
क्रूझ ड्रग्जपार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान याचा जामीन नाकारण्यात आला आहे. यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे. आर्यन खान याच्यासोबतच मुनमुन धमेजा, अरबाझ मर्चंट यांचेही जामीन न्यायालयाने फेटाळले आहेत. सत्र न्यायालयाने दिलेल्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं मुनमुन धमेचा हिचे वकील काशिफ यांनी सांगितले आहे.
क्रूझ पार्टीप्रकरणी आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचाला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या तिघांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 14 ऑक्टोबरला पूर्ण झाली होती. गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने जामीनाच्या याचिकेवरील आदेश 20 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच आजपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. लावला. आर्यन, अरबाज आणि मुनमुनच्या जामीन अर्जाला विरोध करत अनिल सिंग यांनी युक्तिवाद सादर केला होता. आर्यनने पहिल्यांदाच ड्रग्ज घेतले असे नसून तो गेल्या काही वर्षांपासून नियमित ड्रग्ज घेत आहे असे एनसीबीने न्यायालयात सांगितले होते. तर या कटात परदेशी नागरिकदेखील सहभागी असल्याने परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिण्यात आले असून परदेशी पेडलरचा या केसमध्ये सहभाग असल्याने त्याचा तपास व्हावा असेही एनसीबीने म्हटले होते. आमचे अधिकारी जेव्हा रेड करायला जातात तेव्हा त्यांच्यावर हल्ले होतात, अनेकदा अधिकाऱयांना रुग्णालयात दाखल करावे लागते. जिवावर उदार होऊन अधिकारी काम करत आहेत, असे एनसीबीने न्यायालयात सांगितले होते.
अरबाज आणि आर्यनकडे कमी प्रमाणात ड्रग्ज सापडले आहेत. तर त्याचा मोबाईल जप्त केला त्याची नोंदच नाही. पंचनाम्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. आर्यन आणि अरबाजचा परदेशी पेडलरशी काही संबंध नाही. त्यामुळे त्या दोघांना जामीन मिळावा असा युक्तिवाद या दोघांच्या वकिलांनी केला होता. रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, अरमान कोहली या केसचे दाखले मुंबई सत्र न्यायालयात झालेल्या युक्तिवादावेळी आरोपींच्या वकिलांनी दिले होते. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीच्यावेळी आर्यनचे वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला होता की एनसीबी हे वारंवार ड्रग्ज आणि रोख रकमेबाबत बोलत आहे, पण आर्यनकडे काही ड्रग्ज सापडले नाही. एनसीबीने अरबाजकडून 6 ग्रॅम चरस जप्त केल्याचे देसाई यांनी न्यायालयात सांगितले होते.































































