
सामना ऑनलाईन, चंद्रपूर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे पक्षात काहीच चालत नाही की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे कारण त्यांनी एका कार्यकर्त्याला आपण राजीनामा देण्याच्या विचारात असल्याचे म्हटले आहे. परंतु राजीनामा पदाचा की पक्षाचा हे त्यांच्या संभाषणातू स्पष्ट होत नाही. चंद्रपूरच्या एका कार्यकर्त्याशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विनायक बांगडे यांना उमेदवारी दिली आहे. बांगडे हे कमजोर उमेदवार असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनीच मान्य केले असून त्यांच्याऐवजी सक्षम उमेदवार देण्यासाची विनंती राजूकर या कार्यकर्त्याने केली आहे. फोनवर बोलत असताना अशोक चव्हाण यांनी ‘माझं इथं कोणी ऐकायला तयार नाही, तुम्ही मुकुल वासनिक यांच्याशी बोला’ असा सल्ला चव्हाण यांनी या कार्यकर्त्याला दिला. कार्यकर्त्याने तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात तुम्हीच काहीतरी करू शकता असं म्हटले. त्यावर ‘मीच राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे’ असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.





























































