चोरीची जनावरे व वाहनासह 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, चाकूर पोलिसांची कारवाई

चाकूर हद्दीमध्ये रात्रगस्त करीत असताना पोलीस उपनिरीक्षक मोरे यांना झरी खुर्द गावाजवळ एक संशयास्पद पिकअप वाहन अतिशय वेगात दोन गायी घेऊन जात असल्याचे दिसले. जनावरे चोरून घेऊन जात असताना पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. चोरीची जनावरं व वाहनांसह 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

झरी खुर्द गावाजवळ पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता भरधाव वेगाने जाणार्‍या पिकअपने वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सदर माहिती चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांना कळविण्यात आली. निकेतन कदम यांनी उपविभागातील पोलीस ठाणे हद्दीमध्ये तात्काळ नाकाबंदी लावून सदर पिकअप वाहनाला ताब्यात घेतले. त्यांनी झरी गावातून सदरच्या गायी चोरल्याचे कबूल केले. त्यांनी पोलीस ठाणे चाकूर हद्दीमधील या अगोदर चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याच्या इतर साथीदाराच्या मार्फतीने जनावरे चोरल्याचे कबूल केले.

ज्ञानोबा नागनाथ मोहाळे रा. कातकरवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड, मारूती दंतराव हरगिले रा. कासारवाडी ता. गंगाखेड जि. परभणी, राजू नारायण पोपतवार रा. लांजी ता. अहमदपूर जि. लातूर, शेख कलीम शेख बुर्रहान कुरेशी रा. कुरेशी मोहल्ला पूर्णा जि. परभणी, इरफान उस्मानसाब कुरेशी रा. बागवान गल्ली अहमदपूर जि. लातूर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरलेले 2 गाई, 2 म्हशी, 1 वासरू, 1 बैल असे एकूण 6 जनावरे व गुन्ह्यात वापरलेले दोन पिकअप वाहन असा एकूण 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर शहर निकेतन कदम यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरवाडे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस अंमलदार शिरसाठ, इतर पोलीस कर्मचार्‍यांनी पार पाडली.