
>> वैश्विक
4 ऑक्टोबर 1957 पर्यंत पृथ्वीभोवतीच्या अवकाशात आपल्या वातावरणाच्या पलीकडे, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण भेदून पार गेलेले एकही यान नव्हते. मग सेकंदाला 11 किलोमीटरचा वेग धारण करून ‘वेगात’ वर गेलेल्या आणि पृथ्वीभोवती विशिष्ट कक्षेत फिरत राहिलेल्या यानाला काय म्हणायचे? हे यान रशिया म्हणजे त्यावेळच्या ‘यूएसएसआर’ने सोडलं होते आणि त्याला त्यांनी ‘स्पुतनिक’ असे नाव दिले होते. त्यामुळे नंतर काही काळ कोणत्याही देशाच्या उपग्रहाला ते ‘ब्रॅण्ड’नेम असल्यासारखं चिकटलं (‘बल्ब’ला ‘ग्लोब’ म्हटलं जायचं तसंच), परंतु नंतर लवकरच चंद्र जसा उपग्रह होऊन पृथ्वीभोवती फिरतो तशी फिरणारी ही यानं ‘कृत्रिम उपग्रह’ गणली जाऊ लागली. आता अशा ‘सॅटेलाइट’ सोडून अवकाश वापरण्याच्या संशोधनाला यंदा 66 वर्षं पूर्ण होतील.
एवढय़ा काळात पृथ्वीवरच्या अनेक देशांनी मिळून सुमारे साडेआठ हजार उपग्रह अवकाशात पृथ्वीभोवतीच्या विशिष्ट कक्षेत सोडले आहेत. गत वर्षीच्या नोंदीनुसार त्यातले साडेपाच हजार ‘ऑक्टिव्ह’ किंवा कार्यरत असून बाकीचे निकामी होऊन नुसतेच अंतराळात पृथ्वीभोवती गिरक्या घेत आहेत. याचाच अर्थ त्यांना भ्रमणासाठी लागणारी ऊर्जा संपल्याने गती हळूहळू कमी होत, गरगरणारा भोवरा नंतर जसा पडतो तशीच त्यांची अवस्था होणार. म्हणजे ते कोसळणार… पण कुठे? तर जिथून उडाले तिथे म्हणजे पृथ्वीवरच! मग असा पहिला कृत्रिम उपग्रह कधी पडला? रशियाचा ‘स्पुतनिक-1’ हा जगातला पहिला उपग्रह केवळ 58 सेंटिमीटरचा चिमुकला उपग्रह होता. त्याचा जीव कितीसा असणार? त्याने अंतराळी इतिहास घडवला आणि 4 जानेवारी 1958 रोजी म्हणजे बरोबर तीन महिन्यांनी तो पृथ्वीवर कोसळला. हा जगामधला पहिला ‘उडता’ आणि ‘पडता’ही उपग्रह. तो इवलासा असल्याने वातावरणाच्या घर्षणाने पूर्णतया जळून गेला. रशियाच्या दुसऱ्या उपग्रहातून मात्र एक सजीव म्हणजे जगप्रसिद्ध ‘लायका’ कुत्री अवकाशात गेली. पृथ्वीवरून अवकाशात जाणारा पहिला सजीव होण्याचा सन्मान आपल्याला मिळतोय, पण त्यातच आपला बळी जाणार आहे यापैकी कशाचीच कल्पना त्या उमद्या आणि मुक्या जिवाला नव्हती. ‘स्पुतनिक-2’मध्ये मात्र ‘लायका’व्यतिरिक्त फोटोमीटर वगैरे उपकरणे बसवून त्याद्वारे वातावरणाची माहिती पृथ्वीवर येण्याची योजना केली होती. ती पूर्ण झाली, पण हा उपग्रहसुद्धा अल्पजीवी ठरणारा होता.
नंतर अमेरिका या स्पर्धेत उतरली. अगदी स्पाय सॅटेलाइट सोडले जात असल्याच्या वार्ता त्यावेळी येत असत. त्याशिवाय पृथ्वीच्या भूगर्भाचा, वातावरणाचा, वाऱ्यावादळाचा अभ्यास करणारे ‘रिमोट सेन्सिंग’ सॅटेलाइट अवकाशात जाऊ लागले तेव्हा आमच्या दृष्टीने प्रत्येक बातमी आश्चर्यकारक असायची. 1970च्या दशकात तर अमेरिकेने ‘स्कायलॅब’ हे ‘स्पेस स्टेशन’ सुसज्ज अवकाश स्थानकच अवकाशात पाठवलं. त्याचं अवकाशात जाणं तेव्हा केवळ विस्मयकारी होतं. छोटे कृत्रिम उपग्रह कोसळताना पृथ्वीच्या वातावरणात शिरताना जळून जातात हे माहीत असल्याने त्याची धास्ती वाटत नव्हती. जग अशा ‘पतना’च्या बातमीने पहिल्यांदा घाबरलं ते 1979 मध्ये ‘स्कायलॅब’ कोसळणार हे निश्चित झाल्यावर! हे मोठं अवकाश स्थानक तर वातावरणात जळून नष्ट होणार नव्हतं. म्हणजे ते एखाद्या अशनीसारखं (अॅस्टेरॉइड किंवा महापाषाणासारखं) पृथ्वीवर कुठेतरी आदळणार हे नक्की झालं. बहुतेक ते समुद्रातच पडेल असा दिलासा शास्त्रज्ञ देत असले तरी गॅरंटी काय? समजा, त्याचा वातावरणात शिरण्याचा ‘कोन’ वेगळाच असला तर? ते एखाद्या वस्तीवरही कोसळू शकतं. यापूर्वी अशी वेळ आली नसल्याने हे यान ‘काळ’ होऊन आपल्याभोवती फिरतंय ही जाणीव भीतिदायक होती. अखेर 11 जुलै 1979 रोजी हा ‘काळ’ पृथ्वीकडे आलाच, पण योगायोगाने कोणाचीही ‘वेळ’ आली नव्हती. स्कायलॅब कोसळलं ते हिंदी महासागरात.
त्यानंतर कल्पना चावलासह अनेक अंतराळवीरांचा बळी घेणाऱ्या कोलंबिया यानाची भीषण घटना घडली आणि मानव समाज पुन्हा एकदा भयकंपित झाला. आताही गेल्या 20 एप्रिलला ‘ऱहेस्सी’ यान कोसळलं. ते सहारा वाळवंटात पडले म्हणून ठीक. तसं तर पृथ्वीवर उडता उडताच पृथ्वीवर पडलेलीही अनेक यानं आहेत. ‘अपोलो-13’ यानावर तर एक दुर्घटनापटही निघाला. या उड्डाणाच्या जागा सागरकिनारीच असल्याने यान लगेच पडलं तर ते समुद्रातच कोसळतं, पण एकदा पृथ्वीच्या कक्षेत भिरभिरायला लागून नंतर निकामी झालेल्या उपग्रह आणि यानांचे काय? पृथ्वीपासून 200 ते 800 किलोमीटरवर अंतराळात फिरणारे असे उपग्रह आणि यानांची संख्या 2030 पर्यंत 10 हजारांपलीकडे जाईल आणि 2050 पर्यंत अंतराळात कृत्रिम उपग्रहांची एवढी ‘टॅफिक जॅम’ होईल की, त्यांची आपापसातील टक्कर आणि त्यांचं पृथ्वीवर कोसळणं यांची संख्या वाढेल. अवकाशात अमेरिकेने साडेतीन हजार आणि आपलेही एकशे वीस उपग्रह फिरतायत. एकूण कृत्रिम उपग्रहांपैकी 3 हजार निकामी आहेत. ते कधीही, कुठेही कोसळू शकतात. याची जाणीव, उपाययोजना यावर सामान्य माणूस काय चर्चा करणार? कारण त्याला हा अवकाशी ‘कृत्रिम’ धोका ठाऊकच नाही. अर्थात विशाल सागर आपल्याला वाचवायला पुरेसे आहेत हे खरं!





























































