
>> माधव डोळे
चिमणी म्हणजे चिऊताई ही हल्ली विस्मरणात गेलेल्या गोष्टीसारखी नाहिशी होत आहे. वातावरणातील बदल आणि तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम चिमण्यांच्या वासतव्यावर होत आहे. अशावेळी त्यांचे अस्तित्व टिकविण्याचा आणि त्यांचे संवर्धन करून त्याबाबत समाजातही प्रबोधन करण्याचा प्रयत्न डॉ. ज्योती परब व डॉ. राज परब हे शिक्षक दाम्पत्य आपल्या ‘स्पॅरोताई फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत अविरत करीत आहेत.
एक घास चिऊचा.. एक घास काऊचा.. असं म्हणत आई आपल्या मुलाला घास भरवायची. पण तेव्हा आपल्याला कळायचं नाही की चिऊचा घास आणि काऊचा घास म्हणजे काय? कालांतराने आपण हा चिऊचा घास विसरून गेलो चिमणीलाही विसरलो. पण चिमणी, निसर्ग आणि माणूस यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष खूप संबंध आहे. पीक चांगलं यावं म्हणून चिमणी मोलाची मदत करीत असते. सोशल मीडियाच्या या ‘स्मार्ट’ आयुष्यातील चिमणी कधी भुर्रकन उडून गेली हे कळलेदेखील नाही.
पक्ष्यांचं महत्त्व संतांपासून कवींपर्यंत अनेकांनी आपल्या काव्यातून सांगितलं आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरी.. पक्षीही सुस्वरे आळविती..’ हा अभंग आपण नेहमी ऐकतो. पण पक्ष्यांचा हा सुस्वर गेला कुठे? त्याला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने द्यायला हवीत. पण केवळ चर्चा करण्यापेक्षा किंवा प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा ‘या चिमण्यांनो.. परत फिरा रे..’ अशी साद अकरा वर्षांपूर्वी ठाण्यातील डॉ. ज्योती परब व डॉ. राज परब या दाम्पत्याने घातली. 2009 मध्ये मुंबई सोडून ते ठाण्यातील ओवळा येथे राहायला आले. त्यावेळी पक्ष्यांसाठी त्यांनी एक पिंजराही आणला. त्या पिंजऱयात काही चिमण्यांना ठेवले. पण एक दिवस पिंजरा रिकामा दिसला. सर्व चिमण्या आकाशात उडून गेल्या होत्या. मुलाला विचारलं, पिंजऱयाचा दरवाजा कुणी उघडला? त्यावर तो म्हणाला, ‘‘झाडावर काही पक्षी होते. ते ओरडले की पिंजऱयातील पक्षी ओरडायचे. त्यांचे मित्र आले म्हणून त्यांना भेटायला जाण्यासाठी मी पिंजऱयाचा दरवाजा उघडला. लगेच सगळे पक्षी आनंदाने उडून गेले. पक्षी झाडावरच बसतात ना.. मग मीसुद्धा त्यांना तिथेच पाठवले.’’ हा प्रसंग स्वतः पक्षीप्रेमी असलेल्या परब दाम्पत्याच्या काळजाला चटका लावून गेला. तेव्हाच त्यांनी ठरवलं की, चिमण्यांना कधीही पिंजऱयात ठेवायचे नाही. त्यातूनच मग त्यांनी स्थापन केली ‘स्पॅरोताई फाऊंडेशन’ नावाची संस्था.
चिमण्यांच्या संवर्धनासाठी दोघांनीही सुरू केलेल्या कामात केवळ ठाण्यातीलच नव्हे तर वेगवेगळ्या जिह्यांमधील विद्यार्थी, शिक्षक, पक्षीप्रेमी यांनीही भाग घेतला. डॉ. ज्योती परब व डॉ. राज परब हे दोघेही शिक्षक. त्यांची संकल्प इंग्लिश स्पूल नावाची संस्था आहे. सुमारे दीड हजार विद्यार्थी तिथे शिकतात. विशेष म्हणजे शाळेच्या आवारात अगदी वर्गातदेखील ठिकठिकाणी मिळून खास चिमण्यांसाठी पन्नासहून अधिक घरटी उभारली आहेत. चिमण्यांचे संवर्धनाचे काम करीत असताना त्यांनी या पक्ष्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. चिमण्यांची गरज काय, त्यांना खायला काय लागते, त्यांच्या गरजा काय हे जाणून घेऊन फाऊंडेशनने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आपल्या घराच्या गॅलरीत किंवा मोकळ्या जागेत डिशमध्ये बाजरी, तांदूळ ठेवावेत. छोटय़ा भांडय़ात त्यांना पिण्यासाठी पाणीही ठेवणे आवश्यक आहे. चिमण्यांच्या दाण्यापाण्याची सोय केल्यानंतर बऱयाच दिवसांनी या चिमण्या येतात. हा प्रयोग परब यांनी स्वतः त्यांच्या घरी करून बघितला आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तब्बल दोन-तीन महिन्यांनंतर चिमण्या येऊ लागल्या. आता तर त्यांचं अवघं घर चिमणीमय झालं आहे. घराच्या कोपऱयात त्यांनी स्वतः चिमण्यांसाठी घरटी उभारली असून त्यात हे पाहुणे रोज हक्काने येतात. त्यांच्या घरातील चिवचिवाटमय संगीत ऐकणे हा एक वेगळाच अनुभव आहे. शाळेतील तुटलेल्या बेंचपासून चिमण्यांसाठी लाकडी घरे बनवली. ही घरे त्यांनी पक्षीप्रेमींना फुकट दिली आहेत. एवढेच नव्हे तर येऊर तसेच अन्य जंगलांमध्ये विद्यार्थ्यांना सोबत घेऊन चिमण्यांची घरटी बसवली. चिमण्यांकरिता प्लॅस्टिकच्या बाटलीचा वापर करून फिडरही बनवले. त्याशिवाय पाण्याची व्यवस्था केली. त्याचा फायदा असा झाला की चिमण्यांची संख्या वाढू लागली. गेल्या वर्षी चिऊताईचा चिवचिवाट हा विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांचा संग्रह फाऊंडेशनने प्रसिद्ध केला. फाऊंडेशनला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी गौरव केला आहे.
प्रत्येकाने आपल्या घरी चिमणीसाठी एक तरी घरटं उभारावं, त्यांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. ज्योती परब व डॉ. राज परब हे सतत करीत असतात. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकानं चिमणीशी मैत्री करायला हवी. आपले आयुष्य फक्त चिमण्यांसाठी देण्याचा निर्धार परब दाम्पत्याने केला आहे. प्रत्येक घरोघरी पुन्हा एकदा एक घास चिऊचा.. आणि एक घास काऊचा.. असे शब्द ऐकू यावेत हीच त्यांची इच्छा आहे.




























































