दुर्गम भागातली दुर्गा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नाली अभंग

प्रसूतीच्या असहाय्य वेदनांमधून अनेक स्त्रियांना सोडवून बाळ आणि बाळंतिणीची सुखरूप सुटका करणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी पट्ट्यातल्या शांताबाईंना दुर्गम भागातल्या दुर्गाच म्हणावं लागेल. या दुर्गम भागात सुईण म्हणून काम केलं आहे. अनेक महिलांना प्रसूतिकळांमधून सोडवणाऱया, अनेक नवजात बालकांना त्यांच्या मातेच्या हातात सुखरूप देणाऱ्या शांताबाई स्वतः मात्र उपेक्षितच राहिल्या.

बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म असं म्हटलं जातं. अशा अवघडलेल्या स्थितीत स्त्रियांना वेळेकर मदत मिळणंही गरजेचं असतं. शहरी ग्रामीण भागात ती मिळतेही, पण अतिदुर्गम भागातल्या महिलाचं काय? हा प्रश्न उरतोच. वैद्यकीय सेवाच काय, पायाभूत सुविधांचा मागमूस नसतानाही अतिदुर्गम भागातल्या अवघडलेल्या महिलांची प्रसूती सुखरूप व्हावी म्हणून शांताबाई जाधव यांच्यासारखी एखादी महिला जेव्हा सरसावते तेक्हा आपसूकच आपले कर जुळतात.

प्रसूतीच्या असहाय्य वेदनांमधून अनेक स्त्रियांना सोडवून बाळ आणि बाळंतिणीची सुखरूप सुटका करणाऱया जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी पट्टय़ातल्या शांताबाईंना दुर्गम भागातल्या दुर्गाच म्हणावं लागेल. मांदरणे गावातल्या साबरवाडीत शांताबाई राहतात. शांताबाई राहत असलेला हा भाग आदिवासी पट्टय़ात येतो. आता पाणी, वीज यांसारख्या सुविधा या भागात मिळत असल्या तरी दहाएक वर्षांपूर्वी चित्र वेगळं होतं. अजूनही या भागात मातीचे कच्चे रस्तेच आहेत. अशा या दुर्गम भागात गरिबी तर आहेच. पण त्याचबरोबर वैद्यकीय सेवांचा अभावही आहे. अशा परिस्थतीत अनेक वर्षे शांताबाईंनी या दुर्गम भागात सुईण म्हणून काम केलं आहे. अनेक महिलांना प्रसूतिकळांमधून सोडवणाऱया, अनेक नवजात बालकांना त्यांच्या मातेच्या हातात सुखरूप देणाऱया शांताबाई स्वतः मात्र उपेक्षितच राहिल्या.

सुईण म्हणून काम करताना आलेले अनुभव सांगताना शांताबाईंच्या चेहऱ्यावर अपार समाधान आणि आनंद दिसतो. शांताबाईंची आईही सुईणीचं काम करायची. लहानपणी आईसोबत जाऊन शांताबाई सुईणीचं काम शिकल्या आणि आदिवासी पाड्यांवरच्या अनेक अवघडलेल्या बायकांना त्यांनी बाळंतपणाच्या वेदनादायी कळांमधून मोकळं केलं. बरं, हे करताना कधीही पैशांची अपेक्षा केली नाही. कुणी कधी दहा-वीस रुपये दिले तर घ्यायचे, पण कधीही पैशांसाठी अवघडलेल्या बाईची अडवणूक केली नाही हे त्या आवर्जून सांगतात.

आपल्या कामावर अपार निष्ठा असलेल्या शांताबाईंनी नवऱयाचे प्रेत दारात पडलेलं असतानाही पहिली अवघडलेल्या बाळंतिणीची सुटका केली आणि नंतरच नवऱयाचे अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले. मैलोन्मैल चालत, काटय़ाकुटय़ांतून वाट काढत, रात्री अपरात्री कधीही सांगावा येईल तेव्हा शांताबाई तडक निघायच्या.

एकदा असंच एका अवघडलेल्या बाईची प्रसूती करून घरी निघालेल्या शांताबाईना रस्त्यात नाग चावला. थोडीफार वनौषधींची माहिती असलेल्या त्यांच्या नवऱयाने लगेच त्यांना सफेत चाफ्याच्या झाडाची साल खायला दिली. शांताबाईंचा जीव वाचला, पण दात मात्र कायमचे पडले अशी आठवण त्या सांगतात. वयाची 80 पार केलेल्या शांताबाईंनी आतापर्यंत दोनएक हजार बाळंतपणं केली असतील असं त्या म्हणतात. वयोमानामुळे आता त्यांना सुईणीचं काम शक्य होत नाही. मात्र घराजवळच्या वाडय़ांमध्ये अजूनही कुणी बोलावलं की जाते असं त्या सांगतात.

‘‘माझ्या कामात म्या कधीच चुकले नाय. माझा हात हलका आहे. त्यामुळे बाई लवकर मोकळी व्हती’’ असं त्या म्हणतात. ज्या बायकांची त्यांनी बाळंतपणं केली त्यांच्या मुलांना आता नातवंडं झाली आहेत. या मुलांना पाहून त्यांना आनंद वाटतो. अनेक जणी येऊन पाया पडतात, गावात मला आदराने वागवतात यातच मला समाधान आहे असं त्या म्हणतात. शांताबाईंची आर्थिक परिस्थिती अद्यापही यथातथाच आहे. त्यांची मुलं-नातवंडं शेळ्या वळतात, काट्याने शेती करतात. त्यांना त्यांच्या कामात त्या मदत करतात. आपण केलेले काम किती मोठे आहे याची जाणीव शांताबाईंना नसावी. त्यांच्या बोलण्यात कुठलीही खंत नाही. स्वतःजवळ काहीही नसताना आज त्यांनी आदिवासी पाडय़ावरच्या अनेक स्त्रियांना मिळवून दिलेलं मातृत्त्वाचं सुख हीच शांताबाईंची कमाई आहे, तीच त्यांची श्रीमंती आहे. निःस्वार्थपणे शांताबाईंनी केलेली ही समाजसेवा निश्चितच त्यांची प्रतिमा उंचावणारी आहे. मात्र वार्धक्याच्या या टप्प्यावर आपण शांताबाईंना केलेली थोडीफार आर्थिक मदतही त्यांच्यासाठी मोठी ठरू शकते.
– [email protected]