लेख – व्याघ्रदिन एक दिवसापुरता नसावा

>> दिलीप देशपांडे

हजारो पर्यटक अभयारण्यास भेट देत असतात. निरनिराळे, प्राणी, पशुपक्षी ते बघतात, पण त्यांचे खास आकर्षण असते ते व्याघ्रदर्शन. दरवर्षी 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्रदिन साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्गला भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्रदिन म्हणून घोषित करण्यात आला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात जवळ जवळ एक लाख वाघ होते असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातो, तर काहींच्या मते ही संख्या चाळीस हजारांच्या जवळपास सांगितली जाते. आता तर ही संख्या चार हजारांवर इतकी खाली आली आहे. 96/97 टक्के वाघांची शिकार झाल्याने, नैसर्गिक मृत्यू झाल्याने तीन ते चार टक्के म्हणजे चार हजारांच्या आसपास वाघ शिल्लक आहेत. यापैकी 2200/2300 वाघ एकटय़ा हिंदुस्थानात आहेत. हिंदुस्थानात असलेला वाघ हा रॉयल बेंगॉल टायगर म्हणून ओळखला जातो. आपला देश हा जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश आहे आणि म्हणूनच हिंदुस्थानसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. वाघाची संख्या जास्त असल्याने हिंदुस्थान ही शेवटची आशा आहे असे म्हणतात.

देशात 39 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात नागपूर विभागातील व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अधिक आहे असा पाहणी निष्कर्ष असल्यामुळे नागपूरला जागतिक दृष्टीने वाघांची राजधानी संबोधण्यात येते.

चोरटय़ा शिकारी आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होणे याच कारणांमुळे वाघांची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. त्यामुळेच ही वाघाची डरकाळी लुप्त होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. वाघाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अन्नासाठी जवळच्या वस्त्यांवर वाघ हल्ले करू लागले. अशा परिस्थितीत वाघ आणि माणसाचे संबंध बिघडल्याचे जाणवते. वाढत्या शहरीकरण आणि व्याघ्र क्षेत्राचा समतोल साधला जाणे यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना आणि आवासाची आखणी होणे आवश्यक आहे, नाहीतर हा संघर्ष सुरूच राहणार आहे. परिस्थिती चिघळण्याआधीच शासकीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती म्हणून दखल घेणे आवश्यक वाटते. स्वयंसेवी संस्था, जनजागृतीसाठी कार्यक्रम करत असतातच.

2014 च्या गणनेनुसार देशात वाघांची संख्या 2226 होती, तर जगभरात 3890 वाघांच्या संख्येची नोंद आहे. 2018 साली ती महाराष्ट्रात 303 च्या जवळपास असल्याचे आकडेवारीत दिसते.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांत मेळघाट-अमरावती 42, ताडोबा-अंधारी, चंद्रपूर व असंरक्षित क्षेत्र 108, पेंच-नागपूर 32, सह्याद्री-3, नवेगाव-नागझिरा, गोंदिया जिल्हा- 7, बोर-वर्धा जिल्हा 4, टिपेश्वर पांढरकवडा अभयारण्य- 6 अशी वाघांची संख्या आहे. विदर्भातच ही संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात 312 च्या जवळपास वाघांची नोंद वन विभागाकडे असल्याची माहिती वनमंत्री यांनी विधान परिषदेत दिली होती. त्यातीत 212 वाघ असून 100 बछडे असल्याची माहिती आहे. देशात चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. वाघांची संख्या मागील तुलनेत वाढली आहे.

2016 सालात 100 वाघांचा मृत्यू झाला, 2017 सालात 98 वाघांचा मृत्यू झाला, तर 2018 सालात 100 वाघांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या सात/आठ वर्षांत मानव व वन्यप्राणी संघर्षात जवळपास पाचशेपेक्षा अधिक बळी गेले आहेत. विदर्भात याचा फटका जास्त बसला आहे. वाघांची संख्या वाढत असली तरी अशा कारणांमुळे वाघ आणि माणसांतला संघर्ष वाढला आहे. तरीही वाघाशिवाय जंगल नाही.

असा हा जंगलाचा राजा जंगलाचा श्वास आहे, ज्याला बघण्यासाठी लाखो पर्यटक, अभयारण्याला भेट देत असतात. कुठल्याही अभयारण्यात पर्यटक भेट देतात तेव्हा वाघाचे दर्शन व्हावे ही अपेक्षा ठेवून असतात. अनेक जंगली प्राणी दिसतात, पण वाघ दिसत नाही तोपर्यंत त्याची ट्रिप, पर्यटन पूर्ण होत नाही. त्याच कारणांमुळे पर्यटक आपला मुक्काम वाढवतात. आपण एक दिवसापुरता तो दिवस साजरा करतो. मग त्याचा विसर पडतो. वाघ ही जंगल संपत्ती आहे. तिची जपणूक व्हायला हवी. अनेक देशांची आर्थिक घडी या वन-जंगल संपत्तीवर बसली आहे. तेव्हा वाघासह या वनसंपत्तीचे रक्षण होणे, करणे हे आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे. वाघाशिवाय जंगलाची पूर्णता नाही.

29 जुलै रोजी जागतिक व्याघ्रदिन साजरा करण्याचा उद्देश हाच की, वाघांच्या नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करून जनजागृती करणे. हे करताना वाघांचे जंगलातले अस्तित्व टिकून राहावे, जंगलात वाघाची डरकाळी सतत ऐकू यावी ही अपेक्षा करूया!

आपली प्रतिक्रिया द्या