विशेष लेख: आषाढस्य प्रथम दिवसे

132

>> रवींद्र वासुदेव गाडगीळ

आज आषाढाचा पहिला दिवस. ‘घन घन माला,नभी दाटल्या,कोसळती धारा’, केकारव करी, मोर नाचती, करुनि उंच पिसारा’. मराठीतले कालिदास ग.दी.मांचे काव्य. आषाढ हा एकटा महिना संपूर्ण वर्षाचे नशीब ठरवत असतो. पंचमहाभूतांपैकी वरूणाचा हा महिना. शेतकरी चातकासारखी ह्याची वाट बघत असतो. वाट बघून येतो की आल्यावर किंवा न येऊन वाट लावतो? कारण ह्याच महिन्यात होणार्‍या वृष्टीवर संपूर्ण अन्नधान्न्याचे भविष्य अवलंबून असते. जून महिन्यात येणारा पाऊस हुलकावणी देणारा व बेभरवशाचा असतो आणि आषाढानंतर येणारा पाऊस लहरी असतो. केवळ नऊ नक्षत्रांवर आधारित हे गणित आहे. २७-९=० हे गणित भल्या भल्या वेदशाळा (पंचांग) व वेधशाळा यांना आजपर्यंत सुटलेले नाही. विज्ञान व तंत्रज्ञानाने केवळ कृत्रीम पाऊस पाडण्याचे तंत्र साध्य केले आहे. पण हा पाऊस मात्र निसर्गाच्या व नियतीच्या लहरीवर आहे. म्हणून याचे स्वागत. हा आला की धरणिमाता प्रसन्न होऊन, दरवर्षी याच महिन्यात आषाढी शुद्ध एकादशीला लाखोंच्या संख्येने शेतकरी शेतीची कामे करून, याच्याच जिवावर पेरण्या करून, पूर्ण निष्ठा, अतूट विश्वास, निढळ श्रद्धा ठेऊन, टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत गात आपल्या पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाला भेटून “आमच्यावर तुझी कृपा असू दे रे” असे साकडे घालायला दरवर्षी पायी वारीला जात असतात. ह्याला म्हणतात सोशल मॅनेजमेंट. किती शांतपणे, सरळ,एकमेका पायी लागून, मुखी ‘जय हरी विठ्ठल’ म्हणत, दिंडी व पालखीबरोबर माऊलीचा जप करत आषाढी एकादशीला हजर. कुठेही मंत्री, नेता, पुढारी, पोलिस नाही की धाक दपटशा नाही, भांडण नाही, की वाद नाही. केवळ ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दांवर व संत नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे अखंडपणे, अगदी प्रतिकूल परिस्थितीतही वारी ही होतेच. वर्गणी नाही की खंडणी नाही. स्वखर्चाने वैयक्तिक व सामूहिक भरवशावर. भारतातीलच नव्हे तर अख्ख्या पृथ्वीतलावर असा अवर्णनिय व संस्मरणीय सोहळा होत नसेल. योजक अर्थात पांडुरंग व कष्टाळू शेतकरी.

आषाढातील हा पहिला दिवस ‘महाकवी कालिदास दिन’ म्हणूनही ओळखला जातो. कारण आषाढाच्या पहिल्या दिवशी आभाळात मुक्त विहार करणार्‍या मेघाला पाहून यक्षाला आपल्या प्रियेची तीव्र आठवण झाली. आणि त्याला जे विरह काव्य तेथे स्फुरले ते कालिदासांनी संस्कृतात व्यक्त केलेले अजरामर ‘मेघदूत’ काव्य. हे काव्य अतिआल्हादक असून ह्याचे पूर्व मेघ व उत्तर मेघ असे दोन भाग आहेत. त्यामध्ये उत्तर मेघ हा भाग रसिकांच्या अधिक पसंतीला उतरलेला आहे. या काव्याची अनेक भाषांतरे प्रसिद्ध लेखकांनी केलेली आहेत. भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख उर्फ सी.डी.देशमुख, बा.भ.बोरकर, सुप्रसिद्ध कवयित्रि शांताबाई शेळके ई. प्रतिभावंतांना या संस्कृत काव्याचा मोह होऊन त्याची भाषांतरे त्यांनी केली आहे. कवयित्रि शांताबाई त्यात म्हणतात “रुसलेली तू धातुरसांनी चित्र शिळेवर असे रेखीतो, चरणी तूझिया नत झालेल्या मला, सखी, मी रंगवू बघतो|| तोच आसवे नयनी दाटती, दृष्टी माझी होते धूसर, चित्रातीलही मिलन अपुले सहन होईना, दैवा निष्ठुर||” या काव्याचा अर्थ असा “प्रिये, प्रेमभराने तू माझ्यावर रागावली आहेस आणि तुझा अनुनय करीत मी तुझ्या पाया पडत आहे, असे रेखाचित्र शिलखंडावर काढण्याचा मी प्रयत्न केला, पण ते चित्र काढतांना माझे डोळे आसवांनी भरून जातात. क्रूर काळ इतका कठोर आहे की, त्याला चित्रातदेखील तुझी माझी भेट होऊ नये असे वाटते”. किती सुंदर. शब्द सृष्टीचे ईश्वर. हे कालिदास आपल्या करंगलीवर स्थिरावले, जेंव्हा ज्येष्ठ, श्रेष्ठ कवींची तुलना व मोजदाद सुरू झाली तेंव्हा, ह्यांच्या नावापुढे हाताच्या करंगळी ह्या बोटावरील बोट पुढे सरकेना तेंव्हा पुढील बोटास अनामिका हे नाव पडले. किती सुंदर इतिहास. हे शब्द सार्थ करणार्‍या कालिदासासारख्या थोर कवींची प्रतिभा हा एक ईश्वरी अंशाचाच आविष्कार असतो. ‘मेघदूत’ हे खंडकाव्य अलकानगरीतील एका यक्षाने आपल्या प्रियेला मेघाबरोबर म्हणजे ढगाबरोबर जो संदेश पाठविला त्याचे वर्णन करणारे आहे. या यक्षाच्या हातून काही चूक घडल्यामुळे कुबेराने त्याला वर्षभर अलकानगरीपासून दूर राहण्याची शिक्षा केली. त्याप्रमाणे दूर एका रामगिरी येथे या यक्षास ही विरहिणी सुचली. ती कालिदासांनी संस्कृतात शब्दसृष्टीत आणली तेंव्हापासून ते महाकवी म्हणून ओळखू जाऊ लागले. ज्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकत नाही. इतका महान कवि. रघुवंश, ऋतुसंहार, कुमारसंभव, मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय, शाकुंतल,आणि मेघदूत अशा एकाहून एक सरस असलेल्या कालिदासाच्या साहित्य संपदेतील प्रत्येक रत्न अनेक गुणांनी विभूषित आहे. संस्कृत भाषेतील ही काव्ये म्हणजे त्या भाषेची श्रीमंती आहे.

या महिन्यातील आषाढी एकादशीपासून चातुर्मास प्रारंभ होतो तो कार्तिक प्रबोधीनी एकादशीपर्यंत. गुरूंचे ऋण स्मरण करून ते काहीअंशी त्यांची पूजा करून कृतज्ञता दाखविण्याचा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ म्हणजेच ‘व्यास पौर्णिमा’ हाही ह्याच महिन्यात येतो. नंतर बरोबर पंधरा दिवसांनी केवळ मुंबईकरांसाठी प्रिय म्हणून ओळखला जाणारा व अंगातली असलेली पाशवी, दानव वृत्ती बाहेर घालवणारा दिवस म्हणजे ‘गटारी अमावास्या’. ज्या दिवशी सर्व व्यसने अति करून पुन्हा त्यांचा एक महिन्यासाठी (श्रावण-भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरी येणार्‍या पार्थिव गणपतीमूर्तीला फूल वाहेस्तोवर-केवढा मोठ्ठा त्याग नाही?) किंवा चार महिन्यासाठी त्याग करून मनावर, शरीरावर, स्वतःच्या खिश्यावर ताबा, एक संयम, नियम पाळून देवाच्या नावाने किंवा निमित्ताने अलीकडे काही भाविक श्रद्धेने करतात. कृष्ण त्रयोदशीला संतश्रेष्ठ नामदेव महाराज व कृष्ण चतुर्दशीला संत सावता माळींची पुण्यतिथी साजरी होते. ह्या संतांचे वैशिष्ठ्य असे की त्यांनी प्रपंचाबरोबरच परमार्थही साधता येतो हे आपल्या कृतीवरून करून दाखविले. आषाढात सृष्टी हिरवीगार ‘सुजलाम सुफलाम’ होते. प्रत्येक मनुष्य प्राणिमात्राची चित्तवृत्ती बहरून जाते. अशा सुंदर वातावरणात नववधू माहेरवाशिणी बनून घरी येतात आणि आनंद घेतात व देतातही. इथे तिच्या सासरी त्या यक्षासारखा तिचा पती विरह करत असतो. असा हा ‘मेघमल्हार राग’ गाणारा गडगडाटी आषाढमास.

आपली प्रतिक्रिया द्या