
उभ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी येथील जागेचा लिलाव अखेर करण्यात आला. यात त्याच्या एकूण सात मालमत्तेचा लिलाव करण्यात आला असून दिल्लाचे वकील अजय श्रीवास्तव यांनी दोन आणि भूपेंद्र भारद्वाज यांनी चार मालमत्ता विकत घेतल्या आहेत. तर रत्नागिरी येथील हवेली अवघ्या 11 लाख 20 हजारांना विकण्यात आली आहे. या लिलावातून सरकारला 22 लाख 79 हजार 600 प्राप्त झाले आहेत. स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून (साफेमा)ऑनलाईनरित्या ही लिलाव प्रक्रिया पार पडली.
साफेमाच्या मुंबई येथील कार्यालयातून ही लिलाव प्रक्रिया पार पडली. ऑनलाइनरित्या पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत दाऊदची 4, 5, 7 आणि 8 क्रमाकांची संपत्ती दिल्लीचे अॅड. भूपेंद्र भारद्वाज यांनी विकत घेतली आहे. तर 6 आणि 9 क्रमाकांच्या जागेसाठी अॅड. अजय श्रीवास्तव यांनी सर्वाधिक बोली लावली. दाऊदच्या 10 क्रमांकाच्या जागेचा तांत्रिक कारणामुळे लिलाव होऊ शकला नाही. या जागेच्या सीमारेषेवरुन वाद सुरु झाल्याने या जागेचा लिलाव करण्यात आलेला नाही.
2018 मध्ये दाऊदच्या तीन संपत्तीचा झाला होता लिलाव
या लिलाव प्रक्रिये अगोदर 2018 साली दाऊदच्या इतर तीन संपत्तीचा लिलाव पूर्ण करण्यात आला आहे. ज्यात नागपाडा येथील एक हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊसचा समावेश आहे. तर दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्या प्लॅटचा लिलाव देखील यापूर्वी करण्यात आला आहे.
इक्बाल मिर्चीच्या जागांना बोली नाही
दरम्यान, या लिलाव प्रक्रियेत इक्बाल मिर्चीच्या मुंबईतील जुहु येथील बंगल्याचा लिलाव झालेला नाही. लिलावात बोली लावणाऱ्यांच्या मते त्याच्या प्रॉपर्टीची किंमत जास्त लावण्यात आली आहे. तर इतरही अनेक जागेसाठी लिलावात कोणीही बोली लावली नाही. ज्यात एका सिनेमागृह, एक हॉटेल, एक बांधण्यात येत असलेले हॉटेल, दोन बंगले आणि पंचगनी येथील 3.5 एकर जमीनीचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तेची एकूण किंमत तब्बल 22 कोटींच्या घरात आहे.
एकूण 17 मालमत्तेचा झाला लिलाव
साफेमातर्फे एकूण 17 मालमत्तेचा लिलाव करण्यात आला. ज्यात दाऊदच्या मालकीच्या 7 जागेंचा समावेश होता. याबद्दल अधिक माहिती देताना साफेमाचे अधिकारी मुनाफ सैयद म्हणाले की, रत्नागिरी येथील खेड परिसरात दाऊदच्या एकूण 13 मालमत्ता आहेत. त्यापैकी एकूण 6 जागेचा समावेश आहे. ज्यासाठी 80 लाखांची बोली लावण्यात आली. तर रत्नागिरी येथील हवेली केवळ 11 लाख 2 हजारांमध्ये विकण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. खेड येथील मुंबके गावांत असलेल्या जमीनीसाठी 1.38 लाखांची बोली लावण्यात आली. तर अन्य एका जागेवर असलेल्या बंगल्याचा देखील लिलाव करण्यात आला आहे. तर पेट्रोल पंपासाठी घेतलेल्या जागेचा देखील लिलाव करण्यात आला आहे.


























































