
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
पौगंडावस्थेत मुलांमध्ये जसे शारीरिक बदल होतात तसेच भाकनिक बदलही होतात. फुलण्याच्या, उमलण्याच्या या कयात मुलांचं भाककिश्व जणू अनेक बदलांना सामोरं जातं. दोलायमान होतं. इथेच गरज असते साकरण्याची. उंच घेतलेला झोका भरकटणार तर नाही ना हे पाहण्याचं काम अर्थातच पालकांचं. हा कळणाकळणाचा प्रकास तरच मनासारखा होईल.
पौगंडावस्था… टीन एज! आपल्या सगळ्यांनाच हवंहवंसं वाटणारं असं हे वय. अतिशय छान आणि मस्त असतं हे वय. साधारण बाराव्या वर्षापासून आपल्या पौगंडावस्थेचा जो प्रवास सुरू होतो तो किमान एकोणीस वर्षांपर्यंत चालतो. जवळजवळ सात वर्षांचा हा प्रवास जसा गमतीदार असतो तसा वळणावळणाचादेखील असतो.
मजेदार यासाठी कारण, आपल्याला या काळात उत्साह भरपूर असतो. काय करू आणि किती करू असं होऊन जातं. मध्येच जग जिंकायला निघाल्यासारखं वाटतं. प्रेम, आकर्षण यांसारख्या कोमल गुलाबी भावना याच वयात उमलत असतात. याबरोबरच आपण कोण आहोत? आपल्याला नेमकं पुढे काय करायचं आहे? याचा विचारही आपण याच वयात करायला सुरू करतो.
या पौगंडावस्थेची अजूनही काही वैशिष्टय़े आहेत. जसे की, आपला मूड लहानसहान गोष्टींवरून किंवा कारण नसताना बिघडू शकतो. घरातील सदस्य आणि आपण अचानक वेगळे वाटायला लागतो. स्वतःची कंपनी जास्त आवडू लागते. स्वतःला कधीकधी प्रगल्भ झाल्यासारखं वाटतं किंवा लगेच ‘अरे! मी तर लहान’ अशी परस्परांविरोधी जाणीव होते. यापैकी काहीही आपल्याला होत असेल किंवा होऊनही गेलं असेलच. या पौगंडावस्थेची गुणवैशिष्टय़ंही जाणवायला हवीत आणि दिसायलाही हवीतच.
कारण, हा सगळाच प्रवास आपल्याला एक परिपक्व व्यक्ती म्हणून घडवणार असतो. आपलं व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारा असतो. असाच काहीसा प्रवास श्रुती (नाव बदलले आहे.) अनुभवत होती. कॉलेज, क्लासेस, जीम, मित्रमैत्रिणी असं तिचं बिनधास्त जीवन होतं. त्यातच एक तिचा अगदी जवळचा मित्र होता, ज्याच्याबद्दल तिला आकर्षण वाटत होतं. तोसुद्धा तिच्यावर आकर्षित झाला होता. हे आकर्षण वाढत गेलं आणि श्रुती स्वतःबद्दल, तिच्या घरातील इतर लोकांबद्दल सर्व काही मोकळेपणाने त्या मित्राला सांगत गेली; ज्या गोष्टी तिच्या जवळच्या मैत्रिणीला माहीत होत्या. जेव्हा त्याने तिच्यामध्ये जास्त रस दाखवला तेव्हा तिनेही त्याला योग्य तो प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.
अशातच एक गोष्ट होत होती ती म्हणजे श्रुतीच्या घरातील वाढता ताण. एका संकुचित विचारांच्या कुटुंबातला तिच्यावर असलेला वाढता अविश्वास तिची चीडचीड अजून वाढवत होता. त्यातच इतर नातेवाईक तिच्या मोकळेपणाचा वेगळाच (फुकट गेलेली) अर्थ काढत होते जो तिच्या आईवडिलांकडून तिला ऐकवला जात होता. हे सर्व तिची घुसमट वाढवत होतं आणि त्या रागातून तिने शेवटी त्या मित्राबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा निर्णय घेतला. दोघांमधले संबंध पार पुढे गेले होते आणि तिच्याकडून एक चूक झाली. नंतर नंतर असं झालं की जेव्हा केव्हा श्रुतीच्या घरी भांडणं आणि तिच्यावरचा अविश्वास दाखवला जात होता तशी ती मुद्दामहून त्याला जाऊन भेटायची आणि पुन्हा चुकायची.
‘मॅडम, मला माहीत होतं मी चुकतेय पण मी मुद्दामहून अशा गोष्टी केल्या. जेव्हा तो नसायचा तेव्हा मी स्टेशनवर बसून राहायचे आणि जाणूनबुजून उशिरा घरी जायचे. नाहीतरी मी बिघडलेलीच होते नं.’ श्रुती बोलत होती.
श्रुती तसं बघायला गेलं तर खूप हुशार आणि सारासार विचार करणारी मुलगी होती. आपल्या कुठल्याही निर्णयाची जबाबदारी घेण्याची तिची तयारी असायची आणि याही वेळेस तिने ज्या काही गोष्टी केल्या त्या मुद्दामच केलेल्या होत्या.
असं काहीसं जेव्हा मुलं विशेषतः वयात आलेली मुलं वागायला सुरुवात करतात; त्या त्यांच्या वृत्तीला ‘बंडखोर वृत्ती’ असं म्हटलं जातं. ही बंडखोर वृत्ती मुलांमध्ये येण्यास काही प्रमाणात त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव असू शकतो. म्हणजेच घर, घरातील वातावरण किंवा आजूबाजूचा परिसर जर पोषक नसेल, त्यांच्यावर सतत पाळत ठेवली जात असेल, त्यांना सतत त्यांच्याबद्दल नकारात्मक ऐकवले जात असेल तर त्यांच्यातली बंडखोरी वाढू शकते.
कारण या वयात मुलं ही अतिसंवेदनशील झालेली असतात. त्यांच्यामध्ये होणाऱया शारीरिक आणि मानसिक बदलांना ती सामोरी जात असतात. त्यामुळेच एकटं राहावंसं वाटणं, चटकन react होणं, अचानक भावनिक होणं हे सर्व समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे.
तसंच त्यांच्या बंडखोर वृत्तीला शिक्षा किंवा नकारात्मक बोलून आळा घालण्यापेक्षा ती वृत्ती त्यांना त्यांच्या जीवनात उपयोगी पडेल अशा रीतीने त्यांना शिकवणे हे जास्त महत्त्वाचे आहे.
श्रुतीला सर्वप्रथम तिच्या चुकीच्या वर्तणुकीबद्दल जाणीव करून देणं गरजेचं होतं. घरच्यांचा राग ती त्यांना आणि स्वतःलाही एकप्रकारे शिक्षा देऊन काढत होती. त्याबरोबरच तिला हेही समजवणं गरजेचं होतं की हे तिचं असं वागणं तिला तिच्या आयुष्यात कुठेही उपयोगात येणारं नव्हतंच शिवाय तिचं त्यामुळे नुकसानच होणार होतं.
तिची चीडचीड आणि हतबलता स्वाभाविक होती, पण मार्ग मात्र निश्चितच योग्य नव्हता. त्यासाठी श्रुतीसाठी काही सेशन्स ठेवली गेली ज्यांमधून ती,
रागाचे नियोजन
ताणाचे नियोजन
न्यूनगंड कमी करणे आणि
ध्येयनिश्चिती
शिकत गेली. तिचा राग आणि ताण तसंच तिच्या मनात दबलेल्या नकारात्मक भावनांचा समुपदेशनाच्या माध्यमातून योग्य प्रकारे निचरा होत गेला. तसंच ती कोणाशी कसं आणि काय बोलायचं हेही समजत गेली. मित्रमैत्रिणी कोणत्या अंतरापर्यंत ठेवावेत ही समजही तिच्यात हळूहळू येत गेली.
आज श्रुती स्वतःला व्यवस्थित सांभाळत आहे. तिने स्वतःला माफ केलंय. ती शिकतेय आणि कमावतेय. तिच्या घरच्यांनी आता तिला समजून घ्यायला सुरुवात केलीय कारण तिने स्वतःच्या हुशारीने स्वतःला सिद्ध केलंय. आणि मीही तिला शुभेच्छा दिल्यात… तिच्या PhD साठी.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)




























































