यंगिस्तान – नस्तनपूरचा भुईकोट

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

नस्तनपूर या तीर्थक्षेत्राला शनी मंदिरामुळे हजारो लोक भेट देतात, पण येथून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या या किल्ल्याकडे मात्र लोक पाठ फिरवतात. दुर्गप्रेमींनी मात्र इतिहासाच्या या ज्ञातअज्ञात पाऊलखुणा जपण्यासाठी या किल्ल्याला अवश्य भेट द्यावी

भुईकोट किल्ला म्हटले की, आपल्या डोळय़ांसमोर उभे राहतात चाकण, नळदुर्ग, परांडा, नगरसारखे महत्त्वपूर्ण किल्ले. या प्रमुख किल्ल्यांबद्दलच आजपर्यंत खूप लिहिले गेले, बोलले गेले. बाकी इतर छोटे-मोठे भुईकोट किल्ले विशेष ऐतिहासिक घडामोडी न झाल्याने दुर्लक्षित राहिले. पण एक भुईकोट किल्ला असा आहे की, त्याची कुठे ऐतिहासिक नोंद तर सोडा, पण स्थानिक गावकरीसुद्धा त्याच्यापासून अनभिज्ञ आहेत. काही लोक त्या किल्ल्याशी निगडित वेगवेगळय़ा दंतकथा सांगतात. असा काहीसा मनात गूढ निर्माण करणारा, दिवसेंदिवस ढासळत जात असलेला भुईकोट किल्ला म्हणजे नाशिक जिह्यातील नांदगावजवळील नस्तनपूरचा किल्ला.

नस्तनपूरला भेट देण्यासाठी आपणास पुणे-नगर-मनमाड -नांदगाव ते नस्तनपूर असा दूरवर प्रवास करावा लागतो. नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावर असलेले नस्तनपूर हे गाव शनी महाराजांच्या मंदिरामुळे सर्वदूर प्रसिद्ध आहे. मंदिराचे दर्शन घेऊन आपण गाडीरस्त्याने पुढे गेल्यावर डावीकडे लगेचच आपणास किल्ल्याचे दक्षिणेकडील बुरूज दृष्टीस पडतात. आपण येथे गाडीतून पायउतार होऊन भग्न तटबंदीतून गडप्रवेश करायचा. गडप्रवेश करतानाच डाव्या हाताला बुरुजावर जाणाऱ्या भग्न पायऱ्यांचे अवशेष व बुरुजातील कोठाराची वास्तू आपले लक्ष वेधून घेते. तटबंदीतून आत प्रवेश केल्यावर आपण नव्यानेच बांधण्यात आलेल्या गणपती मंदिरात पोहोचतो. मंदिरातील उजव्या सोडेंच्या गणपतीला नमस्कार करून आपण गडफेरी प्रारंभ करायची.

किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग खंदक उभारून संरक्षित केलेला आहे. डावीकडे खंदक, तर उजवीकडे तटबुरुज ठेवून आपण मुख्य दरवाजाकडे मार्गक्रमण करायचे. वाटेत उजव्या हाताला तटबंदीमध्येच हत्तीचे शिल्प व एक वीरगळ बसवलेली दिसते. हे अवशेष पाहून पुढे गेल्यावर आपण दोन भव्य बुरुजांच्या बेचक्यात उभ्या असलेल्या उत्तराभिमुख महादरवाजापाशी पोहोचतो. या दोन्ही बुरुजांची सध्या खूपच दुरवस्था झालेली आहे. अकरा बुरुजांनी संरक्षित असलेल्या या किल्ल्याची तटबंदी मात्र साधारण भिंतीप्रमाणेच आहे. किल्ल्याचा विस्तार एकदम आटोपशीर आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यात पाण्याचा साठा करण्यासाठी खोदण्यात आलेल्या तीन विहिरी. किल्ल्यामध्ये एकाच रेषेत आगगाडीप्रमाणे लांबलचक गेलेली 21 कमानींची भिंत आहे. ही एक वैशिष्टय़पूर्ण वास्तू आपणास या गडभेटीत पाहावयास मिळते.

गूढकथा अन् दंतकथा

या किल्ल्याची निर्मिती इतिहास म्हणजे एक गूढकथाच. स्थानिक लोक याला खोजा नामक राजाचा किल्ला म्हणून संबोधतात. खोजा नाईक नावाच्या भिल्ल राजाने याची अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्मिती केली. पुढे इंग्रजांशी त्याचा संघर्ष झाला. त्यामुळे किल्ल्याचे बांधकाम अपूर्ण राहिले. या खोजा नामक राजाचे पुढे काय झाले याची इतिहासात कुठेही नोंद नाही. त्याबद्दल खूप साऱ्या दंतकथा या परिसरात लोक सांगतात.