
>> अभिजित पानसे
गेल्या काही वर्षांत वेबसीरिजद्वारे चांगल्या कलाकृतींचा आस्वाद आपण घेत आहोत. अशीच एक जमलेली उत्तम सीरिज म्हणजे ‘यह मेरी फॅमिली’. अप्रतिम अभिनयाने, संवादाने आणि अनुभवाने नटलेली नव्वदीच्या दशकाशी भावनिक नातं जोडणारी ही वेबसीरिज प्रत्येकाने बघावी अशी आहे.
नव्वदीचं दशक हे आजच्या सगळ्याच पिढय़ांसाठी खास आहे त्यातही आज जे तिशीत आहेत त्यांच्यासाठी नव्वदच्या दशकासोबत कायम भावनिक संबंध असतो. आज आजूबाजूला जे सामाजिक, मानसिक, तांत्रिक, माध्यमांमध्ये बदल झाले आहेत त्याचे बीज नव्वदीच्या दशकात होते. तो काळ संक्रमणाचा होता. त्यावेळचा सिनेमा, संगीत, क्रिकेट, काहीसं वेगळं होतं. नव्वदीचं दशक म्हणून सगळ्यांसाठी हृदयाच्या जवळ आहे. याच नव्वदीच्या दशकाच्या पार्श्वभूमीवर ‘यह मेरी फॅमिली’ वेबसीरिज आहे. वेबसीरिज म्हटलं की, बहुतेक विषय, पटकथा या चित्रपटांच्या विषयापासून वेगळ्या असतात, कारण सेन्सॉर बोर्डची टांगती कात्री डोक्यावर नसते. ‘यह मेरी फॅमिली’ ही मात्र इतर वेबसीरिजपेक्षा वेगळी आणि पूर्णपणे कौटुंबिक आहे. मनाला उत्तम मेजवानी ही वेबसीरिज आहे. या वेबसीरिजच्या प्रेमात पडतो ही बघताना. या सीरिजला निश्चित कथा अशी नाही तर 1998 मधील उन्हाळ्यातील एका आठवीतील मुलाने घालवलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर ही सीरिज आहे.
‘यर मेरी फॅमिली’मधील केंद्रबिंदू, मालिकेची जान आहे तो हर्षू. सीरिज बघताना, बघून झाल्यावर या मुलाच्या प्रेमात पडतोच पडतो. हा हर्षू म्हणजे विशेष बन्सल त्याच्या प्रेमात पाडल्याशिवाय सोडत नाही. 1998 च्या उन्हाळ्यात 26 एप्रिलला सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकवून प्रसिद्ध ‘शारजा कप’ हिंदुस्थानला जिंकून दिला. त्याच्या दुसऱया दिवसापासून ही सीरिज सुरू होते. पहिल्या भागापासून ही सीरिज मनाला गोड आनंद देते. ‘ये मेरी फॅमिली’ ही हर्षूची कथा आहे. तोच या सीरिजचा सूत्रधार आहे. हर्षू आपल्याला इतर पात्रांबद्दल सांगतो. त्याचा राग, प्रेम, आवड, खोडकरपणा आपल्याशी सगळं शेअर करतो. त्याच्या आईची भूमिका मोना सिंगने केलीय तर वडिलांची भूमिका आकर्ष खुराणा या लेखकाने केलीय. टीव्ही एफची ही सीरिज असल्याने सीरिज चांगलीच आहे. टीव्ही एफची एक खासियत असते ती म्हणजे त्यांचं कास्टिंग. प्रत्येक पात्रासाठी अगदी पर्फेक्ट अभिनेत्याची निवड. यात हर्षूच्या भावाची भूमिका अहान निरबन या मुलाने केलीय. बारावी झालेला, घरातील मोठा समजूतदार मुलगा, मोठा भाऊ डब्बू त्याने सुरेख साकारला आहे. हर्षूचा मित्र शँकीची भूमिकाही मस्त आहे. प्रसाद रेड्डी या छोटय़ा मुलाने ती भूमिका केली आहे. हर्षूच्या छोटय़ा बहिणीची भूमिका करणारी सहा वर्षांची ‘ध्वनी’ म्हणजे रुही खान ही अत्यंत गोड मुलगी आहे. तिने जो अभिनय केलाय त्याला तोड नाही. छोटय़ा रुही खानकडून इतका अप्रतिम अभिनय करवून घेणाऱया दिग्दर्शकालाही हॅटस् ऑफ.
हर्षूच्या मैत्रिणीचा छोटा रोल रेवती पिल्लई या सुंदर मुलीने केलाय. या दोघांची केमिस्ट्री बघताना प्रत्येकाला आपले शाळेचे दिवस आठवतील. हर्षू आणि शँकी यांच्यातील संवाद, दृश्ये बघताना प्रत्येकाला शाळेतील मित्र आठवतील.
आणि यानंतर येतो सीरिजचा हीरो, केंद्रबिंदू हर्षू. आजवर अनेक बालकलाकार सिनेजगतात आलेत त्यात एकतर खूप छोटी मुलं होती किंवा त्यांना प्रमुख भूमिका नसायच्या किंवा फारच मर्यादित असायच्या. ‘ये मेरी फॅमिली’ ही सीरिज संपूर्णपणे हर्षूची या आठव्या वर्गातील मुलाची आहे. पौगंडावस्थेतील मुलाची भूमिका केलेले बालकलाकार जास्त आठवतदेखील नाहीत. विशेष बन्सलने त्याच्या भूमिकेला संपूर्ण सीरिजला उंचीवर नेऊन ठेवलंय ते बघून पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. विशेष बन्सल त्याने साकारलेला हर्षू बघताना वाटतं हा मुलगा आजवर कुठे होता!
तिसऱया एपिसोडचं नाव ‘टवेल्थ मॅन’ आहे, हा एपिसोड प्रत्येक मुलाने बघावा. ‘तुमको देखा तो ये खयाल आया..’ या गाण्याचा वापर या भागच्या शेवटी ज्या खुबीने केलाय ते फार मस्त जमलंय. एका एपिसोडमध्ये दोन भावांची केमिस्ट्री अप्रतिमरीत्या सादर केली आहे. ‘कच्ची घोडी’ नावाच्या सहाव्या भागात छोटय़ा ध्वनीला केंद्रबिंदू केलंय, यातही तिने जो अभिनय केलाय त्याला हॅटस् ऑफ!
‘छुपनछुपाई’ हा सहावा एपिसोड अप्रतिम आहे. आणि सगळ्यात शेवटचा एपिसोड ‘चिडीया उड’ हा सीरिजचा शेवटचा भाग. हा शेवटचा भाग संपूर्ण सीरिजला सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवतो. ही वेबसीरिज बघताना प्रत्येक एपिसोडच्या शेवटी नकळत चेहऱयावर स्मित झळकतं, पण शेवटच्या एपिसोड बघताना डोळे कधी पाझरू लागतात कळतदेखील नाही. पूर्णपणे भावनिक होतो. आणि शेवटी थोडय़ा वेळाने चेहऱयावर हास्य उमटतं. आणि उत्स्फूर्तपणे तोंडातून शब्द निघतात, ‘बेस्ट, टू गूड’! अप्रतिम वेबसीरिज! ही सीरिज बघताना वाटतं या विशेष बन्सलला मिठी मारावी! प्रत्येक मुलाला स्वतः कुठेतरी हर्षू दिसेल किंवा ओळखीचं कोणीतरी या हर्षूमध्ये दिसेलच. विशेष बन्सलचं संवादांवरील संपूर्ण नियंत्रण, त्याचा जबराट अभिनय, त्याचा पर्फेक्ट गोड आवाज हे वर्णन करताना शब्द तोकडे पडतात.
या वेबसीरिजला इतकं अप्रतिम बनवायचं श्रेय समीर सक्सेना या दिग्दर्शकास जातं. ‘यह मेरी फॅमिली’ वेबसीरिज म्युच्युअल फन्डने प्रायोजित केली असल्याने यात त्यासंबंधी काही संवाद चांगल्या पद्धतीने टाकलेयत. दिग्दर्शकाने खुबीने नव्वदीचा काळाचा वापर केला आहे. घरात कॉडलेस फोन, जुने डेस्कटॉप कॉम्प्युटर, संवाद नव्वदीच्या दशकाचा छान फील देतात.
ही सीरिज ‘मस्ट वॉच’ आहे. शेवटचा भाग बघितल्यावर पुन्हा ही सीरिज बघवीशी वाटतेच वाटते. अप्रतिम अभिनयाने, संवादाने आणि अनुभवाने नटलेली ही सीरिज प्रत्येकाने बघावीच बघावी अशी आहे.





























































