
>> प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे
श्रीजगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ‘वैकुंठगमन’ झाले ती तिथी फाल्गुन वद्य द्वितीया असून त्यांचे पुण्यस्मरण करताना ही तिथी ‘तुकाराम बीज’ या नावाने ओळखली जाते. या दिवशी श्रीक्षेत्र देहू तसेच अनेक ठिकाणी असलेली मंदिरे या ठिकाणी कीर्तन-प्रवचन-भजन-गाथा पारायण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने श्री तुकाराम महाराज यांनी जीवनातील व्यावहारिक व पारमार्थिक अशा एका प्रश्नावर एका अभंगातून ‘सत्यवाणी’ प्रकट केली आहे. तिचा मागोवा इथे विनम्रतेने घेतला आहे.
श्री तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग पुढीलप्रमाणे आहे ः ‘अवघा तो शकुन। हृदयी देवाचे चिंतन ।।1।। येथे नसता वियोग। लाभा उणे काय मग ।।2।। छंद हरीच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ।।3।। तुका म्हणे हरीच्या दासा। शुभ काळ अवघ्या दिशा ।।4।।’ (तुकाराम गाथा। अभंग क्र. 1019 तत्त्वार्थ प.पू. शंकर महाराज खंदारकर/ पृष्ठ 258)
त्यावर ‘तत्त्व-भाष्य’ करताना शंकर महाराज म्हणतात की, ‘हृदयामध्ये देवाचे चिंतन करणे हा सर्व काळ शुभशकुन मानावा. कोणत्याही कारणाने चिंतनात व्यत्यय येणार नसेल तर मग लाभाला काय कमी आहे? वाणीने हरीचे नाम घेणारा मनुष्य सर्वकाळ पवित्र असतो. हरीच्या दासाला सर्व काळ व सर्व दिशा शुभ असतात.’ हे भाष्य कळून घ्यावे म्हणून मागोवा घेतला.
थोर तत्त्वज्ञ व साक्षात्कारी संत डॉ. रा. द. तथा श्रीगुरुदेव रानडे यांनीही हा अभंग आपल्या ‘तुकाराम वचनामृत’ ग्रंथात शेवटी ‘व्यवहारचातुर्य’ या शीर्षकाखाली जे अभंग घेतले आहेत, त्यात सर्वाचे शेवटी घेतला आहे (क्र. 500/ पृष्ठ 167). प्रस्तावनेत त्यावर ‘सूत्र – भाष्य’ करतात. ते म्हणतात की, ‘‘हृदयात देवाचे चिंतन करणे याखेरीज दुसरा कोणताच शकुन मानू नये. ज्याला हरिनामाचा छंद लागला, त्याला सर्व काळ सर्व दिशा कल्याणकारकच होत’’ (पृष्ठ 26). हे कळून घ्यावे म्हणून त्याचाही मागोवा घेतला.
मनात आशंकांचे थैमान
श्री तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहून ‘सत्यवाणी’ प्रकट केली आहे. याचे कारण काय असावे? असा विचार मनात निर्माण होतो. त्याचे उत्तर शोधताना संतांनाही कळून आले की, व्यावहारिक जीवनात आणि पारमार्थिक वाटचाल करताना कोणता काळ अशुभ वा शुभ तसेच कोणती दिशा अशुभ वा शुभ याबद्दल अनेकांच्या मनात आशंकांनी थैमान घातले आहे. एखाद्या कामास जाताना वेळ चांगली कोणती? किंवा दक्षिण दिशा अशुभ असेल, त्या दिशेला जायचे किंवा नाही? त्यावर उपाय काय? इतकेच नव्हे, तर मांजर आडवी गेली की, लोक माघारी फिरतात! का म्हटले तर त्याचे उत्तर ‘अपशकुन’ झाला असे असते. दक्षिण दिशा जर वाईट तर दिशेला जायचेच नाही असे तर करता येणार नाही. मग लोक दक्षिणाभिमुख हनुमंतांचे दर्शन घेऊन बाहेर पडत. हल्ली काळ एवढा बदलला आहे की, दिशा वा वेळ याऐवजी कामासाठी बाहेर पडणे आवश्यक झाले आहे. मग असल्या आशंका डोक्यात घ्यायच्या नाहीत. सत्कार्य व सद्धर्म पाळायला शकुन-अपशकुन कसला? असो, धीर-निर्धार बुद्धीस प्रामाण्य मानून तो कृतिशील होऊ लागला ही गोष्ट स्वागतार्हच आहे, पण अशा गोष्टींना भक्तिमार्गी संतांनी ईश्वराचे अधिष्ठान देऊन त्यांची मन-बुद्धी बळकट केली व कृतिशील बनविले.
देहवास्तूचा विचार
संतांनी ईश्वराच्या अधिष्ठानाला देहवास्तूचे संस्कार जोडून त्यांच्या मनातील आशंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तूची शुद्धी आपण करतो, पण देहशुद्धीचा विचार करीत नाही? असा प्रश्न निर्माण होतो. संतांनी देहवास्तू हे भगवंतांचे स्मरण, संकीर्तन, पोथी-पारायण इत्यादीतून सुसंस्कारित केले. देहवास्तू शुद्ध असेल तर वास्तूदेखील अनुकूल होऊ शकते. कोणतीही दिशा अपशकुनी नसते तसेच कोणतीही वेळ अपशकुनी नसते. भगवंताच्या नामस्मरणाने देहशुद्धी होतेच. मग ती व्यक्ती काळ व दिशा यांना अपशकुनी का मानील? भक्तिमार्गाद्वारे संतांनी परमार्थातील व व्यावहारिक जीवनातून शकुन-अपशकुनविषयक आशंका दूर करण्याचा विधायक प्रयत्न केला आहे. प.पू. शंकर महाराज खंदारकर यांनी ‘तत्त्व-भाष्य’ करताना, ‘भगवन-चिंतन’ करताना खंड पडणार नसेल, तर लाभ होण्यास काय कमी पडणार? असे विचारून पुष्टी दिली आहे. श्रीगुरुदेव रानडे यांनी ‘तत्त्व-सूत्र’ मांडताना हरिनामाचा छंद लागला, तर त्याला सर्व काळ सर्व दिशा कल्याणकारकच होत, असे सांगून पुष्टी दिली आहे.




























































