
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असतानाच पुण्यातही भाजप कार्यकर्त्यांची झुंडशाही, गुंडगिरी सुरू आहे. ‘निर्भय बनो’ सभेसाठी आलेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर डेक्कन परिसरातील खंडोजीबाबा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा पह्डल्या. शाई, अंडी फेकली. भाजप आणि मिंधेंच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांबरोबरच आयोजक असलेल्या महिलाही जखमी झाल्या. या तणावपूर्ण परिस्थितीत पुणे पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात आज निर्भय बनो उपक्रमांतर्गत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण होते. तर ज्येष्ठ कायदेतज्ञ असिम सरोदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, नितीन वैद्य यांचीही भाषणे होणार होती. देशात चाललेला अनागोंदी कारभार, सरकारी संस्था व तपास यंत्रणांचा गैरवापर, झुंडशाही, गुंडगिरी, भ्रष्टाचार यावर संबोधन होणार होते. यात भाजपच्या कारभाराची चिरफाड होणार असल्याने भाजपने या सभेला विरोध दर्शवला होता. मात्र, काहीही झाले तरी ही सभा होणाच असा निर्धार निखिल वागळे यांनी केला. त्यामुळे सभास्थळी सकाळपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता, मात्र पोलिसांना न जुमानता भाजप आणि मिंधेंच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळीही गोंधळ घातला.
View this post on Instagram
दरम्यान, सभेपूर्वी निखिल वागळे हे अॅड. असीम सरोदे यांच्या घरी थांबले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. निखिल वागळे आणि अॅड. सरोदे यांनी सभेच्या ठिकाणी जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना सांगितले होते, मात्र वागळे आणि अॅड. सरोदे हे सभेसाठी जाणारच यावर ठाम होते. ज्यावेळी ते कार्यक्रमास्थळी निघाले तेव्हा डेक्कन परिसरातील खंडोजी बाबा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. अशा परिस्थितीतही ते सभास्थळी पोहचलेच आणि त्यांची भाषणे झाली.
भाजप म्हणजे गँगस्टर, फॅसिझम
भाजप सरकार लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी गुंडांना रस्त्यावर उतरवले जात आहे. माझ्यावर हल्ला होणार होता, हे पोलिसांना माहिती असतानादेखील त्यांनी भाजपच्या दबावाखाली त्यांच्या गुंडांना अभय दिले. पण आम्हाला मात्र सभेला जाऊ नका, यासाठी चार तास घरी बसवून ठेवले. त्यामुळे भाजपवाले हे गँगस्टर, फॅसिझम आहेत, अशी प्रखर टीका ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केली.

























































