आशियाई स्क्वाश टीम चॅम्पिअनशिप; हिंदुस्थानी पुरुष, महिला उपांत्य फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मलेशियाची राजधानी कौलालंपूर येथे खेळवण्यात येत असलेल्या आशियाई स्क्वाश टीम चॅम्पिअनशिपमध्ये अग्रमानांकित हिंदुस्थानी पुरुष संघाने इंडोनेशियावर 3-0  अशी मात करीत गटात अपराजित राहण्याचा पराक्रम नोंदवला आहे. अ गटात अजेय राहणाऱया हिंदुस्थानी पुरुष संघाला आता उपांत्य  फेरीत हॉंकॉंग संघाशी झुंजावे लागणार आहे. महिला गटातही  हिंदुस्थानी संघाने ‘ब’ गटात इराणला 3-0 असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली आहे.

हिंदुस्थानी पुरुष संघाला ‘अ’ गटात काल माजी विजेत्या पाकिस्तानच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले. पण अग्रमानांकित सौरव घोषालने पाकिस्तानच्या तय्यब अस्लमवर 56 मिनिटांच्या चुरशीच्या झुंजीत 9-11 ,7-11 ,11-1,11-7 ,11-8 अशी मात करीत हिंदुस्थानच्या 2-1 अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. हिंदुस्थानी पुरुष संघाने आपल्या गटात इराक, फिलिपाइन्स, पाकिस्तान आणि इंडोनेशिया अशा 4 संघांना पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. हिंदुस्थानी पुरुष संघात महेश मांणगावकर, रमीत टंडन आणि सौरव घोषाल या प्रमुख हिंदुस्थानी स्कॉशपटूंचा समावेश आहे. माजी विजेत्या पाकिस्तानी संघाचे आव्हान मात्र प्राथमिक फेरीत संपुष्टात आले आहे. त्यांना आज जपानकडून पराभव पत्करावा लागला.