
>> अरुणा सरनाईक
मनातील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी खरंतर कोणत्या तरी विशिष्ट दिवसाची आवश्यकता असते का? प्रेम हे सातत्याने आपल्या मनातून उचंबळतच असतं. कधी ते व्यक्त होतं तर कधी अव्यक्त राहतं. असं अव्यक्त राहिलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जात असावा. आपल्याकडेही कुसुमाग्रजासारख्या प्रतिभावंतांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आळवले आहे.
पुन्हा एकदा ऋतुबदलांचे प्रहर आणि मनाची संभ्रमित अवस्था. माघाचे दिवस म्हणजेच फेब्रुवारी महिना! एरवी माघाचा महिना म्हटलं की आठवते ती माघी पौर्णिमा, महाशिवरात्री, श्री गजानन महाराज प्रगटदिन. एवढय़ातच दुर्गाबाई भागवतांचं ‘पूर्वा’ वाचण्यात आलं आणि भानं आलं ते 14 फेब्रुवारीचं. पण गेल्या काही वर्षांपासून तरुणाईत या दिवसाला एक वेगळं आणि अनन्यसाधारण लाभलेलं आहे. ‘14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून प्रसिद्धीस आला.
एका पाश्चात्य संताच्या इच्छेनुसार त्याचा जन्मदिवस हा प्रेमदिवस म्हणून जगभरात साजरा करावा, किती रम्य कल्पना! म्हणतात ‘इफ यू लव्ह समबडी, लेट देम नो!’ मग काय? त्या संताला कदाचित हे माहीत असावं. म्हणूनच त्यांनी आपला जन्मदिवस हा प्रेमदिवस म्हणून साजरा करावा अशी इच्छा व्यक्त केली. कारण लोक वर्षानुवर्षे प्रेम करतात, पण व्यक्त करत नाहीत. त्यात काय सांगायचं? प्रेम काय शब्दातूनच व्यक्त करावं लागतं? ते तर असतंच असतं. समजावून घ्यावं बस्स! असा सर्वसाधारण नियम पूर्वी होता. आज परिस्थिती बदलली अणि प्रेमाला व्यक्त होण्याची गरज भासू लागली. एका संताच्या दयेनं ठरावीक दिवस म्हणजेच 14 फेब्रुवारी मुक्रर झाला आणि सर्वानुमते गेल्या काही वर्षांपासून हा दिवस साजरा होऊ लागला.
दुर्गाबाईंच्या ‘पूर्वा’ पुस्तकाचा संदर्भ मनातून जात नाही. पूर्वातील एक एक कथा, एका एका प्रेममयी वेदनेचं उत्तम उदाहरण आहे. वात्सल्य, प्रेम, प्रणय या भावनात्रयीत एक अस्पष्ट तरल रेषा आहे. इतकी तरल की या तरल रेषेच्या प्रवासातील टप्प्याटप्प्यावर या कथा आपल्याला नेतात. दुर्गाबाईंचं निसर्गावरील प्रेम, त्यावर मानवी भावभावनांचं रोपण आपल्याला अगदी निसर्गाच्या समीप नेतं. मग पुन्हा तुकोबाराय आठवतात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणत!
आपल्याकडील सारीच थोर मंडळी विश्वावर प्रेम करणारी आहे. तीच शिकवण त्यांनी आपल्या वागण्याबोलण्यातून, साहित्यातून जनमानसात पोचवली आहे. मी-तू पणाचं गळलं बंधन! ‘अवघे विश्वची माझे घर’ असं असताना या प्रेमाच्या अभिव्यक्तिसाठी खरंच का व्हॅलेटांइन डेचं प्रयोजन लागतं? उत्तर अपेक्षित नाही! कारण प्रश्नाला प्रतिप्रश्न उठणारच.
आपण आज विराट प्रेमावर आपण बोलू. जरा वेगळं काहीसं हळवं होऊ. कारण आज मनात दुर्गाबाईचा विचार पिंगा घालतोय. त्यांच्यासोबत पुसुमाग्रज पण येऊ लागलेत. त्यांच्या कवितेतून अंतरिक्षातील प्रेमाची प्रचीती येते. त्यांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेत सूर्य आणि धरेच्या अद्भुत प्रेमकथेचा मिलाफ आहे. अतिशय उत्कट आणि पराकोटीचा समजूतदारपणा याचं हृदयगम्य चित्रण आहे. भास्कराचं प्रेम पृथ्वीवर आहे की नाही याविषयी संदिग्धता आहे. ती धूसर आहे, पण पृथ्वीचं मात्र त्याच्यावर अतोनात आणि मनस्वी प्रेम आहे.
ती त्याच्या कक्षेत युगानुयुगे फिरतेय, याचना करतेय, विनवणी करतेय, आपल्यासाठी किती ग्रह तारे उत्सुक आहे ते भास्कराला सांगतेय. पण ती लाचार नाही, ती चिरविरहिणी आहे. ती त्याला म्हणते, ‘अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन् मला ज्ञात मी एक धुलीकण, परी अलंकारिण्या पाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण.’ जे आपल्याजवळ आहे ते सच्चे आहे, पवित्र आहे, मनापासूनचे आहे, तेच मी तुला देईन ते तू मनापासून स्वीकार. हृदयाच्या आतील गाभ्यापासून ही माझी इच्छा आहे, आर्जव आहे. मनाची असोशी आहे, तहान आहे, पण लाचारी नाही. तुझी दया नको, भीक नको तर प्रेम हवंय. प्रीती हवीय. नाही मिळाली तर मी तशीच राहीन. तुझी दूरता परवडेल, पण दुबळ्यांचा शृंगार नको! ती त्याला रोज पाहते. दुरूनच का होईना निरखत असते.
कारण ती त्याच्याच कक्षेत फिरते ना? किती उच्च कोटीची ही प्रीत, प्रेम! कोणत्या व्हॅलेटांइन डेला सूर्य तिची ही प्रेमभावना ओळखून तिला हॅपी व्हॅलेंटाइन डे म्हणेल आणि प्रपोज करेल? नाही म्हणणार! कदाचित म्हणेल. सारंच काही संदिग्ध! अशी ही माणसं आपल्याकडे होती, आहेत आणि पुढेही राहणारच. काही व्यक्त प्रेमाची तर काही असफल अव्यक्त प्रेमाची.
आज मन भरकटलेलं आहे. व्हॅलेंटाइनची स्वतःची कथा यापेक्षा वेगळी नव्हती. आपल्यासारखी कोणाची पुचंबणा होऊ नये म्हणूनही कदाचित त्यांनी आपला जन्मदिवस परस्पर प्रेमभावना प्रेमिकांनी व्यक्त करावी म्हणून त्या दृष्टीनं साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली असावी असं वाटतं.
काही भावना या कालातीत आहे. काळ गूढ आहे. अदृश्य आहे, पण पारदर्शी आहे. त्यात लपलेल्या भावभावना निश्चितच दिसतात. पुणा एका ठरावीक दिवशीच त्या जाणवतात असं नाही तर कोणत्याही क्षणी त्या आपल्या समोर उभ्या ठाकतात. तरीपण काळाच्या वाहत्या धारेत काही नवीन बदल होऊ लागले आहेत. ते स्वीकारले तर आनंद देतात. तोच आनंद आपणही घ्यावा आणि इतरांना द्यावा. म्हणून वाटतं पुन्हा एकदा तरुण व्हावं आणि मनापासून आवडलेल्या व्यक्तीला, व्हॅलेंटाइन डेला आय लव यू म्हणावं. तेवढाचं आणि तोच आनंदाचा क्षण पुन्हा अनुभवावा. आपणही चकित व्हावं आणि त्यालाही चकित करावं.




























































