तंत्र डबिंग अन् व्हॉईस ओव्हरचे

>> किरण खोत, निवेदक, सूत्रसंचालक

नुसतंच चित्रपट क्षेत्रात नव्हे, तर कार्टून डबिंग किंवा काही डॉक्युमेंटरी बनवण्यासाठीसुद्धा असा आवाज देणाऱ्या कलावंतांची गरज नेहमीच भासते. म्हणूनच आपण आपला आवाज रेकार्ंडग स्टुडिओमध्ये जाऊन एकदा डब करून जरूर बघावा.

आवाजाची शक्ती अमर्याद आहे. म्हणूनच आपल्याला ईश्वराने दिलेल्या या जादुई शक्तीचा वापर करत आपल्या स्वरयंत्राला चालना देत वेगवेगळ्या आवाजात आपला आवाज बदलण्याची क्षमता निदान एकदा तरी पडताळून बघायला हवी.  ज्यांच्याकडे हे काwशल्य असतं त्या व्यक्तींना एक आगळंवेगळं क्षेत्र खुलं होतं ते म्हणजे व्हॉईस ओव्हर आणि डबिंगचं.

एखादा दक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये जेव्हा प्रसारित होतो किंवा एखादा इंग्रजी चित्रपट मराठी – हिंदीमध्ये किंवा कोणत्याही अन्य प्रादेशिक भाषेतून प्रसारित होतो तेव्हा तेव्हा त्या त्या भाषा अवगत असणाऱ्या व्हॉईस ओव्हर आर्टिस्टची गरज ही नेहमीच भासते. इंग्रजी, हिंदीसोबत आपली राज्यभाषा तसेच आपली प्रादेशिक भाषा अवगत असणं खूप गरजेचे असते. प्रादेशिक भाषेत असणारे उच्चार, संवादामधील लयबद्धता, त्यातले विशिष्ट हेल हे काढता येत असल्यास संधीचे एक नवे दालन आपल्यासाठी खुले होते.

आपला आवाज वेगवेगळ्या सप्तकामध्ये बदलण्याची क्षमता असल्यास त्याचा आपण अत्यंत प्रभावीपणे वापर करू शकतो. पुरस्कार सोहळे, माहितीपट अशा वेगवेगळ्या ठिकाणी अशा आवाजाची आवश्यकता भासत असते. चित्रपटातील किंवा वाहिनीतील पात्राच्या वयोमर्यादेप्रमाणे, त्याच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे, त्याच्या देहबोलीप्रमाणे वेगवेगळ्या आवाजाची आवश्यकता भासत असते. तज्ञांचे मार्गदर्शन  घेऊन आपल्या आवाजाला निदान एकदा तरी असे पडताळायला हरकत नाही.

बदलत्या जमान्याप्रमाणे ब्रॉडकास्टला आणि पॉडकास्टला भविष्यात महत्त्व प्राप्त होणार आहे. जर आपल्याला असे वाटत असेल की, आपला आवाज गहिरा किंवा वेगवेगळ्या सप्तकात बदलण्याजोगा आहे, आपले विविध भाषांवर प्रभुत्व आहे, तर या क्षेत्रासाठी नक्कीच स्वतःला एकदा जरूर पडताळून पाहावे. कारण अशा कलावंतांची चित्रपट, नाटय़सृष्टी, रेडिओ आणि दूरचित्रवाणीवर नेहमीच आवश्यकता भासत असते. देवाने दिलेल्या या अज्ञात कलेला खतपाणी घालून अर्थार्जन करण्याची संधी एकदा प्रयत्न करून पडताळून पाहायला काय हरकत आहे!

जाहिरातजिंगलमध्ये संधी

जर आपल्याला आपला आवाज सहज एका पातळीतून दुसऱ्या पातळीत बदलता येत असेल, वेगवेगळ्या भाषांवर आपले प्रभुत्व असेल तर जाहिरात क्षेत्रात, डबिंग क्षेत्रात किंवा रेडिओवर लागणाऱ्या जिंगलसाठी आपण आपला आवाज नक्कीच आजमावू शकतो.