हिंदुस्थानचा दस का दम! स्क्वॉशमध्ये पाकिस्तानला नमवित पटकाविले सुवर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची पदकांची घोडदौड सुरूच आहे. शनिवारी हिंदुस्थानच्या स्क्वॉश टीमने पाकिस्तानला 2-1 फरकाने धूळ चारत सुवर्णपदकावर नाव कोरले. स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे दहावे सुवर्णपदक ठरले. अंतिम सामन्यातील सलामीच्या लढतीत हिंदुस्थानचा महेश माणगावकर विरुद्ध पाकिस्तानचा नासिर इक्बाल अशी लढत पाहायला मिळाली. यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर हिंदुस्थानच्या सौरभने पुढील सामना जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरी लढत हिंदुस्थानचा अभय सिंग आणि पाकिस्तानचा जमान नूर यांच्यामध्ये रंगली. पाच गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अभयने पहिला गेम जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये नूरने विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये पाकिस्तानने विजय मिळवत 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर अभयने विजय मिळवत 2-2 अशी बरोबरी साधली. मग पाचव्या व निर्णायक गेममध्ये 12-10 अशा फरकाने बाजी मारत हिंदुस्थानने विजयाला गवसणी घालत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

हिंदुस्थानच्या स्क्वॉश संघाला प्रत्येक स्पर्धेत पदक

n हिंदुस्थानच्या स्क्वॉश संघाने 2010च्या आशियाई स्पर्धेत प्रथम हजेरी लावली होती. यानंतर प्रत्येक आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानच्या स्क्वॅश संघाने पदक जिंकलेले आहे. 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतदेखील हिंदुस्थानच्या पुरुष स्क्वॅश संघाने सुवर्णपदक जिंकले होते.