
>> विनायक
कुकरची ‘शिट्टी’ कानी पडत नाही अशी स्वयंपाकघरं आता देशात थोडीच असतील. स्टोव्ह किंवा गॅसवर अन्न निश्चित शिजवता येणारा प्रेशर कुकर हे 1970 च्या दशकापासून गृहिणींसाठी वरदान ठरलं. वाफेच्या शक्तीचा वैज्ञानिक ‘साक्षात्कार’ झाल्यावर वाफेच्या अनेक यंत्रांचे आविष्कार मुख्यत्वे युरोपात अवतरायला लागले. वाफेच्या इंजिनावर तर रेल्वे ट्रेनही चालली. या बाष्पशक्तीवर लागलेल्या अनेक शोधांनी जीवन सोपं केलं. वेळेची बचत होऊन कामं जलद होऊ लागली. यापैकी गरम वाफेच्या दाबावर अन्न शिजवण्याची कल्पना माणसाला हजारो वर्षांपासून होती.
पातेलं किंवा टोपावर झाकण ठेवून वाफेच्या मर्यादित दाबावर अन्न शिजवलं जायचंच, पण वाफ घट्ट झाकणाने कोंडून दाब प्रचंड वाढवला आणि 100 तो 120 अंश सेल्सियस इतका करून अन्न लवकर कसं शिजवता येईल याचा विचार डेनिस पेन यांनी सतराव्या शतकातच केला. त्यांनी बनवलेल्या जगातल्या पहिल्या ‘प्रेशर कुकर’चं प्रात्यक्षिक 1661 मध्ये ‘रॉयल सोसायटी ऑफ लंडन’ येथे करून दाखवलं. मात्र त्या वेळी या संशोधनाला फारसा लोकाश्रय मिळाला नसावा. ही ‘जलद अन्न शिजवण्या’ची क्लृप्ती मात्र अनेक अभ्यासकांच्या चर्चेत राहिली. त्यातूनच पुढे दोनशे वर्षांनी जॉर्ज गटबर्ड यांनी लोखंडी पत्र्याचा ‘प्रेशर कुकर’ बनवला. 1890 मध्ये आर्चिबान कार्निक यांनी आपल्याकडच्या पाणी तापवायच्या तांब्याच्या बंबासारखा दिसणारा ‘प्रेशर कुकर’ तयार केला. तरीही त्याचा प्रसार घराघरापर्यंत पोहोचला नव्हता. त्यासाठी विसावं शतक उजाडावं लागलं. एकोणिसाव्या शतकातला प्रेशर कुकरचा वापर कमी होता. 1918 च्या सुमारास मार्टिझन यांना स्पेनमध्ये अशा कुकरचं पेटंट (एकाधिकार) मिळालं आणि त्यांनी ‘एक्प्रेस कुकिंग पॉट’ या नावाने असा कुकर बाजारात आणला. त्याला ‘स्टीम डायजेस्टर’ असंही म्हटलं गेलं. अखेरीस ‘प्रेशर कुकर’ हे नाव जगात रूढ झालं.
1924 मध्ये एका कंपनीने या त्या काळातल्या अभिनव ‘कुकर’ची जाहिरात ‘360 पदार्थ शिजवणारं यंत्र’ अशी केली होती! कालांतराने म्हणजे 1940 नंतर ‘प्रेशर कुकर’चा वापर ‘वाढता वाढता वाढे’ करीत आज जगातल्या अब्जावधी आणि देशातल्या कोटय़वधी घरांत पोहोचल्याचा उल्लेख आधी आलाच आहे. आपल्या देशात 1956 मध्ये टीटीके आणि हॉकिन्स या कंपन्यांचे प्रेशर कुकर पहिल्यांदा बाजारात आल्याची माहिती मिळते. त्यानंतर अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरल्या. अॅल्युमिनियम, हिन्डॅलियम आणि स्टेनलेस स्टील या धातूंपासून बनवलेले आतल्या व बाहेरच्या झाकणांचे प्रेशर कुकर बाजारात दिसू लागले. त्यात उत्तरोत्तर सुधारणाही होत गेल्या.
यामागचे वैज्ञानिक तत्त्व सोपे आहे. घट्ट झाकणाच्या भांडय़ात पुरेसं पाणी घालून (कुकरमध्ये आणि पदार्थात) झाकण बंद करून आचेवर (फ्लेम) ठेवताच आतली हवा गरम होऊन आधी बाहेर पडते आणि नंतर कुकरमधल्या पाण्याची वाफ कोंडून 100 अंश सेल्सियसपर्यंत तापमान निर्माण झाल्याने अन्न शिजते. वाफ प्रमाणाबाहेर वाढून तापमान वाढले की शिट्टी किंवा व्हॉल्वमधून वाफ वेगात बाहेर पडते व आवाज होऊन अन्न शिजल्याचे समजते. अन्न शिजण्याचा कालावधी लक्षात घेऊनच कुकरची रचना केलेली असते. कठीण पदार्थांसाठी एक-दोन जास्त शिट्टय़ा कराव्या लागतात हे गृहिणी तारतम्याने ठरवतात. कारण देशोदेशींची अन्नपदार्थांची प्रक्रिया वेगवेगळी असते. जास्त काळ प्रचंड दाबाखालील तापमानात अन्न शिजवल्यास व्हिटॅमिन-सी किंवा ग्लुकोसिनोरेटस् अथवा बिटाकार्बोजेट अशा पोषक तत्त्वांचे पोषणमूल्य घटू शकते. मात्र एरवी पदार्थ चटकन शिजतात हा फायदा सर्वसामान्यांना चांगला वाटतो.
या त्रुटी दूर करून कमी इंधन वापरून शिटी न होणारा, परंतु पदार्थांचे स्वाद टिकवणारा कुकर आयसीटीच्या काही तरुण संशोधकांनी पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या तयार केला. त्याविषयी संपूर्ण लेखच मुलाखतींसह केव्हा तरी लिहावा लागेल. हे सगळं लिहिताना विचार आला की, ‘कुकर’ला चपखल मराठी शब्द कोणता? पूर्वी मोदकपात्र असायचं. मग हे कोणतं ‘पात्र’ म्हणायचं? सुचलं तर पहा किंवा असा शब्द प्रचलित असेल तर मला तरी ठाऊक नाही


























































