
>> दिलीप कोटिभास्कर
या वर्षी ओल्या दुष्काळाचा अनुभव घेत असलो तरी महाराष्ट्राला कायमच दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध जलस्त्रोत अपुरे असणं ही मुख्य समस्या आहेच. या परिस्थितीत पावसाचे पाणी जिरवा आणि वापरा या संकल्पनेवर आधारीत रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ही जलनीती भविष्यात कायम उपयोगी ठरणार आहे. चालतं पाणी थांबतं करा, थांबतं पाणी जिरतं करा म्हणजेच मुरतं करा ही कल्पना म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. 1999 ते 2005 या काळात पाऊस खूप कमी होता. मी सांगली व्रेडाईचा जेव्हा सेक्रेटरी होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, आपलं शहर छोटं आहे म्हणून आपली प्रगती कमी होत आहे, ती करायची असेल तर काय केलं पाहिजे, तर शहर मोठं केलं पाहिजे. शहर मोठं करायचं तर काय केलं पाहिजे, तर पाणी, पाण्याचे दुर्भिक्ष कमी करायला पाहिजे. आपल्या भागात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पावसाचं पाणी मुरवलं पाहिजे. कारण आपल्या भागात धरणं तेवढी नाहीत. सगळ्या भागात जर पाणी मिळवायचं असेल तर येणारं पावसाचं पाणी मुरवून त्याचं पुनर्भरण केलं पाहिजे असं लक्षात आलं आणि मी रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे वळलो.
वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग सांगलीत केल्यानंतर बोअरिंगच्या पाण्याचा साठा जास्त दिवस पुरतो हे लक्षात आलं आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रसार मी सुरू केला. हे एकटय़ाचं काम नाही, सगळ्यांनी मिळून केलं तर त्याचा सगळ्यांना फायदा आहे. एकाने करून उपयोग नाही, सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणून सांगली, पुणे महानगरपालिकेला आम्ही विनंती करून, की सगळ्यांना सक्ती करून रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला लावा, म्हणजे मग त्याचा फायदा सगळ्यांना होईल. मग मी त्याची माहिती देऊन ते पटवून दिलं. विविध ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करायचं, याची माहिती दिली.
रेन वॉटर हार्वेस्टिंगचे तीन ते चार प्रकार येतात. थोडक्यात पाणी मुरवायचं. म्हणजे मुरमापर्यंत ते पाणी नेऊन सोडायचं. ते तसं नेऊन सोडलं तरच ते भूगर्भात मुरलं जातं. मुरूम जिथे जवळ असेल तिथे व्यवस्थित खड्डा खणून त्याला चेंबर करून पाणी तिथे सोडलं तर ते लवकर मुरतं. समजा, काळी माती असेल तर मग ती काढूनच पाणी मुरमात मुरवावं लागत. समजा, काळी माती खूपच असेल तर मात्र बोअर मारून ते मुरुमात जाईपर्यंत खोल खणायचं. वर चेंबर करून मग ते बोअरमधून मुरुमात सोडायचं. जसा मातीचा प्रकार आहे, तशा प्रकारात ते करता येतं. काही ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकार पाणी साठविण्यासाठी केला जातो. मग ती शेततळी स्वरूपात असेल किंवा टाक्या करून त्यात साठविलं जातं. अशा साठविणे, मुरविणे आणि जिरविणे प्रकारात वॉटर हार्वेस्टिंग करता येते. जमिनीवर पडणारं पाणी तुम्ही जिरवू शकता, अगदी रस्ते जरी सिमेंटचे असले तरी बाजूने हे पडणारं पाणी जिरवता येतं. त्या पाण्याला स्लोप देऊन तुम्ही जमिनीत मुरवलं तर तुमच्या भूगर्भाची पाण्याची पातळी वाढते. थोडक्यात, पाणी वाहून जाण्याच्या ऐवजी ते जमिनीच्या पोटात नेऊन सोडणं यासाठी त्या ठिकाणी असलेल्या मातीचा प्रकार पाहून ते ठरवलं जातं. अंगणात, बिल्डिंगच्या बाजूला पडलेलं पाणी तसं नेऊन सोडायचं, अशा प्रकारे ही पाण्याची पातळी वाढते.
सिमेंटच्या रस्त्यावरचे पाणी मुरवता येणार नाही, पण रस्त्यावरचे पाणी व्यवस्था करून जर पाणी मुरविण्याची चेंबर केली तर हे वाहून जाणारे पाणी या चेंबरमधून जमिनीत मुरवता येते.
जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा पर्याय नाही, पण जे नैसर्गिकरीत्या पाण्याचे मार्ग आहेत, ओढा, नाला, नदी… या पाण्याच्या वाटा अडवून चालणार नाही. म्हणजे पाणी तुंबवून त्याला वाट न मिळणं हे होणार नाही, पण पाण्याच्या वाटेत, डोंगरावरून येणार म्हणजे माथ्यापासूनच व्यवस्था लावली तर उपयोग होऊ शकतो. मी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रयोग सांगली, पुणे, हुबळी अशा ठिकाणी केले आहेत. त्यामुळे जिथे बोअरिंगच्या पाण्याचा साठा कमी आहे, तिथे पाण्याचा स्रोत वाढतो.
एक उदाहरण सांगायचं झालं तर शेतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं ती जिरायती जमीन बागायती झाली. तिथे शेततळं करून पाणी मुरवत गेल्याने आपोआप तिथल्या विहिरींना, बोअरिंगला पाणी आलं. तिथली शेती जी केवळ पावसावर व्हायची ती रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रयोगामुळे बारमाही करता येऊ लागली.
पाणी असताना ते जिरविण्याची काही व्यवस्था केली गेली तर त्याचा फायदा त्या त्या शहरांना होत राहील. सोसायटीचे ग्रीन सर्टिफिकेट जे लागतं, त्यामध्ये जर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं असेल तर तुमचा एफएसआय, घरपट्टीमध्ये काही सवलत मिळते.
अलीकडे लोकांना पाणी कसंही वापरा अशी सवय लागली आहे. पाण्याचे मीटर बसले तर जे पाणी आपण वापरणार आहोत त्यावर पैसे पडणार आहेत, असा ‘सेन्स’ जर विकसित झाला तर पाण्याच्या वापरावर आपोआपच नियंत्रण येईल. ही सिस्टीम पूर्वी होती. वॉटर लाइनला पाण्याचे मीटर असायचे, पण त्या मीटरचे रीडिंग घ्यायचं हे करत बसण्यापेक्षा आपल्या मिळकत करात पाणीपट्टी भरावी लागते.
मनुष्य जे जगतो आहे ती निसर्गाची कृपा आहे. त्यामुळे आपण निसर्गाला धोका निर्माण करतो आहोत याचा विचार केला पाहिजे. निसर्गातल्या गोष्टीचा आपण वापर करतो, निसर्गाला आपण देणं असतो. जेव्हा निसर्गाला देणं असतो तेव्हा समाजाला देणं असतो. समाज हा निसर्गाचाच एक भाग आहे. जसं आपण पाण्याची बचत करतो, ते मुरवलं पाहिजे, तशीच झाडंही लावली पाहिजेत. सौर ऊर्जा असेल… अशी निसर्गाची ही संपत्ती वृद्धिंगत व्हावी. फक्त आपल्यापुरता त्याचा वापर नाही, तर पुढच्याही पिढय़ांना तो वापर मिळत राहावा या जाणिवेतून आपण जगलं पाहिजे. माझ्यापुरतं मी कसंही जगेन, पुढच्याचं कसंही होऊ दे, अशा पद्धतीने जगणं असू नये. म्हणजे थोडक्यात समाजभान असलं पाहिजे, आपल्यापुरतं पाहणं ही वृत्ती वाढायला लागली आहे. साध्या साध्या गोष्टीतून आपल्या वागण्याचा कोणालाही त्रास होऊ नये. माझ्या वागण्यातून निसर्गाची हानी होत असेल तर ती भरून काढली पाहिजे हा दृष्टिकोन विकसित व्हावा ही त्यामागची कल्पना आहे.
गेली अनेक वर्षे ओला दुष्काळ आपण पाहतो आहोत, पण कोरडा दुष्काळ खूपच त्रास देणारा ठरतो. 2005पासून जवळ जवळ 16वर्षे पाऊसपाणी बऱ्यापैकी चांगलं आहे. कदाचित हा रेन वॉटर हार्वेस्टिंग, झाडं लावा, ती जगवा याचा परिणाम असेल. पाऊसपाणी चांगलं आहे. पडलेलं पावसाचे पाणी जिरवायची सवय प्रत्येकाला लागली पाहिजे. जेव्हा अतिवृष्टी असते तेव्हा ते पाणी निसर्गाच्या स्रोतात जाऊन पोहोचणार आहे. पण मध्यम, सरासरीएवढ्या पडणाऱ्या पावसाचे पाणी मुरवणे ही काळाची गरज आहे.
शब्दांकन – मेधा पालकर
(लेखक हे बांधकाम व्यावसायिक, जिल्हा विकास मंचचे प्रमुख आहेत.)




























































