रस्त्याच्या बाजूला होण्यास सांगितल्याने टोळक्याकडून दोघांवर वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मद्यपान करून रस्त्यात गोंधळ घालणाऱ्यांना बाजूला होण्यास सांगितल्याच्या रागातून टोळक्याने दोघांवर तलवारीने वार करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना 12 जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास कोंढवा बुद्रुकमधील आश्रफनगरमध्ये घडली. शान खान (वय 19 रा. कोंढवा) आणि मेहबुब अनपीन अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साहिल नवाज शेख, सोमनाथ भाऊसाहेब सरतापे (वय 22), अरबाज इलियास खान (वय 23), सलीम शब्बीर चौधरी (वय 24) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

कोंढवा बुद्रुक परिसरातील आश्रफनगरमध्ये मेहबुब अनपीन यांचा फर्निचर कारखाना आहे. 12 जूनला रात्री साडेअकराच्या सुमारास परिसरात मद्यपी रस्त्यावर गोंधळ घालत होते. त्यावेळी शानने त्यांना रस्त्यावर थांबू नका असे म्हटले. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने शान यांना मारहाण केली. त्यावेळी मेहबूब यांनी मध्यस्थी केली असता, टोळक्याने त्यांच्यावर तलवारीने वार करून दोघांनाही जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्वराज्य पाटील तपास करीत आहेत.