लेख – नैसर्गिक पर्यावरणाची पर्यटनाला संजीवनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– अजित कवटकर ([email protected])

पर्यटन व्यवसायाला सामर्थ्य प्राप्त करून देण्यासाठी आपले नैसर्गिक पर्यावरण स्वच्छ, सुंदर, समृद्ध असणे गरजेचे आहे. वनीकरण, पाणी स्रोतांचे शुद्धीकरण, स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन, संस्कृती-परंपरेचे जतन, प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासांचे रक्षण, प्रदूषण नियंत्रण, पर्यटकांना दर्जेदार सेवा वगैरेसारख्या गोष्टी जिथे एक नियम म्हणून प्रामाणिकपणे पाळल्या जातील, तेथील निसर्ग-पर्यावरण निरोगी बहरेल. बाहेरून येणाऱया पर्यटकांना अशा आरोग्यदायी पर्यावरणाचा लाभ तर होईलच, पण स्थानिकांसाठीदेखील तो आयुष्यभराचा आशीर्वाद असेल.

येणाऱया काही वर्षांमध्ये पर्यटन हा जगातील सर्वात मोठा उद्योग- व्यवसाय होण्याची शक्यता आहे. ज्या देशाला यामध्ये सर्वाधिक गती प्राप्त करणे शक्य होणार त्याची अर्थव्यवस्था ही सर्वांगाने समर्थ व समृद्ध असणार. पर्यटनाचे अर्थकारण जरी सर्वव्यापी असले तरी राष्ट्राच्या एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) व रोजगार निर्मितीवर होणारे त्याचे सकारात्मक परिणाम विशेष फायद्याचे ठरतील. म्हणूनच पर्यटनाला उत्तेजन देणाऱया, पर्यटकाला आकर्षित करणाऱया घटकांचे जाणीवपूर्वक संरक्षण, संवर्धन करणे आवश्यक ठरते. संस्कृती, वास्तुकला, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे, पाककला, कला-उत्सव, खरेदी आकर्षणे वगैरेंसारखे पर्याय जरी एखाद्या पर्यटकाच्या विचार-मनात फिरायला जाण्यासाठीचे ठिकाण ठरविताना प्राथमिकतेसाठी चढाओढ करत असले तरी नैसर्गिक पर्यावरणाच्या स्वच्छ सौंदर्याची जोड लाभलेल्या पर्यायाचीच निवड करण्यास तो अधिक आग्रही दिसतो. आपल्या भूमीतील निसर्ग सौंदर्याचा, नैसर्गिक संसाधनांचा अस्सलपणा शाबूत ठेवणे म्हणूनच महत्त्वाचे व फलदायी ठरते.

पर्यटनाची आकर्षण केंद्रे ठरलेल्या अनेक ग्रामीण भागांची अर्थव्यवस्था ही पर्यटकांच्या निरंतर प्रवाहामुळे आमूलाग्र बदलली आहे. ती वर्षागणिक अधिकाधिक विकसित होत आहे. पर्यटनामुळे स्थानिकांना उपलब्ध झालेल्या व्यवसाय व नोकरीच्या विविध संधींमुळे तेथील दरडोई उत्पन्न वाढत आहे, राहणीमान उंचावत आहे. परंपरागत कलाकौशल्यातून स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या कच्च्या मालावर आधारलेले हस्तोद्योग, पुटीर उद्योग, जे बाजारपेठेच्या अभावामुळे अगोदर नामशेष होण्याच्या मार्गावर होते, त्यास पर्यटनाच्या संजीवनीतून आता जीवदान लाभले आहे. त्या वस्तूंना निरंतर मागणी निर्माण झाली आहे. पर्यटक ग्राहक बनून शेतकऱयाच्या शिवारात वा दारावर जाऊन फर्स्ट-हॅण्ड खरेदी करण्याची पसंती दाखवित आहे. एपूणच काय तर, पर्यटनस्थळाच्या परिसंस्थेतील प्रत्येक रहिवासी मानवाला उत्पन्न वृद्धीच्या दृष्टीने पर्यटनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा हा होतच असतो. मालदीव राष्ट्राच्या जीडीपीला सर्वात मोठे योगदान हे पर्यटन व्यवसायाकडून होते. या वस्तुस्थितीवर विचार केल्यास देशाला केवळ परकीय चलन मिळवून देण्यातच नव्हे, तर देशांतर्गत सेवा व वस्तूंच्या उत्पादनालादेखील गती देण्याचे बळ पर्यटन उद्योगात आहे.

वाहतूक सेवा-सुविधांच्या अभावामुळे आजपर्यंत दुर्गम आणि म्हणूनच शुद्ध, निषिध्द राहिलेली निसर्गरम्य क्षेत्रं जेव्हा जगाच्या संपर्कात येऊन तिथे देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ वाढतो तेव्हा तेथील निसर्गाची सात्त्विकता टिकविण्याची कसोटी लागते. सेवा-सुविधा निर्माण करणाऱया सार्वजनिक उपक्रमांच्या निमित्ताने निसर्गाच्या नैसर्गिकतेवर होणारा प्रहार हा विकासाच्या दृष्टीने मर्यादित प्रमाणात स्वीकारणे अपरिहार्य असते. तेथील स्थानिकांसाठी तोच पुढे संधी उपलब्ध करून देणारा उन्नतीचा मार्ग बनणार असतो, परंतु पर्यटनाच्या प्रवाहाने वाहून आणलेल्या व्यवसायाच्या अगणित संधीतून धारण केली जाणारी व्यावसायिकाची भूमिका जेव्हा निसर्गाला, पर्यावरणाला आघात पोहोचवून स्वतःचा स्वार्थ साध्य करू पाहते, तेव्हा मग कालांतराने दैव देते आणि कर्म नेते बोलण्याची वेळ येते. आपला उदरनिर्वाह आणि एकूणच आपली प्रगती वा अस्तित्व ज्या पर्यावरणावर अवलंबून आहे, त्या पर्यावरणाच्या नैसर्गिकतेची काळजी घेणे केवळ व्यवहार्यच नव्हे तर सहिष्णू ठरते, परंतु प्रत्यक्षात मात्र अचानक बरसू लागलेल्या पैशांच्या धुंदीपुढे निर्वनीकरण, जलप्रदूषण, आर्द्र-पाणथळ जमिनींवर अतिक्रमण कधी व कसे होत जाते ते कळतच नाही. शेवटी होतं काय ? निसर्गाची सात्त्विकता व निरागसता हरवल्यामुळे पर्यटकांनी फिरविलेली पाठ दिसताच डोळे उघडतात, परंतु तोपर्यंत पर्यावरणाची अपरिमित हानी झालेली असते, जी सहजासहजी भरून काढता येणे शक्य होत नाही.

वनातील हिरव्यागार गर्द झाडांच्या सान्निध्यात, सहवासात मिळणारा आराम, आनंद याचे शरीर-मनाला होणारे फायदे विज्ञानानेदेखील सिद्ध करून दाखवले आहेत. सतत दडपणाखाली असलेल्या शहरी वातावरणातून बाहेर पडून तणावमुक्त होण्यासाठी लोक निसर्गाचा आसरा शोधतात, परंतु पर्यटनस्थळी त्यांना शहरातील तोच पृत्रिम अनैसर्गिकपणा दिसला तर पुन्हा त्या ठिकाणी येण्याचे ते जाणीवपूर्वक टाळतात आणि इतरांनाही रोखतात. याचा सर्वात नुकसानकारक परिणाम होतो तो तेथील स्थानिक व्यवसाय-व्यापारावर. झाडं तोडून, डोंगर सपाट करून, खारफुटी जमीन व नद्या बुजवून-दूषित करून उभारलेल्या व्यवसायातून तयार केल्या गेलेल्या वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी येणाऱयांची संख्या कमी होत जाते. अशामुळे पर्यटन उत्पन्नाचा कमी होत जाणारा गुणक प्रभाव हा त्या क्षेत्रात कार्य करणाऱया प्रत्येकाला मारक ठरतो. जैवविविधतेचे संवर्धन याचसाठी आवश्यक असते आणि पर्यटनाचा विचार करता ते अत्यावश्यकच होय.

विदेश भ्रमंती करून इथे स्वगृही परतलेला पर्यटक तेथील आकर्षणांविषयी काही जरी नाही बोलला तरी तेथील स्वच्छतेचे भरभरून कौतुक करायला कधीच विसरत नाही. स्वच्छता डोळ्यात भरते आणि भावते ती अशी. एखाद्या प्रदेशाला किती जरी सुंदर निसर्ग लाभला असला तरी मानवाच्या बेशिस्तीमुळे तिथे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्यास कोण तिथे ढुंपूनही पाहत नाही. नदीतटांवर, समुद्र किनाऱयावर पसरलेला कचरा आणि येणारी दुर्गंधी ही पर्यटकांना तिथून काढता पाय घेण्यास मजबूर केल्यावाचून राहत नाही. घराबाहेर पाऊल ठेवताच स्वच्छता सवयींचा विसर पडणाऱया पर्यटकांची याकामी जेवढी जबाबदारी असते त्याहून अधिक जागरुकता दाखवणे हे स्थानिकांचे कर्तव्य आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपली संस्पृती, रूढी-परंपरा शाबूत ठेवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आपल्या प्रदेशाची नैसर्गिक संसाधनं अधिक स्वच्छ, शुद्ध व समृद्ध करण्यासाठी आग्रही राहणे तितकेच लाभदायी ठरते. शुद्ध व निरोगी हवा अनुभवण्याच्या उद्देशाने होणाऱया पर्यटनाचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. ग्रामीण भागांतील पर्यटनस्थळांनी त्यांच्या याच नैसर्गिक व अंगभूत वैशिष्टय़ांचे जतन करून लाभ घेणे स्वाभाविक असते.

हिंदुस्थान आजही ग्रामीण अधिक आहे. स्वदेशी व आत्मनिर्भरतेला, खऱया अर्थाने त्या दुर्गम भागांपर्यंत चालना देण्यास तो मदत करू शकेल. पर्यटन व्यवसायाला सामर्थ्य प्राप्त करून देण्यासाठी आपले नैसर्गिक पर्यावरण स्वच्छ, सुंदर, समृद्ध असणे गरजेचे आहे. वनीकरण, पाणी स्रोतांचे शुद्धीकरण, स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन, संस्कृती-परंपरेचे जतन, प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासांचे रक्षण, प्रदूषण नियंत्रण, पर्यटकांना दर्जेदार सेवा वगैरेसारख्या गोष्टी जिथे एक नियम म्हणून प्रामाणिकपणे पाळल्या जातील, तेथील निसर्ग-पर्यावरण निरोगी बहरेल. बाहेरून येणाऱया पर्यटकांना अशा आरोग्यदायी पर्यावरणाचा लाभ तर होईलच, पण स्थानिकांसाठीदेखील तो आयुष्यभराचा आशीर्वाद असेल.