‘तरु’णाई – ‘शोभिवंत’टॅब्युबिया

>>डॉ. सरिता विनय भावे

जानेवारी महिन्यात मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर छेडानगर ते विक्रोळी या भागात दुभाजकाच्या जवळ मोहक गुलाबी रंगाच्या फुलांची उधळण करणारी Tabebuia rosea ची (टॅब्युबिया रोझिया) झाडे आपसूकच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात आणि पुष्परसिकांच्या चर्चेचा विषय ठरतात.

मूळचा द. अमेरिकेतील हा वृक्ष आपल्या शांत सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. अल साल्वाडोर या मध्य अमेरिकेतील देशाचा हा ‘राष्ट्रीय वृक्ष’ आहे. इंग्रजीत याला ‘पिंक ट्रम्पेट ट्री, पिंक पुई, पिंक टिकोमा’ या नावांनीही ओळखले जाते. मराठीत याला विशिष्ट असे नाव मिळालेले नाही. ‘हलका गुलाबी टॅब्युबिया’ असे मूळ इंग्रजी नावाचे शब्दशः भाषांतर असलेलेच नाव आहे. हिंदीत मात्र सुदैवाने ‘बसंत रानी’ या लाडिक नावाची याला प्राप्ती झाली आहे!

हा पानगळीचा वृक्ष असून माथ्यावर छत्रीसारखा वाटणारा गोलाकार पर्णसंभार याची खासीयत आहे. झाडाला मोजक्याच आडव्या, जाडसर फांद्या असतात. थराथराने असलेल्या उपशाखा त्या मानाने नाजूक, अस्ताव्यस्त असतात. पाने संयुक्त, खरखरीत, अणकुचीदार टोकांची असतात. प्रत्येक पान हाताच्या पंजासारखे असून या पंजाला अनियमित आकाराची, बोटांसारखी, पाच उपपर्णे असतात. मधले बोट (उपपर्ण) सगळ्यात मोठे असते.

झाडे निष्पर्ण असताना किंवा खूपच कमी पाने असताना डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत बहरून येतात. बहराच्या दिवसांत सुंदर फुलांची छत्रीच जणू रस्त्यावर उभी ठाकली आहे असे वाटते! आकाराने तुतारीसारखी असलेली फुले गुच्छाने येतात. पिवळट मध्यभाग असणाऱया या फुलांच्या पाकळ्यांमध्ये शुभ्र पांढरा (दुर्मिळ), हलका गुलाबी, गुलाबी ते गर्द गुलाबी अशा विविध छटा आढळून येतात. पूर्ण फुललेले झाड स्वतःच एक मोठा पुष्पगुच्छ असल्यासारखे वाटते! बहर उतू जाणाऱया अशा अनेक झाडांना एकाच वेळी बघणे म्हणजे ‘बघतच राहावे’ असाच नजारा असतो!

फुले सुवासिक नसली तरी मनोहारी असल्यामुळे विविध पक्षी आणि अनेक प्रकारचे कीटक या झाडांभोवती भिरभिरत असतात. त्यांच्यामुळे परागीभवन होऊन काही कालावधीनंतर लांब, शिडशिडीत शेंगा झाडाला लटकतात. हिरव्या शेंगा वाळून तपकिरी झाल्यावर फुटतात आणि बारीक, पापुद्रय़ासारखे पंख असलेल्या बिया रुजण्यासाठी वाऱ्यामार्फत दूरवर उडून जातात.

झाडाच्या सालीपासून बनवलेला काढा पोटातील कृमी, बद्धकोष्ठ, हिवताप यावर गुणकारी असतो. फुले, पाने आणि मुळांपासून तयार केलेला अर्क ताप आणि वेदना कमी करण्यासाठी वापरतात. मूळचे परदेशी असले तरी सुदैवाने आता आपल्याकडेही हे झाड शासनाच्या शहर आणि रस्ते सुशोभीकरणाच्या मोहिमेमुळे चांगलेच फोफावले आहे. पाने असताना सावलीसाठी आणि फुले असताना डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी हे ‘शोभिवंत’ झाड खूपच मोलाचे आहे!

इंग्रजीमध्ये ‘पिंक ट्रम्पेट ट्री’ या नावाने तर हिंदीमध्ये ‘बसंत रानी’ या लाडिक नावाने ओळखले जाणारे टॅब्युबिया रोझिया’ हे झाड जानेवारीत मनमोहक फुलांची उधळण करीत असल्याने लक्षवेधी ठरते. मूळचे परदेशी असले तरी आपल्या देशातही रस्ते सुशोभीकरणासाठी हे ‘शोभिवंत’ झाड मोलाचे ठरले आहे.
[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या