ऑपरेशन लोटसला केजरीवाल यांचा दणका; विधानसभेत मांडला विश्वासदर्शक ठराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक राज्यांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करणाऱया भाजपाला आज शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार दणका दिला. भाजप दिल्लीत पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस मोहीम चालवत असल्याचा आरोप करत त्यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला आणि आपचा एकही आमदार फुटलेला नसल्याचे दाखवून दिले. दरम्यान, नायब राज्यपालांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालणाऱया भाजपच्या 7 आमदारांना उर्वरीत अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले.

ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे त्या राज्यात भाजपकडून राजकारण करत विरोधकांना निलंबित करण्याचा सपाटा लावला आहे. संसदेतही हेच हत्यार वापरण्यात आले.

आज अरविंद केजरीवाल यांनीही भाजपाला तसेच उत्तर देत 7 आमदारांना निलंबित केले. विश्वासदर्शक ठराव मांडल्यानंतर केजरीवाल म्हणाले, दोन दिवसांपूर्वी माझे दोन आमदार माझ्याकडे आले होते. तुमच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जाणार असून आम्ही तुमच्या 21 आमदारांशी संपर्क साधला. ते पक्ष सोडायला तयार आहेत. त्यासाठी त्यांना 25 कोटी देणार आहोत. आम्ही आमच्या पक्षातून तुम्हाला उमेदवारी देऊ, असे आमिषही भाजपवाल्यांनी दिल्याचे माझ्या आमदारांनी सांगितल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. याबाबत सर्व आमदारांना विचारले असता सात जणांशी भाजपवाल्यांनी संपर्क केल्याचे समोर आले असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल आज कोर्टात
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ईडीच्या समन्सना दाद देत नसल्याबद्दल ईडीने दाखल केलेल्या तक्रारीच्या संदर्भात शनिवारी येथील न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.

नायब राज्यपाल वि.के. सक्सेना यांनी गुरुवारी भाषणादरम्यान आपप्रणित सरकारने उत्तम काम केल्याचे सांगितले. त्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपा आमदारांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी करणाऱया आमदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आज शुक्रवारी आपचे आमदार दिलीप पांडे यांनी मांडला. या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांनी मंजुरी दिली.