शिवसेना जिल्हाप्रमुखांवर दाखल अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा चुकीचा, आदिवासी पँथरचा आरोप

योगेश पाटील । हिंगाली

‘आदिवासी समाजातील महिला, युवती, नागरिक व कर्मचाऱ्यांवर अत्याचार झाला तेव्हा काँग्रेस आमदार संतोष टारफे हे समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. मात्र, स्वत:वर टिका झाली की समाजाला पुढे करतात. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आमदार टारफे यांच्या वर्तनावर टिका केली असून ही राजकीय टिका आहे. त्यामुळे आमदार टारफेंनी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर दाखल केलेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा चुकीचाच असून बांगर यांनी आदिवासी समाजाचा कोणताही अपमान केला नाही’, असे मत भारतीय आदिवासी पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडखे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भारतीय आदिवासी पँथर संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडखे यांनी हिंगोलीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आमदार डॉ. संतोष टारफे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. पत्रकारांशी बोलतांना बोडखे म्हणाले की, आखाडा बाळापूर, सेनगाव येथे आदिवासी मुलीवर अत्याचार झाला, कळमनुरीत नगर पालिकेचे आदिवासी कर्मचारी डी.एन. बोलके यांना काँग्रेस नगरसेविकेने मारहाण केली, 2015-16 पासुन सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे पैसे आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत, शबरी आणि पारधी घरकुल योजनेचा लक्षांक पूर्ण झाला नाही, आमदरी व करवाडीच्या लक्षासाठी आम्ही आंदोलन केले, या सर्व प्रकरणात काँग्रेस आमदार संतोष टारफे यांनी मदत केली नाही. उलट आंदोलन संपेल याचेच प्रयत्न काँग्रेस आमदार व खासदारांनी केल्याचा आरोप बोडखे यांनी केला. आदिवासींच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करत असल्याने माझ्याविरुध्द गुन्हे दाखल करुन हद्दपारीचा प्रस्ताव मंजुर करुन घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

औंढा नागनाथ येथे शिवसेनेच्या निघालेल्या मोर्चात जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी आमदार टारफे यांच्यावर टिका केली. त्यामध्ये चुकीचे काही वाटत नाही. हा काँग्रेस व शिवसेनेतील वाद आहे. मात्र, आमदार टारफे यांनी आदिवासी समाजावर टिका झाल्याचे सांगत कटकारस्थान करुन गुन्हा दाखल करत सहानुभूती मिळविल्याचेही बोडखे म्हणाले. गुन्हा नोंदविण्यासाठी पाच दिवस का लावले, असा प्रश्नही बोडखे यांनी विचारला. टारफे यांनी बंजारा, धनगर, वंजारी विरुध्द आदिवासी असे भांडण लावून राजकीय पोळी भाजुन घेणे व फायदा उचलणे हाच उद्देश ठेवल्याचेही बोडखे यांनी सांगितले. जाणिवपुर्वक समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडुन होत असून बहुजन व आदिवासी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन प्रशांत बोडखे यांनी केले. या पत्रकार परिषदेला आदिवासी पँथर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या