दूध प्या आज आणि दररोज

1341
milk-1

आपला देश हा कृषिप्रधान असून अमेरिकेनंतर आपला देश दूध उत्पादनात अग्रेसर आहे. देशातील बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन व्यवसाय करतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनविणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001पासून 1 जून हा दिवस ‘जागतिक दूध दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसेच हिंदुस्थानात दुग्ध क्रांतीचे जनक डॉ. व्हर्गिस कुरियन यांच्या 26 नोव्हेंबर या जन्मदिवसाप्रीत्यर्थ जागतिक दूध दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी या दिवशी वेगवेगळी थीम ठेवण्यात येते. यंदा ‘दूध प्या-आज आणि दररोज’ अशी थीम ठेवण्यात आली आहे.

दुग्ध व्यवसायात आधुनिकतेची गरज

 • जागतिक दर्जाचे दुग्ध पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असणारे चांगल्या प्रतीचे दूध आपल्याकडे मिळत नाही. दुग्ध व्यवसाय नवीन तंत्रज्ञानाने करायचा असेल तर भांडवली खर्च वाढतो.
 • दुग्ध व्यवसायात जास्तीतजास्त आधुनिक यंत्रांचा वापर केला तर उत्पादन खर्च कमी होतो. या भांडवली खर्चाला 50 टक्क्यांपर्यंत अर्थसाह्य मिळाले तर मोठय़ा प्रमाणात परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.
 • दुधामधील जिवाणूंचे प्रमाण कमीत कमी ठेवण्यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी दूध काढल्यानंतर शक्यतो त्वरित 4 अंश सेल्सिअस तापमानाला साठवावे.
 • वास्तविक दुग्ध व्यवसाय मोठे उद्योगक्षेत्र आहे म्हणून अनेक आयटी सॉफ्टवेअर कंपन्या याकडे आकर्षित झालेल्या आहेत. तरुणवर्गातील एक मोठा गट असा आहे की, जो आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीव्यवसायात उतरण्याचे धाडस करत आहे. बऱ्याचशा सॉफ्टवेअर कंपन्यानी सध्या लघु आणि मध्यम शेतकऱयांवर लक्ष केंद्रित केलेले आहेत.
 • ज्यांनी आतापर्यंत कोणतेही तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतलेले नाही अशांसाठी दूध उत्पादन, त्यातील टप्पे आणि दूध मार्केटिंग यासाठी संगणकप्रणाली हा एक उत्तम उपाय आहे.

दुधाची गुणवत्ता ओळखण्यासाठी 

 • दूध काढताना स्वच्छतेची काळजी घेऊन काढलेले दूध जर कमी तापमानावर साठवले नाही तर दुधाची प्रत खालावण्यास सुरवात होते.
 • वातावरणातील तापमानामुळे जिवाणूंची संख्या झपाटय़ाने वाढते. जिवाणू जितके जास्त असतील तितका दूध टिकून राहण्याचा काळ कमी होतो.
 • कच्चे दूध कोणत्या प्रतीचे आहे, त्यावरून त्यापासून बनणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रत ठरत असते.
 • दूध उत्पादन हे मुख्यतः ग्रामीण भागामध्ये जास्त उत्पादित होत असल्यामुळे हे दूध तालुकासंघ व जिल्हासंघ यांच्याकडे आणले जाते.
 • वाहतुकीमुळे दुधाची प्रत खालावण्याची शक्यता जास्त असल्यामुळे दुधाच्या गुणवत्तेवर जास्त लक्ष देणे गरजेचे असते.
 • दूध संकलन केंद्राच्या प्लॅटफार्मवर दुधाच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे त्यांना ‘प्लॅटफॉर्म चाचणी’ असे सुद्धा म्हणतात.  यावेळी दुधाची चव, वास, कचरा, दुधाचे तापमान, लॅक्टोमीटर रीडिंग, आम्लता अशा विविध चाचण्या होतात. चाचण्यांची पूर्तता झाल्यानंतरच दुधाची स्कीकृती केली जाते अन्यथा दूध परत पाठविले जाते.
 • दुधाची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी नियंत्रण यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करणे. चारा व खाद्याचे योग्य नियोजन करणे.
 • दूध व दुधाच्या पदार्थांची निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संघटितपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
 • देशी गायीचे दूध व संकरित गायीचे दूध याबाबत जागरूकता निर्माण करणे.

 दूध उत्पादनातील संधी

 • ग्राहकांचा कल पॅकेज्ड् दुधाकडे जास्त आहे  अशावेळी त्यादृष्टीने प्रयत्न करणे.
 • आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा घाऊक-किरकोळ विक्रीमध्ये वाढलेला कल. कमी उत्पादन खर्चामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्याची क्षमता.
 • शेतकरी, उद्योजक आणि ग्राहक यांचा सकारात्मक दृष्टिकोन.
 • प्रकिया उद्योगामध्ये गुंतकणुकीसाठी सकारात्मक धोरणाची गरज.
 • दुधाला चांगला हमीभाव देऊन दुधाचे उत्पादन आणि क्षमता वाढविणे.
 • सेंद्रिय दूध उत्पादन करणे.
 • देशात अस्तित्वात असणाऱ्या दुग्ध प्रकल्पातून व देशाबाहेर असलेल्या याच उद्योगक्षेत्रातून उत्पादन, पुरवठा, दुग्धप्रक्रिया, वितरण अशा वेगवेगळ्या विभागांतून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्रगतीच्या संधी उपलब्ध होतात. सहकारी दुग्ध संस्था, ग्रामीण बँक, दुग्धप्रक्रिया व दुग्ध उत्पादन प्रकल्प, कृषी विद्यापीठातून प्रशिक्षकाच्या संधीही मिळू शकतात.

दूध परीक्षणाचे घरगुती उपाय

 • म्हशीचे दूध पांढरे तर गायीचे दूध पिवळसर रंगाचे दिसून येते.
 • दुधाची चव आंबूस वाटत असल्यास ते शिळे असून नासण्याच्या मार्गावर आहे असे समजावे.
 • जर दुधास निळा रंग आल्यास त्यात स्टार्चची भेसळ असल्याचे समजावे.
 • दुधात कॉस्टिक सोडय़ाची भेसळ असल्यास नैसर्गिक दूध आटविताना प्राप्त होणाऱ्या किंचित रंगापेक्षा गडद तांबूस रंग दिसून येतो.
 • दुधात साखर / ग्लुकोज इत्यादी भेसळीमुळे दूध नैसर्गिक गोडीपेक्षा चवीला जास्त गोड लागते.
आपली प्रतिक्रिया द्या