
हरयाणात शेतकरी आंदोलनादरम्यान भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. तर आपल्याला जिवे मारण्याचा कट होता असा अरोप खासदार जांगडा यांनी केला.
शुक्रवारी खासदार रामचंद्र जांगडा एका धर्मशाळेच्या भूमीपुजनासाठी हिस्सार जिल्ह्यात आले होते. तेव्हा काही शेतकर्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांचा रस्त अडवला. तेव्हा त्यांच्या गाडीवर काही जणांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जांगडा यांच्या गाडीची काच फुटली. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही.
अखेर पोलिसांनी सुरक्षितरित्या जांगडा यांना घटनस्थळाहून बाहेर काढले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सोडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार रामचंद्र जांगडा यांनी शेतकरी आंदोलनविरोधी वक्तव्य केले होते. त्यावर जांगडा यांनी माफी मागावी अशी मागणी शेतकर्यांनी केली होती.
आपल्यावर जिवे मारण्याच्या हेतुने हल्ला केल्याचा आरोप खासदार जांगडा यांनी केला आहे. तसेच आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

























































