पुढल्या मंत्रिमंडळासाठी माझ्या नावाचा विचार करू नका, अरुण जेटलींचे मोदींना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arun-jaitley

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दुर्धर आजाराने ग्रस्त अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्याला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पुढील मंत्रिमंडळासाठी आपल्या नावाचा विचार करू नये, अशी विनंती करणारे पत्र लिहले आहे. यामुळे अरुण जेटली आता सक्रीय राजकारणात दिसणार नाही असे स्पष्ट झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला स्वत:साठी, उपचार आणि प्रकृतीसाठी वेळ द्यायचा आहे. जबाबदारी नसल्यास मला प्रकृतीकडे लक्ष देता येईल, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मोदी सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून महत्वाची भूमिका बजावणारे अरुण जेटली गेल्या वर्षी पासून आजारी आहेत. गेल्या वर्षी जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्या काळात अर्थ मंत्रालयाचा हंगामी कार्यभार पीयूष गोयल यांनी सांभाळला होता. काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर जेटली यांनी पुन्हा अर्थ मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र ते सध्या नव्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यावरील उपचारांसाठी त्यांनी अमेरिका गाठली होती. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रातील मोदी सरकारचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अखेरचा अर्थसंकल्प देखील त्यांच्या अनुपस्थितीत पीयुष गोयल यांनी सादर केला होता.

गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान असून खूप शिक्षण्याची संधी मिळाली. या आधी देखील एनडीएचे सरकार असताना, तसेच विरोधी पक्षात असताना पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी दिली होती हे माझ्यासाठी आशीर्वादासारखेच आहे, असे जेटली यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. आपल्या नेतृत्वात पक्ष आणि सरकार चांगली कामगिरी करत असल्याचे देखील त्यांनी आपल्या पत्रातून सांगितले आहे.