
>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार
एखाद्या कुटुंबाचा टॉपअप मेडिक्लेम असेल तर मात्र बेस पॉलिसीपेक्षा जास्त खर्च आला तरी ते कुटुंब आर्थिक नुकसानीपासून वाचू शकते.
जीवनाचा प्रवास करताना एखादं कुटुंब आर्थिकदृष्टय़ा डबघाईला जर जात असेल त्याचं प्रमुख कारण म्हणजे कुटुंबावर ओढवलेलं आजारपण व त्यासाठी झालेला हॉस्पिटलचा खर्च. जेव्हा एखाद्या कुटुंबात अशी गोष्ट घडते व मेडिक्लेम पुरेसा नसतो त्यावेळी अगदी स्वतःकडचे पैसे संपतात व कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा कुटुंब संपत्ती गमावून बसते.
हल्ली मेडिक्लेमची जागरुकता बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाचा काही ना काही तरी मेडिक्लेम असतो. पाहणीत असं दिसून येतं की, 2 ते 10 लाखांचा मेडिक्लेम बहुतेक लोक काढतात. पण जेव्हा हॉस्पिटल बिल काढलेल्या विमा रकमेच्या पलीकडे जाते तेव्हा मात्र आव्हाने सुरू होतात. त्यातही फ्लोटर पॉलिसी असेल व कुटुंबातल्या एका व्यक्तीने मेडिक्लेम वापरलेला असेल तर घरातल्या दुसऱ्या व्यक्तीसाठी त्याच वर्षात गरज लागल्यास मेडिक्लेम राहात नाही. पर्यायाने साठवलेले पैसे वापरणे किंवा कर्ज काढणे किंवा एखादी प्रॉपर्टी विकणे याखेरीज उपाय राहात नाही.
अशा वेळी एखाद्या कुटुंबाचा टॉपअप मेडिक्लेम असेल तर मात्र बेस पॉलिसीपेक्षा जास्त खर्च आला तरी ते कुटुंब आर्थिक नुकसानीपासून वाचू शकते. साधारण तीन लाखांच्या बेस पॉलिसीवर आपण टॉपअप पॉलिसी घेऊ शकता. एकदा का बेस पॉलिसी संपली की टॉपअप पॉलिसी आपल्या कुटुंबाचा तारणहार म्हणून उभी राहते. ही टॉपअप पॉलिसी अगदी 5 लाखांपासून एक करोडपर्यंत घेता येते. प्रत्येक विमा कंपनीच्या नियमानुसार या पॉलिसीची मर्यादा ठरत असते.
या टॉपअप पॉलिसीचा प्रीमियमदेखील अत्यल्प असतो. याचं कारण म्हणजे पहिल्यांदा आपली बेस पॉलिसी खर्च होते, मगच टॉपअप पॉलिसीचे फायदे वापरले जातात. टॉपअप पॉलिसीचा प्रीमियम बेस पॉलिसीच्या साधारण 10 ते 20 टक्के इतकाच असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने आपल्या बेस पॉलिसीवर जर 25 लाख ते एक कोटीच्या घरात टॉपअप पॉलिसी घेऊन ठेवली असेल तर कमीत कमी हॉस्पिटॅलिझेशनमुळे एखादं कुटुंब रसातळाला जाणार नाही व श्रीमंतीच्या मार्गावर आपला प्रवास चालू राहील.
हा लेख वाचल्यावर आपलीही टॉपअप पॉलिसी नसेल तर नक्की यावर विचार करा. बजेटमधला थोडा भाग टॉपअप पॉलिसीवर खर्च केला तर नक्कीच भविष्यातल्या आजारपणातल्या आर्थिक नुकसानीपासून आपण वाचू शकतो.
टॉपअप पॉलिसीमध्ये अशा पॉलिसीची निवड करावी की ज्यामध्ये एक क्लेम आला असेल तरीसुद्धा दुसऱ्या क्लेमसाठी त्याच वर्षामध्ये टॉपअप
पॉलिसी खिशातले पैसे न खर्च करता वापरता आली पाहिजे. याबरोबर जर का आपल्याला मोठय़ा हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट घ्यायची असेल तर आपली बेस पॉलिसी 10 लाखांची असणे फायदेशीर आहे.
























































