ठसा – प्रा. भालचंद्र शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश उदावंत

भाषावार  प्रांतरचनेप्रमाणे राज्यांची जशी निर्मिती झाली, तशी त्या त्या राज्यांतील मातृभाषा व्यापक करण्याकडे राज्यकर्त्यांनी भर दिला. महाराष्ट्रालगत असणाऱ्या कर्नाटक राज्यात तर कानडी भाषेची सक्ती व्यापक स्वरूपात झाली. त्यामुळे या दोन राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या मराठी भाषक नागरिकांची अद्यापही भाषिक दृष्टीने गळचेपी होत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेचा झेंडा अभिमानाने व निरलसपणे कर्नाटकात सांभाळत मराठीला नव्या रूपाने पेश करणारे ज्येष्ठ साहित्यिक तसेच कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. भालचंद्र शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील ते महत्त्वाचा दुवा होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठीची चळवळ व्यापक रूप घेत असताना त्यांचे असे जाणे धक्कादायकच आहे.

साहित्यासोबत शिक्षण क्षेत्रात प्रा. शिंदे यांचे कार्य उल्लेखनीय राहिले. मराठवाडय़ातील धाराशिव जिह्यात असणाऱ्या कदेर (ता. उमरगा) या खेडेगावातील ते मूळ रहिवासी. त्यांचे कुटुंबीय कायमच शेती व्यवसायात रमले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात शिक्षणाचा अभाव होता. मात्र प्रा. शिंदे यांनी शिक्षणात लक्ष देऊन साहित्याची रुची ठेवली. उमरगा, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी उच्च शिक्षण घेत त्यांनी पदव्युत्तर मराठी विषयात प्रावीण्य मिळविले. शिक्षणानंतर गुलबर्गा (आताचे कलबुर्गी) येथील शासकीय महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले अन् कायमच कर्नाटक राज्यात कानडी भाषेच्या जोखडाखाली दबलेल्या मराठी माणसाला मराठी भाषेसोबत जोडून घेण्यास्तव मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी ते सक्रिय राहिले.

शासकीय महाविद्यालयात ते नंतर प्राचार्य पदावर नियुक्त झाले. शिक्षण क्षेत्रातील व्यासंग ध्यानी घेऊन कानडी सरकारने त्यांची शिक्षण विभागात उपसंचालक पदावर बढती दिली. राजर्षी शाहू महाराज, वारकरी संप्रदाय व थोर महात्म्यांच्या पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या प्रा. शिंदे यांनी साहित्य चळवळीतील विविध साहित्य संस्थांशी स्नेह वाढवला. पुढे गुलबर्गा मराठी साहित्य मंडळ, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे यशस्वी धुरा सांभाळली. अ. भा. मराठी साहित्य मंडळाचे ते दीर्घकाळ उपाध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा समिती, साहित्य अकादमी, गुलबर्गा विद्यापीठ सिंडिकेट, बृहन्महाराष्ट्र मराठी भाषा समितीवरही शासन नियुक्त सदस्यपद त्यांनी सांभाळले. या सोबतच कर्नाटकात साहित्य संमेलन, लेखन कार्यशाळा साहित्यिक भेट यांसह इतर उपक्रम प्रा. शिंदे यांनी राबविले.

साहित्य क्षेत्रात झपाटय़ाने कार्य करणाऱ्या प्रा. शिंदे यांनी स्वचिंतनातून दर्जेदार साहित्य लेखन केले. ‘साहित्य दर्पण’, ‘मराठी- कन्नड अनुबंध’, ‘विचार वलये’, ‘माझी माणसं’, ‘कदेरची माणसं’, ‘रा. ना. चव्हाणः एक सत्यशोधक’, ‘काव्यतीर्थ हरिश्चंद्र रेणापूरकरः व्यक्ती आणि विचार’, ‘न हरलेला योद्धा विचार मंथन’, अशी एकापेक्षा एक सरस साहित्यांची निर्मिती करून वैचारिक लेखनावर भर दिला. मराठी साहित्य परिषदेचे मुखपत्र ‘अनुबंध’ व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या ‘माझी मराठी’चे त्यांनी संपादन केले.

मूळचे मराठवाडी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या प्रा. भालचंद्र शिंदे यांचे बालपण धाराशिव जिह्यात बहरले. पुढे कर्नाटक ही त्यांची कर्मभूमी ठरली. मराठी भाषेच्या समृद्धी व प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय राहिले आहे. कानडी भाषेच्या गर्तेत असणाऱ्या मराठी भाषेच्या प्रसारासाठी धडपड करणारे प्रा. शिंदे यांचा एक अध्याय थांबला असला तरी मराठी साहित्यातील ते एक मानाचे साहित्य पान मराठी माणसाच्या मनात कायम स्मरणात राहील…!