सुरुवात करून तर पहा!

नवीन वर्ष सुरू झाले की, आपण अमुक तमुक करू असे संकल्प अनेक जण करतात. असे संकल्प सुरुवातीचे काही दिवस टिकतात आणि त्यानंतर ते विस्मरणात जातात. गेल्या वर्षी एकाने सांगितले होते की, मी दर महिन्याला एक नियमित रक्कम बाजूला काढून शेअर मार्केटमध्ये गुंतवत जाईन. त्याचा चार दिवसांपूर्वी फोन आला होता. म्हणाला, अजून सुरुवात झाली नाही. या वर्षी नक्की सुरुवात करेन. त्याच्याशी बोलताना काही मुद्दे पुन्हा सुचले. ते खालीलप्रमाणे होते, जे अनेकांना लागू होतात.

आपली आर्थिक ध्येये निश्चित करा. ‘जो चोच देतो, तो दाणाही देतो’ अशी एक म्हण प्रचलित आहे. अशी मानसिकताही असेल तर फार फार तर आजचा दिवस निघून जाईल. नोकरीत, व्यवसायात किंवा काहीही करीत नसू तरी सुरू असलेला दिवस कसाही निघून जातो. यावर उपाय म्हणून आपण आपले आर्थिक ध्येय निश्चित करायला हवे आणि त्यानुसार आपले वर्तनही असायला हवे. ही ध्येयं कमी काळात पूर्ण होणारी, तर काही दीर्घकाळात पूर्ण होणारी असू शकतील. त्यांची विभागणी करा.

स्वतःला शिक्षित करा – मनात आले म्हणून घाईघाईत सुरुवात करू नका. आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे ठरवून त्यानुसार आखणी करा. आपली सध्याची मिळकत, नियमित गरजा, सुरू असलेली देणी या सर्वांमधून उरलेल्या रकमेमध्ये आपण काय करू शकतो याचा निश्चित प्लॅन तयार करा आणि त्यानुसार गुंतवणूक करा. मग स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची आहे की म्युच्युअल फंड, ईटीएफ किंवा इतर याचा निश्चित पर्याय समोर येईल.

बजेटनुसार सुरुवात करा – सुरुवात करायची हा निर्णय झाल्यावर कितीने सुरुवात करावी हा प्रश्न उभा ठाकतो आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. खरे तर आपले उत्पन्न, आपला खर्च आणि आपण दर महिना किती रक्कम बाजूला काढू शकतो यावर निर्णय घेणे आवश्यक असते. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना निश्चित असे कोणतेच निकष नाहीत. तुम्ही किती रक्कम गुंतवता यापेक्षासुद्धा किती नियमित, शिस्तीने गुंतवणूक करता हे महत्त्वाचे असते.

इमर्जन्सी फंड – सर्व सुरळीत सुरू असताना अचानक कोणते तरी संकट उभे राहते आणि आपली आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत होते. संकट हे न सांगता आणि अचानकच येत असते. आजारपण, अपघात अशा अचानक येणाऱया आपत्कालीन परिस्थितीसाठी जर आपण तयार नसू तर त्याचे परिणाम दीर्घकाळपर्यंत टिकतात.

कशी सुरुवात करावी? – आपल्याला काहीच माहिती नसेल तर ‘सुरुवात कुठून करावी,’ असा प्रश्न पडणे साहजिक आहे, पण तिथेच अडून न बसता शिकण्याचे जे जे मार्ग असतील ते अवलंबणे आवश्यक असते. यूटय़ूब, वर्तमानपत्र, पुस्तके, वेब लिंक्स किंवा इतर माहीतगाराकडून सुरुवातीची माहिती मिळणे अगदीच शक्य असते. नंतर आपापल्या कुवतीनुसार आपल्या ज्ञानात भर पाडून घेणे हे आपल्याच हातात असते. गरज असते सुरुवात करण्याची आणि संयमाची.

>> प्रवीण धोपट
(लेखक, दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि येथे गुंतवणूक सल्लागार आहेत.)