आधुनिक ऋषी : संत गजानन महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. शरयू जाखडी

सिद्धकोटीचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज वऱ्हाडातील शेगाव नगरीत प्रथम प्रकट झाले. आधुनिक काळातील संतश्रेष्ठाने 8 सप्टेंबर 1910 या दिवशी संजीवन समाधी घेतली. त्या दिवशी ऋषिपंचमी तिथी होती. उद्याच्या ऋषिपंचमीच्या निमित्ताने गजानन महाराजांचे हे पुण्यस्मरण…

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘काय वानू मी या संतांचे उपकार। मज निरंतर जागविती।’’ संत आपल्या विचारांतून मानवाला काया-वाचा-मने उपदेश करून सतत जागे ठेवीत असतात. संत गजानन महाराजांनी सद्विचार, सदाचार, सद्भावना जपणारी नीतिमान निस्पृह माणसे घडवली. सूर्याप्रमाणे तेजस्वी योगिराजांनी आपल्या विलोभनीय जीवनप्रकाशातून शेगावसहित सारी भरतभूमी परम प्रकाशित केली. परब्रह्म हे आकाशतत्त्वाप्रमाणे अपरिमित अपरंपार आहे. आकाशाचे प्रतिबिंब सर्वत्र व्यापून उरते. पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब पडते हे आपण पाहतो, परंतु पाणी त्याला लिप्त करू शकत नाही. तद्वत संतांचे अस्तित्व परब्रह्माप्रमाणे सर्वत्र व्यापून उरते, परंतु ते कशातही गुंतून पडत नाही. संतांची दृष्टी ‘क्ष’ किरणाप्रमाणे सर्वत्र पार करून अंतर्बाहय़ वेध घेत असते. खऱया संतांची दृष्टी वैश्विक पातळीवर सहजपणे अवगाहन करून येते. गजानन महाराजांच्या चरित्रात अशा अनेक घटना पाहायला मिळतात. समाधीच्या प्रसंगी महाराज भक्तांना म्हणाले, ‘‘मी गेलो एWसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका। कदा मजलागी विसरू नका। मी आहे येथेंच।।’’ त्यामुळे भक्तांना आजही महाराजांचा आधार वाटतो. मन अस्वस्थ झाले आणि ‘गजानन विजय’ ही पोथी वाचायला घेतली किंवा महाराजांना मनापासून कळवळून हाक दिली तर त्यांच्या अस्तित्वाचे प्रत्यंतर आजही येते. भक्ताला जितक्या आधाराची गरज असेल तितका आधाराचा हात पुढे करतात. या जगात दुष्ट, पातक्यांना सुखाने वावरताना पाहून आपले मन ईश्वरी सत्तेविषयी साशंक होते, पण परमेश्वर सर्व पाहत असतो. त्या पातक्याला पश्चात्तापाची व सुधारण्याची संधी देत असतो. तरीही पापी सुधारला नाही, तर त्याचा विनाश अटळ असतो. ज्या दिवशी पश्चात्तापदग्ध मनाने भक्त शरणागती पत्करतात, त्याक्षणी संत त्या पाप्यांना जवळ करतात. शिशुपालाचे शंभर अपराध श्रीकृष्णाने सहन केले, पण त्याच्यात काहीही सुधारणा न दिसल्याने श्रीकृष्णाने त्याचा अंत केला. त्याच्या अंताला, विनाशाला तो स्वतःच कारण होता. अशा ढोंगी, दुष्ट लोकांना गजानन महाराजांनी शिक्षा केल्या आहेत. ढोंगी संत आणि खरे संत यांच्यातील फरक आपल्याला कळला पाहिजे. संत तुकाराम महाराज एका

अभंगात ढोंगी, दांभिकतेचा दंभस्फोट पुढीलप्रमाणे करतात,
ऐसे कैसे जाले भोंदू। कर्म करोनी म्हणती साधू।।
अंगा लावूनिया राख। डोळे झाकूनि करिती पाप।।
दावुनि वैराग्याची कळा। भोगी विषयाचा सोहळा।।
तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती।।

ढोंगी माणसांना ओळखण्याचे सावधपण असले पाहिजे. नाहीतर आपण फसवले जातो. गजानन महाराजांनी ढोंगी प्रवृत्ती तिथल्या तिथे ठेचून काढल्या आहेत. सर्व संतांनी डोळस भक्तीचा महिमा सांगितला आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा किंवा भोळसरपणा यातील अंतर समजून आपण सदैव सावध राहिले पाहिजे. आपण पाहतो की, संतपणाचा बाजार मांडणारे मतलबी भोंदू या जगात कमी नाहीत. तथापि अवतारी संत मानवताधर्माची अखंड पताका फडकत राहावी यासाठी प्रयत्नशील असतात. संत गजानन महाराज हे त्यापैकी एक असून ते वैराग्याची पवित्र मूर्ती होते. त्यांना स्वतःसाठी वस्त्राच्या चिंधीचाही मोह नव्हता; परंतु त्यांना जनसामान्यांच्या गरजांची, त्यांच्या अगतिकतेची जाणीव होती. म्हणून गजानन महाराजांनी गावच्या कारभारी पाटील मंडळींना हाताशी धरून अनेक योजनांची मुहूर्तमेढ रोवली, उपक्रमांना गती दिली. दुर्वांकुरातून दुर्वांकूर फुटावेत तसे या योजनांनी वर्धिष्णू प्रसरणशील रूप धारण केले. महाराजांनी समाजाभिमुख नेतृत्वाची सकारात्मक मने घडवली. महाराजांच्या शब्दाला अमृताचे मोल देणारी माणसे त्यांच्या सहवासात घडत गेली. पिढय़ान्पिढय़ा हे असिधारा व्रत चालू राहिले. आजूबाजूच्या गावच्या लोकांनी हातात हात मिळविले. आज शेगावातील आनंदसागरसारखे नंदनवन असो नाहीतर भक्तनिवाससारख्या सुसज्ज दालनांची व्यवस्था असो, सगळीकडे शिस्त आणि स्वच्छता दिसते. असा सुंदर परिसर पाहून मन प्रसन्न होते. निस्पृह, निःस्वार्थी, कार्यरत, नीतिमान, चारित्र्यसंपन्न, विद्याविभूषित असे कार्यकर्ते या कार्याच्या रथाला जोडले गेले आहेत. या भक्त कार्यकर्त्यांच्या मनात हा विचार नेहमी असतो की, आपण करतो ते महाराजांना आवडेल का? या विचाराने ते कधीही प्रामाणिकपणापासून दूर जात नाहीत. आज शेगावी देणगी देताना लोक आनंदाने देतात. कारण भक्तांना हे ठाऊक असते की, या देणगीचा विनियोग विधायक कार्यासाठी प्रामाणिकपणे होणार आहे. कोरोना काळातही या संस्थानाने गरजूंना अन्नदान तसेच इतर मार्गांनी निस्पृहपणे मदत केली आहे. संस्थानच्या सुशिक्षित तरुण कार्यकर्त्यांनी पाणी योजना, अन्नदान, शैक्षणिक सेवा, वैद्यकीय सुविधा यांसाठी आधुनिक तंत्रसुविधांचा वापर केला आहे. तेथील सेवक वर्गाची विनम्रता आणि मठ परिसरातील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. महाराजांनी मठातील स्वच्छतेचा जो मंत्र सर्वांना दिला, त्याचे महत्त्व या कोरोनाच्या काळात प्रकर्षाने जाणवते. महाराजांसारख्या या आधुनिक ऋषीने स्वच्छता, प्रामाणिकपणा, निस्पृहता, चारित्र्यसंपन्नता, नीतिमानता यांचे जे धडे दिले आहेत, ते समाजाने गिरवणे अगत्याचे आहे. यातच समाजोद्धाराचे बीज दडलेले आहे.