
- निलेश कुलकर्णी
हिंदुस्थानच्या दक्षिण टोकावरच्या पुद्दुचेरी नावाच्या एका लहान केंद्रशासित प्रदेशाला सध्या मोठी राजकीय व ‘राष्ट्रीय’ प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे ती भाजपच्या सत्ताकांक्षी धोरणामुळे. चार राज्यांसोबतच पुद्दुचेरी विधानसभेचाही बिगुल फुंकला गेला आहे. मात्र इन मीन तीस विधानसभा जागांच्या पुद्दुचेरीत निवडणुका जाहीर होण्याच्या अवघ्या चार दिवस अगोदर काँग्रेsसच्या व्ही. नारायण सामी यांचे सरकार बहुमताची लढाई हरले. ही लढाई काँग्रेस सरकारने हरावी, यासाठी भाजपने हरतऱहेचे प्रयत्न केले. डावपेच टाकले. आमदारांची फोडाफोडी झाली. दिल्लीतून रसद पुरवली गेली. विधानसभेची मुदत संपण्याच्या अवघ्या चार दिवस अगोदर हा राजकीय धुळवडीचा खेळ खेळला गेला.
पुद्दुचेरीत काँग्रेस सरकार सत्तेतून बेदखल होण्याआधी राहुल गांधी तिथे दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी केंद्रात मत्स्य खाते नसल्याची टीका त्यांनी केली. राहुल यांच्यासमोरच स्थानिक महिलांनी मुख्यमंत्री नारायण सामी यांच्याबाबतीत गंभीर तक्रारी केल्या. त्याचे चुकीचे भाषांतर नारायण सामींनी केले. त्यामुळेही मोठी टीकेची झोड उठली. राहुल जातात तिथले काँगेसचे सरकार जाते, अशी प्रचाराची आयतीच संधी भाजपला मिळाली. काँग्रेसची सत्ता तर गेलीच, आता परत सत्तेत काँग्रेस आली तर दक्षिणकेडची काँग्रेसची धुगधुगी कायम राहील. अन्यथा ‘गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले’ अशी अवस्था होऊ नये इतकेच.
पुद्दुचेरीसारख्या छोटय़ा केंद्रशासित प्रदेशातले राजकारण खऱ्या अर्थाने पटलावर आले ते तिथे किरण बेदींची नायब राज्यपाल म्हणून नेमणूक झाल्यानंतर. ‘अण्णा मंडळा’त लोकपालाचे गाणे गाणाऱ्या किरण यांना भाजपने सुरुवातीला दिल्लीत केजरीवालांविरोधात राजकीय रिंगणात उतरवले. मात्र केजरीवालांपुढे डाळ न शिजल्याने बेदींना नायब राज्यपालपद बहाल करण्यात आले. बेदींचा पोलिसी खाक्या आणि प्रसिद्धीचा कमालीचा हव्यास. यामुळे त्यांची पुद्दुचेरीतली कारकीर्द कमालीची वादग्रस्त ठरली. माझ्या राजकीय आयुष्यात ही सासू तुम्ही का नेमली, असा मिश्किल सवाल एकदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री नारायण सामी यांनी पंतप्रधानांना सदिच्छा भेटीवेळी विचारला होता. नायब राज्यपाल म्हणून नेमणूक केल्यानंतर नारायण सामींना काम करूच द्यायचे नाही. विकासाच्या कामाला खोडा घालायचा, हा एककलमी कार्यक्रम बेदींनी आरंभला. किरण बेदींच्या एककल्ली व हुकुमशाही कारभाराला केवळ काँग्रेसच नाही तर विरोधी पक्षातले आणि ज्यांनी भाजप प्रवेश केला असे सगळेच जण कंटाळले. बेदींनी नारायण सामी सरकारची पुरती वासलात लावल्यानंतर त्यांची राजकीय उपयोगिता संपली आणि केंद्राने त्यांची अचानक उचलबांगडी केली. आता तेथील निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप आणि माजी मुख्यमंत्री रंगासामी असा मुकाबला आहे. तामीळनाडू व केरळात कमळ फुलविण्याचे भाजपचे प्रयत्न अजून तरी फसफसलेलेच आहेत. पुद्दुचेरी जिंकून दक्षिणेत कमळ फुलविण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. अर्थात रंगास्वामींशी सूत जुळले तरच भाजपला आपले ईप्सित गाठता येईल. पुद्दुचेरीसारख्या छोटय़ाशा केंद्रशासित प्रदेशासाठी केंद्रातील मोदी सरकार जो आटापिटा करत आहे, तो पाहता छोटय़ा राज्यांनाही 2024 च्या दृष्टीने भाजपने गंभीरपणे पाहायला सुरुवात केल्याचे दिसते. काँग्रेस या केंद्रशासित प्रदेशाला कितपत गंभीरपणे घेते, यावर त्या पक्षाचे दक्षिणेकडील भवितव्य अवलंबून असेल. राज्य छोटे असो वा मोठे, झोकून देऊन निवडणूक लढविण्याची जिगर काँग्रेसला दाखवावीच लागेल.
दुसरे मनोज तिवारी
प्रतिभा असूनही क्रिकेटमध्ये अपेक्षित यश मिळवू न शकलेले क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून नवी राजकीय इनिंग सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच सेलिब्रिटींना आपल्या पक्षात ओढण्यासाठी भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये चांगलीच चढाओढ लागली आहे. माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही, हा सवाल अजून गुलदस्त्यात असला तरी गांगुलीच्या चाणाक्ष नजरेने क्रिकेटसाठी हेरलेला क्रिकेटपटू मनोज तिवारी मात्र तृणमूलमध्ये डेरेदाखल झाला आहे. भाजपच्या सेलिब्रिटींना शह देण्यासाठी ममतादिदींनीही सेलिब्रेटी मंडळींसाठी हात ढिला सोडला आहे. माजी क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्ला हे तर ममतादिदींच्या मंत्रिमंडळात पाच वर्षे कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. शुक्ला हे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये चमकू शकले नाहीत. मात्र राजकारणाने त्यांना हात दिला. त्यांच्याच कित्ता गिरवत मनोज तिवारींनी आता तृणमूलकडून ‘पॉलिटिकल बॅटिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटमध्ये नशिबाने हात न दिलेले तिवारी राजकीय मैदानावरची इनिंग गाजवतात का ते पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल. मनोज तिवारी तृणमूलकडून यशस्वी झाल्यास भाजपच्या दिल्लीत खासदार मनोज तिवारींनंतर या दुसऱ्या मनोज तिवारींचा तो राजकीय उदय असेल.
राजकीय संन्यास
तामीळनाडूचे राजकारण हे सध्या एखाद्या ‘चक्रीवादळा’सारखे हेलकावे घेत आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या खांद्यावरून भाजपचा झेंडा फडकविण्याची भाजपची कूटनीती तूर्तास धुळीस मिळाली व रजनीकांत यांनी राजकारण संन्यासाची घोषणा केली. त्यानंतर राजकीय संन्यासाची जणू लाटच तामीळनाडूत आल्यासारखी स्थिती आहे. रजनीकांतपाठोपाठ शशिकला यांनी राजकीय संन्यासाची घोषणा करून तामीळनाडूच्या राजकारणात खळबळ उडवली. एका साध्या व्हिडीओ शॉपची मालकीण ते तामीळनाडूच्या राजकारणातील एक शक्तिशाली केंद्र हा चिनम्मांचा प्रवास अचंबित करणारा आहे. जयललितांच्या काळात अम्मा व चिनम्मांचा बोलबाला त्या राज्याने अनुभवला आहे. जयललितांनंतर त्यांचा अण्णा द्रमुक हा पक्ष ताब्यात घेण्याचे डावपेच दिल्लीकरांनी टाकले, त्याला शशिकला आडव्या गेल्या. त्यानंतर दिल्लीच्या अवकृपेने त्यांना भाचा दिनकरन यांच्यासह तुरुंगात डांबले गेले. ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना बाहेर काढले गेले. आता तर त्यांनी अनपेक्षितपणे राजकीय संन्यासाची घोषणा करून एका क्लायमॅक्सचा अखेर केला आहे. शशिकलाबाईंची पूर्ण पटकथा दिल्लीतून लिहिली गेली आणि त्याबरहुकूम काम झाले. विधानसभा निवडणुकीत भाजपने बळेबळेच अण्णा द्रमुकशी युती केली. मात्र या युतीच्या मार्गात शशिकलाबाईंचा अडसर होईल, त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला तर अण्णा द्रमुक व भाजपच्या सत्तास्वप्नांना सुरुंग लागेल, या धास्तीपोटी दबावाच्या राजकारणातून चिनम्मांनी राजकारणाला गुडबाय केला आहे. शशिकला यांनी निरोप घेताना जो राजकीय संदेश दिला आहे त्यावरून कोणत्या दबावातून त्यांनी हा निर्णय घेतला हे स्पष्ट होण्यास पुरेसे आहे. ‘तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे. तामीळनाडूच्या भल्यासाठी द्रमुकला सत्तेत येण्यापासून रोखा,’ हा शशिकलांचा संदेश बरेच काही सांगणारा आहे. अम्मांच्या जाण्याने व चिनम्मांच्या राजकीय संन्यासामुळे तामीळनाडूच्या राजकारणाचे ‘महिला पर्व’ही संपले आहे.





























































