धूम्रपानाची शिक्षा, महाग आहे सुरक्षा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

आपल्या कुटुंबाचे पूर्ण संरक्षण करण्यासाठी सर्वाना टर्म इन्शुरन्सचा आधार घ्यावा लागतो. पूर्वी टर्म इन्शुरन्स घेताना स्मोकर व नॉन स्मोकर असे वर्गीकरण नसायचे. धूम्रपानाची सवय लिहिल्यावर मेडिकल अंडररायटर प्रीमियम वाढवायचा की नाही हे ठरवत असत. कधी कधी स्मोकिंग असूनसुद्धा नॉर्मल रेटमध्ये पॉलिसी विमा कंपनीने स्वीकारल्याचे दाखले आहेत. पण हल्ली काही वर्षापासून टर्म इन्शुरन्स घेताना संभाव्य धोके लक्षात घेता स्मोकर व नॉन स्मोकर असे दोन गट पडले आहेत.

टर्म विम्यासाठी अर्ज करण्याआधी स्मोकरसाठी साधारण पाऊण ते दुप्पट प्रिमिअम आकारला जातो. जर 50 वर्षे वयाच्या व्यक्तीसाठी एक करोड विम्यासाठी नॉन स्मोकरसाठी प्रीमियम 50 हजार रुपये येणार असेल तोच प्रीमियम स्मोकरसाठी 90 हजारांच्या आसपास जातो. आधीच टर्म इन्शुरन्समध्ये पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर काही मिळत नाही त्यात विम्याची दुप्पट रक्कम हा स्मोकरसाठी टर्म विमा घेणे हा महागडा प्रकार होऊ लागला आहे. त्यावरही हेल्थ रिपोर्टमध्ये काही बिघाड असल्यास त्याचाही अधिकभार स्मोकरला सहन करावा लागतो. त्यामानाने नॉन स्मोकरसाठी नॉर्मल प्रीमियम आकारणी होते. हेल्थ रिपोर्टमध्ये काही बिघाड असेल तरच त्या पॉलिसीवर जास्त प्रीमियम आकारणी होते.

जास्त प्रीमियम लागेल म्हणून स्मोकिंग लपवणे योग्य नाही. विमा हा नेहमी ग्राहकावर विश्वास ठेवून दिला जातो पण जेव्हा क्लेम येतो तेव्हा मात्र ग्राहकाने दिलेली माहिती सत्य किंवा असत्य आहे ही तपासली जाते. यामध्ये ग्राहकाने दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळली तर मात्र विम्याचा दावा नाकारण्याचा पूर्ण अधिकार विमा कंपनीला असतो. त्यामुळे आपल्या आरोग्याविषयी व आपल्या सवयींबद्दल योग्य माहिती विमा घेताना प्रत्येक ग्राहकाने देणे आवश्यक आहे. ज्या कुटुंब सुरक्षेसाठी विमा घेत आहोत हे उद्दिष्ट जर साकार होणार नसेल तर चुकीची माहिती देऊन विमा घेण्यात काय अर्थ आहे ? विमा ही गोष्ट आहेच पण आपल्या आरोग्याला त्रास देणारे धूम्रपान व्यसन टाळलेलेच बरे.