दाखविण्याकरिता असंख्य जंगल सफारी सुरू केलेल्या आहेत. तसेच याच नगरीत आता सायकलवरून सतत फिरण्याची जणू चढाओढच सुरू झाली आहे. त्याकरिता सायकली आणि सायकलधारकांचे गट निर्माण होत आहेत. त्याचबरोबर शनिवार-रविवार चारचाकी गाडीला हात लावायचा नाही असाही काही अधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे. यातून हवेचे प्रदूषण निश्चितच कमी होणार आहे आणि आजूबाजूच्या वनस्पतींना संजीवनीही मिळणार आहे. त्यामुळे झाडांचे संरक्षण प्रथम आणि त्यानंतर संवर्धन असाच हा पर्यावरण रक्षणाचा क्रम राहिला पाहिजे. अलीकडेच म्हणजेच साधारणतः सात वर्षांपूर्वी आफ्रिका खंडातील वांगाई-मथाई या 80 वर्षांच्या महिलेला ‘शांततेचा नोबेल’ पुरस्कार देण्यात आला. हा का दिला? तर त्याचे कारण असे, या निरक्षर महिलेने लक्षावधी फळझाडे लावली आहेत आणि आता या झाडांची फलधारणा सुरू झाली आहे. नोबेल पारितोषिक समितीने शांतता पुरस्कार दिला म्हणून जगभरातून विचारणा झाली, पण त्यावर समितीने दिलेले उत्तर सर्वांनी निश्चितच लक्षात ठेवण्यासारखे आहे. समिती म्हणते की, या महिलेने लावलेल्या लक्षावधी वृक्षांना तिने आयुष्यभर कष्ट करून जगवले आहे. त्यामुळे भविष्यात ही सर्व झाडे फळांनी भरून येतील. ती फळे खाऊन इथल्या अनेक जमाती तृप्त होतील. आणि त्यांच्यात्यांच्यात केवळ भुकेपोटी होणारे संघर्ष कमी होतील याकरिता या महिलेला हा पुरस्कार देण्यात आला आहे. अशी कामे आपल्याकडेही करणारी मंडळी आहेत. भले ती आपल्या कामाची वाच्यता करत नसतील, पण त्यांना शोधून त्यांच्या कामात अधिकात अधिक माणसांना गुंतविण्याच्या योजना आता सरकारी पातळीवर आखाव्या लागतील हे स्पष्ट आहे. पर्यावरण समतोल राखण्याचे काम एकटय़ा-दुकटय़ाचे नाही, तर समूहाचे आहे आणि अधिकात अधिक मानवी सहभागाचे आहे. या देशाच्या उद्याच्या सुखरूप पर्यावरणाकरिता कोटय़वधी मने आणि तेवढेच हात पुढे येणे अगत्याचे आहे. सृष्टीचा समतोल सांभाळणे हे आजचे प्रत्येक देशाचे फार मोठे असे आव्हान आहे. भविष्यात आपण याला कसे सामोरे जातो त्यावर आपल्या उद्याच्या पर्यावरणाच्या पाऊलखुणा निश्चित होणार आहेत आणि त्यासाठी कटिबद्ध होणे ही आपली गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या